सोमशेखर शर्मा, मल्लमपल्ली : (१८९१- ७ जानेवारी १९६३). तेलुगू साहित्यिक आणि इतिहासाभ्यासक.आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या मिनुमिंचीलिपडू ह्या गावी एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चिलकमर्ती लक्ष्मीनृसिंहम् पंतुलु ह्यांनी चालविलेल्या देशमाता ह्या नियतकालिकाच्या संपादकपदी तरुण वयातच त्यांची नेमणूक झाली (१९१४). तेथे ते चार वर्षे होते. द्भा नियतकालिकासाठी त्यांनी कथा, वाङ्मयीन निबंध, नाटुकली असे लेखन केले. यथावकाश एक कादंबरीकार आणि नाटककार म्हणून त्यांना कीर्ती प्राप्त झाली.
पादुकापट्टाभिषेकम् हे नाटक त्यांनी स्वतः लिहून सादर केले. रोहिणीचंद्र गुप्ता, अरण्यरोदनम् ह्यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचे व्यक्ती आणि निसर्ग ह्यांचे निरीक्षण सूक्ष्म होते. त्यामुळेच ते आपल्या कादंबऱ्यांतून वास्तववादी प्रसंग आणि व्यक्तिरेखा निर्माण करू शकले. त्यांच्या समकालीन समाजाची ध्येये आणि आकांक्षांचे चित्रही ते त्यामुळेच उभे करू शकले. ह्यांखेरीज संस्कृत-प्राकृत भाषांतील कथासाहित्य तेलुगूत आणून अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले.
इतिहासाच्या क्षेत्रातही अनेक व्यासंगपूर्ण निबंध लिहून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. इतिहास म्हणजे केवळ राजे, लढाया आणि सनावळ्या नसून तो लोकांचे जीवन आणि संस्कृती ह्यांचा वृत्तांत होय, अशी त्यांची धारणा होती. जुने, कोरीव लेख शोधणे, त्यांचा आशय उलगडणे, ह्यांतही त्यांना रस होता. द हिस्टरी ऑफ रेड्डी किंगडम आणि द फरगॉटन चॅप्टर ऑफ आंध्र हिस्टरी हे त्यांचे दोन इतिहासग्रंथ उल्लेखनीय आहेत. इंडियन हिस्टरी काँग्रेस आणि ऑल इंडिया ओरिएंटल इन्स्टिट्यूशन ह्यांचे ते सक्रिय सदस्य होते.
आंध्रमध्ये १९१० च्या सुमारास आंध्रविज्ञानसर्वस्वमु ह्या तेलुगू विश्वकोशाची योजना के. व्ही. उक्ष्मणराव ह्यांनी हाती घेतली होती. त्याचे काही काम झाल्यानंतर लक्ष्मणराव ह्यांचे निधन झाले. त्यानंतर ह्या प्रकल्पाचे काम हाती घेणारे के. नागेश्वरराव हेही निधन पावल्यामुळे हा विश्वकोश-प्रकल्प अपूर्णावस्थेत राहिला. ह्या दोन्ही व्यक्तींना सोमशेखर शर्मा ह्यांनी साहाय्य केले होते. पुढे तेलुगू भाषा समिती ने सुरू केलेल्या विज्ञानसर्वस्वमु ह्या कोशाच्या तेलुगू संस्कृतीविषयक दोन खंडांपैकी (खंड ३ व ४) तिसऱ्या खंडाची जबाबदारी सोमशेखर शर्मा ह्यांनी स्वीकारली होती.सोमशेखर शर्मा ह्यांनी पीएच्.डी. च्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. आंध्र प्रदेश शासनाने त्यांना तेलुगू स्क्रिप्ट रिफॉर्म्स कमिटी चे (तेलुगू लिपी सुधार समिती) अध्यक्षपद दिले होते.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गौरवार्थ तयार केलेला ग्रंथ आंध्र प्रदेश शासनाने प्रकाशित केला.
संदर्भ : Ekambarchary, Rapacha, Mallampalli Somashekar Sharma, Sahitya Akademi, New Dehli.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.