कर्म-सिद्धांत हा भारतीय दर्शनांमधील अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. या सिद्धांतानुसार जीव ज्याप्रकारचे कर्म करतो, त्यानुसार त्या कर्माचे फळ त्याला प्राप्त होते. काही कर्मांचे फळ त्वरित मिळते; तर काही कर्मांचे फळ काही काळाने मिळते. कर्म केल्यानंतर त्याचे संस्कार चित्तामध्ये उत्पन्न होतात व ज्यावेळी योग्य देश, काल, परिस्थिती प्राप्त होते त्यावेळी ते संस्कार जीवाला कर्माचे फळ (विपाक) देतात. कर्माद्वारे उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म संस्कारालाच योगदर्शनात ‘आशय’ म्हटले जाते. जीवाने जी कर्मे संपादन केली आहेत व ज्यांचा विपाक अजून मिळाला नाही, अशा सर्व कर्मांचे संस्कार चित्तामध्ये साठलेले असतात, त्या संस्कारांच्या संचयालाच ‘कर्माशय’ असे म्हणतात.

योगदर्शनाला अनुसरून आशय शब्दाची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे सांगता येते — कर्माचे फळ प्राप्त होईपर्यंत जो संस्कार चित्तभूमीमध्ये सुप्त अवस्थेत राहतो, त्याला आशय असे म्हणतात (आ फलविपाकात् चित्तभूमौ शेरते इत्याशय:।). चित्तामध्ये तीन प्रकारचे संस्कार असतात – वृत्तीद्वारे उत्पन्न होणारे, कर्माद्वारे उत्पन्न होणारे आणि चित्तवृत्तींच्या निरोधामुळे उत्पन्न होणारे संस्कार. यातील फक्त कर्माद्वारे उत्पन्न होणाऱ्या संस्कारांनाच ‘आशय’ अशी संज्ञा आहे.

सामान्यपणे ‘कर्म’ हा शब्द ‘शरीराद्वारे होणारी कोणतीही क्रिया’ या अर्थाने समजला जातो. परंतु, दर्शनांमध्ये कर्म हा शब्द विशेषत: चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचा बोधक आहे. शरीराद्वारे ज्या क्रिया होतात, त्यांना चेष्टा असे म्हटले जाते. चित्ताने दिलेल्या सूचनेनुसार शरीर केवळ एखादी क्रिया अमलात आणण्याचे काम करते. मुख्यत: जी क्रिया करायची आहे, त्याविषयीचा विचार आणि कर्म हे चित्ताद्वारेच होत असते. त्यामुळे चित्त कर्म करते, चित्तामध्येच त्याचे संस्कार उत्पन्न होतात आणि त्याच्या फळाचा अनुभवही चित्ताद्वारेच घेतला जातो.

कर्म हे तीन प्रकारचे असू शकते – कृत, कारित आणि अनुमोदित. कृत म्हणजे स्वत: केलेले, कारित म्हणजे दुसऱ्याकडून करवून घेतलेले आणि अनुमोदित म्हणजे जर एखादे कर्म कोणीतरी अन्य व्यक्तीने केले आहे, त्या कर्माचे ज्ञान झाल्यावर त्यास आपले अनुमोदन असेल तर ते तिसऱ्या प्रकारचे कर्म होय. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने स्वत: दुसऱ्याला इजा केली तर ते कृत कर्म होय. जर स्वत: न करता दुसऱ्या कोणाकडून इजा करविली, तर ते कारित कर्म होय. एखाद्या व्यक्तीला काही कारणाने इजा झाली असे समजल्यावर ‘योग्य झाले त्याला इजा झाली’ अशा प्रकारे अनुमोदन असेल, तर ते अनुमोदित कर्म होय. या तीन प्रकारांमध्ये फक्त कृत कर्मामध्ये मनुष्य स्वत: शरीराने सहभागी असतो, परंतु चित्ताचा सहभाग तीनही प्रकारच्या कर्मांमध्ये असल्यामुळे केवळ विचाररूपाने जे कर्म होते, त्याचेही संस्कार चित्तात उत्पन्न होतात व त्याचेही फळ प्राप्त होते.

जर चित्तामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असतील आणि यातील कोणत्याही क्लेशाच्या प्रभावामुळे जर जीव एखादे कर्म करीत असेल तरच कर्माचे संस्कार (आशय) उत्पन्न होतात; अन्यथा नाही (क्लेशमूलो कर्माशय: दृष्टादृष्टजन्मवेदनीय:। योगसूत्र २.१२). क्लेश ज्यांचे कारण आहेत, अशा कर्मांचे संस्कार दृष्ट (वर्तमान) आणि अदृष्ट (भावी) जन्मांमध्ये अनुभवाला येतात. क्लेशविरहित निष्काम कर्म करणाऱ्या योग्याच्या चित्तामध्ये संस्कार उत्पन्न होत नाहीत व त्याला विपाकही मिळत नाही. कर्मांच्या संस्कारांमुळे उत्पन्न होणारा विपाक (कर्माचे फळ) हे तीन प्रकारचे असू शकते. क्लेश कर्मांचे कारण असल्यास त्यांचा विपाक जन्म (जाति), आयुष्य (आयु) आणि आयुष्यात येणारे अनुभव (भोग) या तीन रूपाने मिळतो (सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगा:। योगसूत्र २.१३). कर्मांमुळेच जीव मनुष्य, पशु, वनस्पती इत्यादी कोणता जन्म घेणार हे ठरते; कर्मांमुळेच त्याचे आयुष्य किती असणार हे ठरते आणि कर्मांमुळेच आयुष्यातील भोग कशा स्वरूपाचे असतील हे ठरते.

व्यासभाष्यानुसार कर्माशय हा दोन प्रकारचा असतो – (१) नियतविपाक आणि (२) अनियतविपाक. ज्या कर्मांचे फळ वर्तमान जन्मात मिळणार असते व जे टाळता येऊ शकत नाही, अशा कर्माशयाला ‘नियतविपाक कर्माशय’ असे म्हणतात. वेदान्त दर्शनात यालाच प्रारब्ध कर्म असे म्हणतात. ज्या कर्मांचे फळ भावी जन्मांमध्ये मिळणार असते व जे निश्चित मिळेलच असाकाही नियम नसतो, त्या कर्माशयाला ‘अनियतविपाक कर्माशय’ असे म्हणतात. ज्या कर्मांचे फळ मिळणे निश्चित नाही, त्यांचे पर्यवसान तीन प्रकारे होऊ शकते –

(१) प्रायश्चित्त कर्म केल्यामुळे पूर्वी केलेल्या पापकर्मांचे संस्कार फळ न देताच नष्ट होतात.

(२) एखाद्या कर्माचे वेगळे फळ न मिळता कोणत्या तरी प्रधान कर्मफलासोबत गौणरूपाने त्याचे फळ मिळते.

(३) योग्य देश, काल, परिस्थिती प्राप्त न झाल्यामुळे कर्माचे संस्कार चित्तात अनंत काळापर्यंत राहतात, परंतु फळ देऊ शकत नाहीत. कालांतराने विवेकख्याती प्राप्त झाल्यानंतर ते संस्कार निष्क्रिय होऊन जातात.

योगदर्शनामध्ये जरी कर्मसिद्धांत मानलेला असला तरीही योग दैववादाचा पुरस्कार करीत नाही, कारण कर्माच्या सामर्थ्याने त्यावर मात करता येऊ शकते. योगदर्शनामध्ये चित्त शुद्ध होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याद्वारे यथार्थ ज्ञान प्राप्त करून अनिष्ट कर्म करण्याची प्रवृत्ती टाळता येते व अंतिमत: योगी अशुक्ल-अकृष्ण कर्म (जे पाप आणि पुण्य दोन्हीपेक्षा वेगळे आहे) करून कर्मबंधनातून मुक्त होतो.

पहा : कर्म, क्लेश, वासना, विपाक, संस्कार.

                                                                                                                                                                                             समीक्षक : श्रीराम आगाशे