सुब्रमण्यन्, के. जी. : (१५ फेब्रुवारी १९२४ – २९ जून २०१६). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार, शिल्पकार व भित्तिचित्रकार. कलेतिहासकार व समकालीन कलेचे भाष्यकार म्हणूनही प्रसिद्ध.

संपूर्ण नाव कलपथी गणपथी सुब्रमण्यन्. मणिसर, मणिदा, के. जी. अशा टोपणनावांनीही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म केरळमधील कुथुपारांबा येथे झाला. वडील गणपथी अय्यर महसूलनिरीक्षक होते. आई गृहिणी होत्या. मणिदा हे त्यांचे आठवे अपत्य. शारीरिक अस्वास्थ्यामुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. शालेय जीवनात त्यांनी कार्ल मार्क्स, म. गांधी, स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य वाचले होते, तसेच आनंद कुमारस्वामी यांचे मध्ययुगीन सिंहली कला हे पुस्तकही त्यांच्या वाचनात आले होते. या काळात म. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. म. गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात ते सामील झाले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त करण्यासाठी चेन्नई (मद्रास) येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता; परंतु तेथे त्यांनी छोडो भारत आंदोलनासाठी पुढाकार घेऊन संप घडवून आणला. त्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन जीवन संपुष्टात आले व त्यांना सहा महिने तुरुंगवास घडला.

मणिदांना वाचनाप्रमाणे लहानपणापासून चित्रकलेचीही आवड होती. त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने मद्रासमधील कॉलेज ऑफ आर्ट या संस्थेतील कलाशिक्षक के. सी. एस. पण्णीकर यांना दाखविली. पण्णीकर यांनी संस्थेचे प्राचार्य देविप्रसाद रॉय चौधुरी यांना ही चित्रे दाखविली. प्राचार्यांनी मणिदांना कलासंस्थेमध्ये प्रवेश देण्यास संमती दिली. पोलीस निरीक्षकपदी असलेले वडीलबंधू नारायण स्वामी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील मणिदांचा सहभाग आणि त्याचे झालेले परिणाम लक्षात घेऊन त्यांना शांतिनिकेतनमध्ये कलाशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले. १९४४ ते १९४८ या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी मणिदांनी शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यालयाच्या कलाभवन येथे प्रवेश घेतला. नंदलाल बोस, रामकिंकर बैज आणि विनोद बिहारी मुखर्जी या कलाशिक्षकांशी त्यांचा संपर्क आला. त्यातही त्यांची जवळीक विनोद बिहारींशी जास्त राहिली. मणिदांनी नंदलाल बोस यांच्याकडून मुक्त विचारशैली, तसेच रामकिंकर बैज यांच्याकडून धगधगती सर्जनशीलता आत्मसात केली.

कला – अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात मणिदांना भव्य भित्तिचित्रण (म्यूरल पेंटिंग) करण्याची संधी मिळाली. ती त्यांच्या भविष्यातील सर्जनशील कलाविष्काराला पूरक ठरली. शांतिनिकेतनमध्ये मणिदांवर चांगले संस्कार झाले. त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळविले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर तसेच गुरू विनोद बिहारी मुखर्जी यांच्या चित्रकलाविषयक बंगाली लेखनाचे त्यांनी इंग्रजी भाषेत भाषांतर केले. शांतिनिकेतनमधील कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर मणिदा यांनी हरयाणा प्रांतात काही काळ वास्तव्य केले (१९४९). या वेळी त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांच्या पुनःस्थापनेसाठी कालखंडात त्यांनी सुशीला जसरा यांच्याशी विवाह केला. सुशीला यांच्याशी त्यांचा परिचय शांतिनिकेतनमध्येच झाला होता.

मणिदा यांनी चित्रकलेत माती, विणकाम, काच, पक्वमृदा अशा वेगवेगळ्या माध्यमांना अभिव्यक्तीचे साधन मानले. विणकाम आणि मुलांसाठी खेळणी बनवण्याचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यांचा भारतीय मूल्यांवर विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी लोककथा, पौराणिक कथा, मिथक आणि तांत्रिक कथांचा समावेश आपल्या कलेत केला. भारतीय परंपरेतील या समृद्ध साधनांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यांनी मुलांसाठी काही आनंददायी लेखन केले, तसेच त्यांचे चित्रण केले. कलाकार आणि कारागीर यांतील तफावत दूर करण्यात मणिदांचा मोठा वाटा होता.

मणिदा यांनी बडोद्याच्या ललितकला विभागात अध्यापक म्हणून काम केले (१९५१–५९). संस्थेतील कलार्थ्यांची स्वतंत्र विचारसरणी जोपासावी, या संस्थेच्या धोरणाला त्यांनी सर्वार्थाने न्याय दिला. कलाशिक्षकी यशस्वी रीत्या सांभाळत त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या, अभ्यासाच्या आणि चिंतनाच्या बळावर आपले मौल्यवान विचार विविध ठिकाणी भाषणांद्वारे मांडले. त्यांच्या भाषणांची पुस्तके वेळोवेळी छापली गेली. त्यांना लंडनमधील स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्टमध्ये ब्रिटिश कौन्सिलतर्फे संशोधन छात्रवृत्ती (fellowship) मिळाली (१९५५-५६).

मणिदा यांनी ऑल इंडिया हँडलूम बोर्डमध्ये  उपसंचालक पद भूषविले (१९५९-६१). बडोदा विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनच्या कलाभवनमध्ये प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली (१९८०–८९). भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि २०१२ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वडोदरा (बडोदा) येथे त्यांचे निधन झाले.

समीक्षक – महेंद्र दामले

प्रतिक्रिया व्यक्त करा