ब्रिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट. यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते.
भारतामध्ये विविध प्रांतांमधून क्रांतिकारक आपापल्या पद्धतीने व उपलब्ध सामर्थ्यानिशी ब्रिटिश सत्तेला आव्हान देत होते. कानपूर येथे विविध प्रांतांतील क्रांतिकारकांची एक बैठक बोलावली. या बैठकीत क्रांतिकार्यासाठी विशेषतः शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैशाची नेहमी चणचण भासते व ती दूर करण्यासाठी दरोडे घालावेत, असे ठरले होते. श्रीमंत व्यापारी, भांडवलदार, उद्योगपती, सावकार यांच्या घरावर दरोडे घातल्यास लोकमत क्रांतिकार्याला प्रतिकूल बनते, त्याऐवजी सरकारी खजिन्यावरच दरोडा घालण्याची कल्पना रामप्रसाद बिस्मिल यांनी सुचविली. त्यासाठी शासकीय बँका, कार्यालये, कोषागार व पोस्ट कार्यालये अशा ठिकाणांची निवड करण्यात आली.
क्रांतिकारक अशा संधीचा शोध घेऊ लागले. सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली. लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली. यासाठी ९ ऑगस्ट १९२५ रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. पहारेकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून हवेत गोळीबार करत तिजोरी फोडली व त्यातील खजिना घेऊन जंगलात निघून गेले. केवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात. क्रांतिकारकांनी या घटनेमध्ये वापरलेले पिस्तुल जर्मन बनावटीचे होते. काही काळातच ही बातमी देशभर पसरली. सरकारी खजिन्याची मोठी रक्कम क्रांतिकारकांच्या हाती पडल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी केली.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांहून क्रांतिकारकांची धरपकड केली व त्यांतील चाळीस जणांना अटक केली. चौकशीअंती एकोणतीस क्रांतिकारक या घटनेशी संबंधित आढळले. सरकारने त्यांच्यावर कट रचणे व सरकारी खजिना लुटणे असे आरोप ठेवून खटला भरला. खटल्याचे कामकाज लांबले व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या क्रांतिकारकांना तुरुंगात वाईट वागणूक दिली. त्याविरुद्ध क्रांतिकारकांनी उपोषण केल्याने सरकारला त्यांच्या काही मागण्या मान्य कराव्या लागल्या. यावेळी सामान्य जनतेचा क्रांतिकारकांना पाठिंबा मिळाला होता. या एक वर्षाच्या कालावधीत क्रांतिकारकांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सोडविण्यासाठी अनेक योजना आखल्या, मात्र त्यांना अपयश आले. काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले. यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशीची, चौघांना आजन्म हद्दपारीची व अन्य क्रांतिकारकांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. कटातील मुख्य आरोपी व अनेक सरकारविरोधी कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.
सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले. तसेच या संघटनेच्या पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंग यांच्याकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रूपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) असे करण्यात आले (९ ऑक्टोबर १९२८). काकोरी कटामध्ये सहभागी असलेले आझाद लाहोर खटल्यामध्येही आरोपी होते. सरकारने त्यांना फरारी घोषित करून त्यांना पकडून देणाऱ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुढे २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथे आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत चंद्रशेखर आझाद शहीद झाले.
संदर्भ :
- गाठाळ, साहेबराव, आधुनिक भारत, औरंगाबाद, १९९८.
- शेट्टीवार के. मु. अर्वाचीन भारत, मुंबई, १९६७.
- देव, प्रभाकर, आधुनिक भारत, लातूर, १९९८.
समीक्षक : अरुणचंद्र पाठक