राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टीने सैन्यदलांना देशावर होणाऱ्या शत्रूच्या कोणत्याही हल्ल्यांवर प्रतिबंध घालता आला पाहिजे. त्याचबरोबर आक्रमक कारवायांद्वारे शत्रूचे सामरिक बळ खच्ची करून अनुकूल परिणाम साधता आले पाहिजेत. यात इतर दोन्ही दलांबरोबर अवकाश आणि हवाई दलांचाही महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांना पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यांत युद्धकाळात आणि शांतताकाळात पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यांचा समावेश असतो. हवाई आणि अवकाश दलांची कार्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • आण्विक आणि परंपरागत नियंत्रण.
  • हवाई आणि अवकाशीय नियंत्रण.
  • इंटेलिजन्स संपादन.
  • सैनिक आणि युद्धसाहित्याची हालचालक्षमता.
  • आक्रमक कारवाया.
  • शांतताकाळात गरजेनुसार मदतकार्ये.

हवाई आणि अवकाशीय कारवाया : प्रतिरोध (Deterrent) : राष्ट्राची युद्धशक्ती आणि राजकीय इच्छाशक्ती या दोन गोष्टी संभाव्य शत्रूच्या राष्ट्रविरोधी आक्रमक कारवायांना प्रतिबंध घालण्यास समर्थ असल्या पाहिजेत. त्यामुळे कोणतीही पारंपरिक व अण्वस्त्र कारवाई हाती घेण्यात शत्रूवर डगमगण्याची वेळ येत असेल, तर देशाची प्रतिरोधशक्ती परिणामकारक ठरली आहे, असे म्हणता येईल. देशाच्या युद्धशक्तीच्या प्रतिरोधक्षमतेत हवाई आणि अवकाशीय शक्ती हा अग्रेसर घटक असतो.

हवाई नियंत्रण (Air Superiority)  : स्थलसेना, नौसेना आणि वायुसेना यांच्या कोणत्याही‒हवाई, भूतलीय आणि समुद्रामधील‒कारवायांच्या यशस्वी परिणामांसाठी हवाई नियंत्रण आवश्यक असते. हवाई नियंत्रण मिळविणे आणि आणि ते सुरळीत कार्यरत ठेवणे, हे हवाई शक्तीचे मुख्य लक्ष्य असले पाहिजे. हवाई नियंत्रण हे खालीलप्रकारे मिळविता येते.

  • आक्रमक हवाईविरोधी कारवाया (Offensive Counter Air Operations) : शत्रूचे हवाईक्षेत्र, विमाने, हवाई संरक्षणयंत्रणा, कमांड अँड कंट्रोल सुविधा यांसारख्या हवाई बळाच्या मुख्य घटकांवर हल्ले करून त्याची हवाईशक्ती खच्ची करण्यासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या आक्रमक कारवाया.
  • हवाई संरक्षणात्मक कारवाया (Defensive Air Operations) : राष्ट्रीय प्रादेशिक सुरक्षेसाठी आणि शत्रूच्या अवकाशीय व हवाई संभाव्य धोक्यापासून बचावासाठी हवाई सुरक्षादल तैनात करणे, हे हवाई दलाचे केवळ प्राथमिक कार्य नसून हवाई नियंत्रणाच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे.

इराक आणि अफगाणिस्तान युद्ध किंवा कारगिल युद्ध यांवरून सैन्यदलाच्या कारवायांमध्ये हवाई नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे असते, हे दिसून येते. हवाई नियंत्रण हे वायूबळासाठी प्राधान्यपूर्ण असते.

गुप्तचर यंत्रणा : सर्व राष्ट्रीय सुरक्षा संघटनांसाठी गुप्तचर यंत्रणा महत्त्वाची असते. विविध सूत्रांकडून एकत्रित केलेल्या माहितीचे मूल्यमापन करून आणि त्याचा ताळमेळ घालून तयार केलेली विश्लेषणात्मक माहिती म्हणजे गुप्तवार्ता. प्रतिकारात्मक कारवायांमध्ये समाविष्ट दलांना ती पुरविली जाते. अवकाशीय अथवा हवाई टेहळणी ही माहिती मिळविण्याचे एक साधन आहे. यंत्रणेच्या कारवाईमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतात :

  • अवकाश किंवा आकाशातून ड्रोनच्या साहाय्याने केलीली पाहणी.
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि संदेशवहन यांद्वारा अवकाश किंवा आकाशातून ठेवलेली पाळत.
  • विमानातून केलेली प्रत्यक्ष टेहळणी.

सैन्य आणि युद्धसाहित्याच्या हालचालक्षमता (Mobility) : विस्तारित आणि व्यापक धोक्यांविरुद्ध कारवायांसाठी सैन्यदलाच्या दृष्टीने हालचालक्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेअभावी देशाच्या प्रदीर्घ सीमांचे संरक्षण साधणे अशक्य होईल. याकरवी हवाईमार्गे सैन्य आणि युद्धसाहित्य जलद रीतीने स्थलांतरित करता येतेच; त्याशिवाय आपत्तीजनक परिस्थितीदरम्यान लोकांचे स्थलांतर करणे किंवा आवश्यक सामग्रीचा पुरवठा करणेही शक्य होते. यासाठी वाहतूक करणारी विमाने किंवा हेलिकॉप्टर्स यांचा वापर केला जातो. हवाई कारवायांद्वारा सैन्यदलांसाठी खालील स्थलांतरीय मदत पुरविली जाते.

  • हवाई रसदपुरवठाव्यवस्था : गरजेनुसार सैन्यदल आणि आवश्यक युद्धसाहित्याचे स्थलांतर.
  • हवाई वाहतूक कारवाया : सैन्यदल आणि आवश्यक युद्धसाहित्याचे युद्धक्षेत्राच्या पिछाडीच्या भागात स्थलांतर.
  • एअरबोर्न आणि हेलिबोर्न ऑपरेशन्स : पॅराशूट किंवा हेलिकॉप्टरद्वारे सैन्यदलाला प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात उतरविण्यासाठी स्थलांतर.

आक्रमणात्मक कारवाया : हवाई दलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही वेळेस व्यापक क्षेत्रात शत्रूविरुद्ध आक्रमणात्मक कारवाया हाती घेऊ शकते. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानातील लक्षणीय प्रगतीमुळे आता अपेक्षित लक्ष्याला अचूक टिपण्याची क्षमता, अचूक लक्ष्यवेध करणारे क्षेपणास्त्र आणि सर्व प्रकारच्या आक्रमणात्मक कारवाया यांच्यामध्ये एकसूत्रीपणा आला आहे. केवळ एकमेकांच्या ताकदीचे खच्चीकरण करण्यापेक्षा आता परिणामाधारित कारवायांवर अधिक जोर दिला जात आहे. लक्ष्यप्रणालीच्या हानीपेक्षा कार्यप्रणालीचे खच्चीकरण जास्त महत्त्वाचे मानले जाते. आक्रमणात्मक कारवाया खालीलप्रमाणे आहेत.

  • शत्रूविरोधात भूतलीय आणि हवाई कारवाया : उदा., आक्रमक हवाई प्रतिहल्ले, युद्धक्षेत्रात अनपेक्षित किंवा आकस्मिक हवाई आणि सागरी हल्ले.
  • शत्रूपक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विभागांवर आक्रमक कारवाया : उदा., शत्रूंची रसदपुरवठा, शस्त्रागारे, कम्युनिकेशन नेटवर्क आणि लष्करी मुख्यालय यांवर हल्ले.
  • शत्रूच्या इच्छाशक्ती आणि क्षमतेविरुद्ध केलेल्या कारवाया : उदा., युद्धासाठी आवश्यक पाठबळ देणाऱ्या वाहतूक, दळणवळण यांसारख्या सुविधा आणि राजकीय नेतृत्वावर केलेले हल्ले.

शांतताकाळातील कार्यवाही : शांतताकाळात हवाई दल खालील मदतकार्ये करतात :

  • आपत्तीजनकप्रसंगी बचावकार्यात सहभाग.
  • सामग्री आणि मानवी स्थलांतर.
  • हवाई सर्वेक्षण.
  • शत्रूप्रदेशाची पाहणी (रेकी).
  • राष्ट्रीय सैन्यबळाचे शक्तीप्रदर्शन.

संदर्भ :

  • Chun, Clayton K S. Aerospace Power in the Twenty-First Century : A Basic Primer, U.S. Air Force Academy, 2001.

                                                                                                                                                                                      समीक्षक ‒ शशिकांत पित्रे

                                                                                                                                                                                      भाषांतरकार ‒ वसुधा माझगांवकर