दूरध्वनी केबलीद्वारे अथवा रेडिओ अभिचालित पध्दतीने (Radio relay system) टंकलेखन यंत्रे एकमेकांना जोडलेली असतात. तसेच त्यांना मुद्रण सुविधा उपलब्ध असते. एका वापरकर्त्याने संदेश प्रेषित करताच तो दूरस्थित वापरकर्त्याला छापील स्वरूपात प्राप्त होतो. अशा प्रकारे संदेश प्रेषण-ग्रहण करताना दूरध्वनी आणि टंकलेखन व मुद्रण यंत्र यांपासून तयार झालेल्या संयुग्मित यंत्राचा वापर होतो. या यंत्राला एकत्रितपणे दूरमुद्रक किंवा दूरटंकलेखक (Teletypewriter) असे म्हणतात, तर या संदेशवहन प्रणालीला दूरमुद्रण (Teleprinting) असे म्हणतात.
इतिहास : संकेत ग्राहीने छिद्ररूप संकेत लिपीतील संदेशाचे नि:संकेतन करून संदेशाचे सरळ इंग्रजी मुळाक्षरांत टंकलेखन करता यावे, याकरिता ई.ई. क्लाइनश्मिट (E.E. Kleinschmidt) यांनी १९२० मध्ये प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच दूरमुद्रकाचा शोध लागला. दरम्यानच्या काळात अमेरिकेतील मॉरक्रम कंपनीमधील (Morkrum company, US) डोनाल्ड मुरे तसेच जर्मनीमधील सिमेन्स अँड हल्स्के-एजी कंपनी (Siemens & Halskey-AG Company, Germany) यांनीही दूरमुद्रक बनविण्यास सुरुवात केली. १९२४ मध्ये टेलिटाइप कॉर्पोरेशन या कंपनीने तयार केलेले दूरमुद्रक प्रसिध्द होते.
रचना आणि कार्यपध्दती : दूरमुद्रकामध्ये टंकलेखक यंत्राप्रमाणे कळफलक आणि मुद्रक असतो. हे दोन्ही विद्युत चलित्राला जोडलेले असतात. दोन दूरमुद्रक चापाद्वारे किंवा क्लचद्वारे (Clutch) एकमेकांशी संलग्न असतात. जेणेकरून आवश्यकतेनुसार ते कार्यान्वित करता येतील. संकेत प्रेषकाकडून प्रत्येक कळीच्या ठोक्याला (Key stroke) ठराविक विद्युत स्पंद संकेत तयार होतो. हा स्पंद संकेत इलेक्ट्रॉनिकीय स्विचिंगद्वारे लक्ष्य ठिकाणी (Destination) प्रेषित केला जातो. लक्ष्य केंद्रातील संदेश-ग्राही दूरमुद्रक येणाऱ्या स्पंदाचे नि:संकेतन करतो आणि तेथे असलेल्या टंकलेखन यंत्राच्या साहाय्याने तो पुन्हा मूळ रूपात कागदाच्या फितीवर छापील पृष्ठाच्या स्वरूपात मिळविला जातो.
कर्णबधिर व्यक्ती दूरध्वनीद्वारे संदेश ग्रहण करू शकत नाही. याकरिता दूरमुद्रक हा दूरध्वनी केबलीसोबत मोडेमद्वारे (अंकीय संकेताचे विरूपण- अविरूपणाद्वारे दृश्य संकेतामध्ये परिवर्तन करणाऱ्या साधनाद्वारे) संलग्न केला जातो. दर्शक दिवा संदेश आल्याचा संकेत देतो. काही दूरमुद्रकांमध्ये स्वयंचलित उत्तर देण्याची सुविधा असल्याने यंत्रचालकाची आवश्यकता नसते. इतर वेळी दूरध्वनी वापरात असताना दूरध्वनी करणाऱ्याला दूरध्वनी नाद (Ringtone) ऐकू येतो.
वर्तमानपत्र कार्यालये तसेच व्यापारी संस्थांमधून दूरमुद्रकाची यंत्रसामग्री बसविलेली असते. या यंत्रात संकेत ग्राहीजवळ कर्मचाऱ्याची जरूरी लागत नाही. कारण संकेत आला की, हे यंत्र आपोआप चालू होते व तो संपला की, ते आपोआप बंद होते.
दूरमुद्रकाच्या या मूलभूत विद्युत-यांत्रिक अभिकल्पावर (Electromechanical design) आधारित आधुनिक दूरमुद्रकांमध्ये चुंबकीय स्मृती आणि व्हिडिओदर्शक (Magnetic memory & video display) यांसारख्या विद्युत यंत्रणाही समाविष्ट आहेत.
लिपीप्रकार : दूरमुद्रकाद्वारे संदेशवहन करताना विविध लिप्या वापरात येतात. त्यांपैकी बोडॉट लिपी (Boudot code) ही एक होय. १९२० मध्ये ही लिपी वापरात आली. पाच एकक छिद्रांवर आधारित ही लिपी आहे आणि हिचा वेग मिनिटाला ६० ते १०० शब्द इतका असू शकतो. यामध्ये अक्षरे, अंक, विरामचिन्हे आणि कळफलक योजना एकूण ३२ प्रकारचे चालू-बंद स्पंद दर्शवितात.
१९६० मध्ये संदेश आदानप्रदानाच्या अमेरिकन आदर्श लिपीप्रकारानुसार (ASCII, American Standard Code for Information Interchange) सात एकक छिद्रांवर आधारित संकेत लिपी वापरात आली. हिचा वेग मिनिटाला सु. १५० शब्द इतका आहे. यामुळे १२८ प्रकारचे स्पंद तयार करता येतात. अशाप्रकारे लिपी वापरातून अनेक चिन्हप्रकार दूरमुद्रक प्रेषित करतो. कार्यक्षम टंकलेखक अशा दूरमुद्रकावर सहज काम करू शकतो.
उपयुक्तता : कर्णबधिर यंत्रचालकास दूरमुद्रकामुळे संदेश प्रेषण-ग्रहण कामकाजात मदत होते. अल्प खर्चिक यंत्रणा आणि जलद माहिती प्रेषण यांमुळे दूरमुद्रक व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त ठरतो.
संदर्भ : https://www.britannica.com/technology/teleprinter
समीक्षक : निलेश गायकवाड