सायटोकायनीन या संजीवकाचा शोध ‘कायनेटीन’ या संयुगाच्या निर्मितीनंतर लागला. झाडांवर कायनेटिनचा वापर केल्यानंतर असे लक्षात आले की, त्यात पेशींचे विभाजन घडवून आणण्याचा एक महत्त्वपूर्ण गुण आहे.

निर्मिती व वहन : अधिक संशोधनानंतर असे लक्षात आले की, झाडे अतिशय कमी प्रमाणात सायटोकायनीन संजीवकांची निर्मिती स्वतः करु शकतात. उदा., मका या तृणधान्यात आढळणारे ‘झिॲटीन’ (Zeatin) नावाचे सायटोकायनीन. सायटोकायनीन / झिॲटीन संप्रेरके जवळच्या व लांबच्या  ऊतींमध्ये पोहचविण्यासाठी संवहनी  ऊतींमधील प्रकाष्ठ (Xylem) व  परिकाष्ठ (Phloem) या उतींचा वापर केला जातो.

ज्यावेळेला झिॲटीनची गरज नसेल त्यावेळेला काही प्रकारच्या शर्करा व ॲमिनो अम्लांबरोबर संयुग बनवून झिॲटीनची कार्यक्षमता कमी  होते. उदा., बियांची सुप्तावस्था बिया रुजल्यानंतर मात्र झिॲटीन अतिशय वेगाने या संयुगापासून  विलग केले जाते व नवीन उगवणा-या झाडामध्ये / कोंबामध्ये पेशी विभाजनाच्या प्रक्रियेला चालना देते.पेशी पूर्णत: पक्व झाल्यावर ऑक्सिडीकरणाद्वारे झिॲटीनचे विघटन होते.

सायटोकायनीनची  कार्ये : १) पेशींचे विभाजन सुसूत्रतेने घडवून आणणे;  त्याचबरोबर डी.एन.ए. आणि ओआर.एन.ए. यांचीही निर्मिती करणे; २) ऑक्सिजन व जिबरेलिक अम्ल या संजीवकांप्रमाणे पेशींचा आकार वाढविण्यास मदत करणे; ३) ऑक्सिजन या संजीवकाबरोबर नवीन ऊती व पेशीनिर्मितीमध्ये भाग घेणे; ४) फांदीच्या अग्राच्या वाढीचे प्राबल्य कमी करणे; ५)  सुप्तावस्था थांबवून  कुक्षी कोंबाच्या वाढीला प्रोत्साहन देणे; ६) झाडांच्या इतर भागांकडून, पानांकडे अन्नद्रव्य पुरवठा करणे; ७) प्रकाश नसतानासुध्दा हरितलवकांची निर्मिती करणे; ८) बिया रुजण्यास चालना देणे.

                                                                                                            समीक्षक : डॉ.बाळ फोंडके