सानप, किशोर : (७ जानेवारी १९५६). ललित आणि वैचारिक समीक्षा क्षेत्रात लेखन करणारे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक. कादंबरी, समीक्षा आणि संतसाहित्य संशोधन हा त्यांचा मुख्य लेखनप्रांत. त्यांचा जन्म अकोला (महाराष्ट्र) येथे एका सर्वसामान्य अभावग्रस्त कुटुंबात झाला. वडिलांच्या व्यवसायात स्थैर्य नसल्याने घरची परिस्थिती बेताची होती. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले. आईचे वडील हे कीर्तनकार होते, त्यांच्या वाणीचा प्रभाव किशोर सानप यांच्यावर बालवयात पडला आहे. वाणिज्य शाखेतून त्यांनी पद्व्यूत्तर पदवी आणि एम.फील. ह्या पदव्या प्राप्त केल्या. बहिःशाल विद्यार्थी म्हणून त्यांनी मराठी साहित्य विषयातही पद्व्यूत्तर पदवी प्राप्त केली. पुढे भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास  हा विषय घेवून त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथून आचार्य पदवी प्राप्त केली (१९९२). वर्धा येथील गो. से. वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी व्यावसायिक जीवनाचा प्रारंभ केला (१९७९).

किशोर सानप यांची साहित्य संपदा : कादंबरीपांगुळवाडा (१९९४), हारास (२००१), भूवैकुंठ (२००८); कथासंग्रह- मी अनादिचा अस्वस्थ गा (२०१३), कोवळी पानगळ (२०१३); समीक्षा भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी (१९९६), भालचंद्र नेमाडे यांची कविता (२००४), भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा (२००५), मराठी कादंबरीतील नैतिकता (१९९८), मराठीतील प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर (१९९८), समग्र श्याम मनोहर : फॉर्म, फिक्शन आणि तत्वज्ञानात्मक प्रश्न;  मराठी कादंबरी : नव्या दिशा  (२००५), लघुपत्रिकेतील कविता : प्रेरणा व स्वरूप (२००६), समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या (२०१२), समकालीन समीक्षा : जाणिवा आणि भाष्य (२०१५); संपादन – दशक्रियाची उत्तरक्रिया (२००६),  युगपुरुष तुकाराम (१९९३), तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व (सहलेखक मनोज तायडे) (१९९५), समग्र तुकारामदर्शन (२००८), महाकवी तुकाराम दर्शन खंड १ ते ५; रामदास फुटणे यांची  भाष्यकविता (२००१८), युगांतराची कविता (२०१९); देशीयवाद : संकल्पना, सिद्धांत आणि उपयोजन, कादंबरीचे साहित्यशास्त्र यांशिवाय त्यांचा ऋतू (१९८५) हा काव्यसंग्रहही प्रकाशित आहे.

किशोर सानप यांच्या उपरोक्त कादंबऱ्याद्वारा प्रारंभी त्यांची साहित्यप्रांतात ओळख निर्माण झाली. त्यांच्या तीनही कादंबऱ्या ह्या समकालीन समाजाचे एक अधोचित्र रेखाटतात. जगण्याची विजिगीषा वृत्ती त्यामधून प्रकट झाली आहे. पांगुळवाडा  या कादंबरीत मानवी जीवनातील लैंगिक भावनेतून निर्माण होणारे जग आणि सृजनशील  नैसर्गिक भावनेतील अविचाराने निर्माण झालेल्या विसंगतीचे चित्रण आहे. या कादंबरीचा नायक हा व्याभिचाराने बरबटलेल्या अवतीभवतीच्या लोकांमधून बाहेर पडून स्वकष्टाने स्वतःचे जीवन उभे करतो. त्याचा संघर्ष अनोखा आहे; मात्र त्याच्याकडील जननिक क्षमतेमुळे समाजाच्या चालीरीती त्याला हतबल आणि निराश करतात. “ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, जगणाऱ्यास दुःख देवो.” अशी प्रार्थना करतो. हारास  ही राजकीय वास्तव मांडणारी कादंबरी आहे. राजकीय आकांक्षा आणि त्यापोटी कराव्या लागणाऱ्या तडजोडी यातून एका महिलेची होणारी शोकांतिका ही कादंबरीची मुख्य कथा आहे. भूवैकुंठ  ही वारकऱ्यांचे भक्ती-सामर्थ्य दर्शविणारी कादंबरी आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारी कौसल्या विठोबाची भक्ती आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या यांचा कसा मेळ घालते, याचे मनोवेधक चित्र या कादंबरीत आले आहे. समकालीन युवापिढीचे व्यसन, बेरोजगारी, जगण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि भावनातिरेक याद्वारे होणारे खच्चीकरण आणि आदिवासी मुलांचे कुपोषण हे त्यांच्या कथांतील काही महत्त्वाचे विषय आहेत.

किशोर सानप यांचे समीक्षालेखन हे तत्त्वसापेक्ष आहे. नैतिकता, प्रायोगिकता आणि १९९० नंतर साहित्यात आलेली कालसापेक्ष नाविन्यता, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा व शैलीचा शोध घेणे या विचारसुत्रांच्या आधारे त्यांनी मराठी साहित्यातील कादंबरींची आणि कव्याचीही समीक्षा केली आहे. सानप आधुनिकता आणि नैतिकतेच्या अनुबंधाचा गांभीर्याने समग्र ललित आणि वैचारिक समीक्षालेखनात अचूक मेळ घालतात. भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांच्या समग्र साहित्याची साक्षेपी समीक्षा करून एका लेखकाच्या साहित्यातील त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, जीवनमूल्यांच्या आणि संरचनातत्वाच्या व लेखकाच्या शैलीच्या अंगाने शोध घेणाऱ्या समीक्षापद्धतीचा वस्तुपाठ त्यांनी मराठी समीक्षेत निर्माण केला. रंगनाथ पठारे, राजन गवस, सदानंद देशमुख, बाबाराव मुसळे, रवींद्र शोभणे, रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ, आशा बगे, मेघना पेठे, अरुणा सबाने तसेच कवी यशवंत मनोहर, सतीश काळसेकर, तुळशीराम काजे, श्रीकांत देशमुख, श्रीपाद भालचंद्र जोशी, अशोक कोतवाल, श्रीकृष्ण राऊत, जयराम खेडेकर, अशोक बागवे, नारायण कुलकर्णी कवठेकर, किशोर पाठक, सुखदेव ढाणके, प्रवीण बांदेकर, लोकनाथ यशवंत, पी. विठ्ठल, अजय कांडर, अनुजा जोशी, वीरधवल परब, शशिकांत शिंदे, संतोष पवार, अजीम नवाज राही, फेलिक्स डिसोजा, अनिल कांबळी, बालम केतकर, राजीव जोशी यांसारख्या इतरही गणमान्य कादंबरीकारांच्या कादंबऱ्यांची आणि कवींच्या काव्याची समीक्षा, लेखकाची नैतिकता आणि शैली या तत्त्वविचाराने केली आहे. सुधाकर गायधनी यांच्या महाकाव्याची ही साक्षेपी चिकित्सा केली. युगान्ताराची कविता या ग्रंथात त्यांनी समकालीन कवींच्या कवितेची समीक्षा केली आहे. समकालीन मराठी कविता आणि जागतिकीकरण, देशीयता, जागतिकीकरण आणि महाकाव्य याही ग्रंथात नव्या जुन्या पिढीच्या महत्त्वाच्या कवींची साक्षेपी समीक्षा केली आहे. आधुनिक लेखक – कवी ते संत कवी अशा व्यापक परिप्रेक्षात त्यांनी मराठी समीक्षेत स्वतंत्र स्थान निर्माण केले.

संत साहित्यामध्ये त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा साकल्याने अभ्यास मांडला आहे. संत तुकारामांचे अभंग हा एक स्वतंत्र अभ्यासविषय असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले आहे. प्रखर सामाजिक भूमिका मांडणाऱ्या संत तुकारामांच्या अभंगातील सत्यान्वेषी दृष्टिकोन हे किशोर सानप यांच्या संशोधनातील मुलभूत तत्त्व आहे. संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातील धर्मचिकित्सा, समाजविज्ञान याधारे तुकारामांची विज्ञानवादी दृष्टी मांडली आहे. संत तुकारामांच्या उपलब्ध सर्वच संदर्भ साहित्याचे परिशीलन त्यांनी यासाठी केले आहे. संत तुकाराम यांच्या साहित्यासंदर्भात इतर संशोधकांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी वादी-संवादी मतेही मांडली आहेत. त्यांच्या संत तुकाराम यांच्या अभंगांच्या संशोधनात्मक कार्यासंदर्भात सदानंद मोरे यांनी, ललित आणि संतसाहित्यादी वैचारिक सकस लेखन करणाऱ्या संकालिनांमध्ये किशोर सानप यांचे नाव ठळक अक्षरांमध्ये नोंदवण्याइतके महत्त्वाचे आहे. समग्र तुकाराम दर्शन ह्या ग्रंथामुळे तुकारामाचा अभ्यास या ज्ञानशाखेत मोलाची भर पडली आहे, असे मत व्यक्त केले आहे.

साहित्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र, १९९६-९७, २००४-०५), कुसुमानिल पुरस्कार (१९९८, २००४, ०५), सुदाम सावरकर जनस्वारस्वत स्मृती पुरस्कार (२००५), प्र.न. जोशी संतमित्र ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार (२००८), महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा  पुरस्कार (२००८), मराठवाडा साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार (२००९), भैरुरतन दम्माणी साहित्य पुरस्कार (२००९), महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार (२००५), सर्वज्ञ चक्रधर स्वामी राज्यस्तरीय पुरस्कार (२००६), आद्य म्हाईभट पुरस्कार (२०१४) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. संत तुकाराम जीवनगौरव पुरस्कार(२००५), साहित्यव्रती जीवनगौरव पुरस्कार (२०१५), गिरीश गांधी फाऊंडेशन समीक्षा पुरस्कार (२०१९), भवरलाल जैन सूर्योदय साहित्यरत्न  पुरस्कार (२०२०), उर्मी काव्यगौरव पुरास्कार (२०२०) हे जीवनगौरव पुरस्कारही त्यांना लाभलेले आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या गोंदिया येथे ७, ८, ९ डिसेंबर २०१२ मध्ये ६२ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यांशिवाय विविध सहा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षपदेही त्यांनी भूषविली आहेत.

संदर्भ :

  •   जुडे, शेषराव, किशोर सानप यांचे वाङ्मय : एक आकलन, पिंपळापुरे बुक डिस्ट्रिब्युटर्स, नागपूर, २०१५.