भूशास्त्रीय कालखंडातील क्रिटेसिअस काळामध्ये (Cretaceous Period) समुद्राचे भूमीवर विशेष प्रमाणात अतिक्रमण घडून येऊन, संबंध पृथ्वीवर विविध पर्वतरांगा निर्मिती, ज्वालामुखीचे उद्रेक आणि उथळ भागांतून समुद्री आक्रमण; अशा रूपांत, प्रचंड बदल घडून आले. त्यांतील एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये अग्निजन्य खडक प्रकारातील ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकी (volcanic fissure eruption) प्रकारातून लाव्हा रसापासून तयार झालेले, बेसाल्ट खडकांचे दक्खनचे पठार होय. यामध्ये त्यामानाने छोट्याशा कालखंडात – साधारण ६ ते ७ लाख वर्षांमध्ये, ५ लाख चौ. किमी. इतका विस्तीर्ण प्रदेश, लाव्हा स्तरांनी आच्छादिला गेला; यालाच डेक्कन ट्रॅप – बेसाल्ट (Deccan Trap Basalt) असे नाव आहे. ज्वालामुखी खडकांच्या जवळजवळ सपाट आडव्या थरांची जिन्याच्या पायऱ्यांसारखी राशी म्हणजे तिच्यातील खडकाच्या  दिसण्याला ‘ट्रॅप’ म्हणतात. यामध्ये मुख्यतः महाराष्ट्राचा ८२ % भाग आणि त्याला लागून असलेल्या लगतच्या राज्यातील ( मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगाना ) काही भाग व्यापलेला आहे. हे लाव्हा रसाचे थर काही वेळा पाठोपाठ, तर काही काळात काही थोड्या कालांतराने, एकावर एक जमा झालेले आहेत.

दोन लाव्हा थरांच्या मधल्या सुप्त काळात खालील तळाच्या थरातील जमिनीवर उघड्या पडलेल्या खडकांची, वातावरणातील विविध कारकांमुळे धूप, झीज आणि त्यावेळच्या खड्ड्यातून गाळाचे संचयन होऊन काही भागातून थर निर्माण झाले. या गाळाच्या वहन आणि संचयन प्रक्रियेत त्याकाळातील वनस्पती आणि प्राण्यांचे अनेकविध अवशेष गाडले गेले; त्यातील काहींचे जीवाश्मात रूपांतर झाले. त्यानंतर या गाळाच्या थरांसह पहिल्या थरातील खडकांवर दुसरा थर पसरला गेला. अशा तऱ्हेने त्याकाळातील जीवाश्मांच्या अवशेषांसह दोन लाव्हा स्तरांमध्ये बंदिस्त रूपात आढळणाऱ्या गाळाच्या थरास अंतरा-ट्रॅपी थर म्हणतात. हे गाळाचे थर फक्त गोड्या पाण्यातील तलाव, नदी यांच्याशी संबंधित असून जमिनीवरील वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेषच मुख्यत्वे यात आढळून आलेले आहेत. उदा., नेचे, पाम, सूचिपर्णी वनस्पती, मासे, शंख, शिंपले, कासव, बेडूक, सरपटणारे प्राणी, कीटक इ. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या एकूण कालखंडाची, शास्त्रज्ञांनी तीन भागांत विभागणी केलेली असून त्यातील पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातील लाव्हा पसरलेल्या प्रदेशातच फक्त हे अंतरा-ट्रॅपी थर आढळलेले आहेत. असे कालांतराने सुप्त काळानंतर शेवटच्या टप्प्यातील आलेले थर, हे बहुतेक उद्रेक भेगीच्या जवळपास मुंबई, नर्मदा नदीच्या बाजूला तर पहिल्या टप्प्यातील आलेले थर हे बहुतेक दक्खन पठाराच्या परीघ परिसरातील मध्यप्रदेश, गुजरात, नागपूर, कर्नाटक या भागांतून आढळले आहेत. दक्खनपासून सध्या लांब असलेल्या, परंतु बहुधा पुरातन काळात जोडलेल्या स्थितीत असलेल्या, आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रू  भागातसुद्धा असे थर अभ्यासले गेले आहेत.

भारतात आढळणारे महत्त्वाचे अंतरा-ट्रॅपी थर: (१) राजमहाल टेकड्यांतले, उत्तर गोंडवनी काळातील (पहिल्या टप्प्यातील) – त्यांच्यात सायकॅइड व थोडे नेचे व शंकुमंत (सूचिपर्णी वृक्ष) यांचे विपुल जीवाश्म आढळतात. (२) सुमारे तृतीय कल्पाच्या प्रारंभाच्या (शेवटच्या टप्प्यातील) काळातील मुंबई भागातील ट्रॅप – यांच्यात पाम-वृक्षांचे, थोड्या द्विदलिकित वृक्षांचे व शंख, शिंपा, मासे, बेडूक, कासवे, कीटक, कवचधारी ( क्रस्टेशियन) इत्यादींचे जीवाश्म आढळतात.