संस्तारक : संथारग.अर्धमागधी भाषेतील पंचेचाळीस आगमांच्या दहा प्रकीर्णकातील (संग्रह) संस्तारक प्रकीर्णक हे सहावे प्रकीर्णक आहे. संथारग म्हणजे शय्या, अंतिम समयीच्या शय्येचे महत्त्व यात सांगितले आहे. यात १२३ गाथा आहेत. तृणाचे (गवताचे) आसन करून त्यावर आसनस्थ झालेला मुनी मुक्ती प्राप्त करतो. अर्णिका पुत्र, सुकोशल ऋषी, अवंती, कार्तिकार्य, अमृतघोष, चिलाती पुत्र, गजसुकुमाल, चाणक्य वगैरे मुक्ती प्राप्त झालेल्या मुनींचे यात दृष्टान्त दिले आहेत. १२२ गाथांमध्ये पुढीलप्रमाणे वर्ण्य विषय आहेत. १-३० गाथांमध्ये मंगल व संथारकाचे गुण, ३१ ते ४३ गाथांमध्ये संस्तारकाचे स्वरूप, ४४ ते ५५ गाथांमध्ये संस्तारकाचे फायदे व सुखवर्णन, ५६ ते ८७ गाथांमध्ये तयार संस्तारकांची उदाहरणे, ८८ ते १२२ गाथांमध्ये त्यांच्या विषयी क्षमापना भावना वर्णिली आहे. यावर गुणरत्न मुनींनी अवचूरि (व्याख्यात्मक टिपणी) लिहिली आहे.
संदर्भ : जैन, जगदीशचंद्र; मेहता, मोहनलाल, जैन साहित्य का बृहद् इतिहास – भाग 2, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी १९६६.