हेन्री, द नेव्हिगेटर (Henry the Navigator) : (४ मार्च १३९४ – १३ नोव्हेंबर १४६०). पोर्तुगालचा राजकुमार व पोर्तुगीज समन्वेषण मोहिमांचा आश्रयदाता. आफ्रिकेचा पश्चिम किनारा व मादीरा बेटांच्या समन्वेषणाचा पुरस्कर्ता म्हणून ते विशेष प्रसिद्ध ठरले. हेन्री यांचा जन्म पोर्तुगालमधील पोर्तु येथे झाला. पोर्तुगालचा राजा जॉन पहिला व राणी फिलीपा (इंग्लंडमधील जॉन ऑफ गाँटची मुलगी) यांचे हेन्री हे तिसरे अपत्य. द्वार्ते (एडवर्ड) व पेद्रो हे त्यांचे थोरले भाऊ, तर फर्नांदो हे धाकटे भाऊ होय. द्वार्ते, पेद्रो व हेन्री यांचे शिक्षण त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली झाले. त्यांना युद्धशास्त्र, मुत्सद्दीपणा, खगोलशास्त्र इत्यादी विषयांचे शिक्षण देण्यात आले. द्वार्ते व पेद्रो यांचा विवाह झाला; परंतु हेन्री अविवाहित राहिले.

हेन्री यांनी पुरस्कृत केलेल्या समन्वेषण मोहिमांचा लाभ भूगोलाच्या प्रगत अभ्यासासाठी, यूरोपमध्ये पोर्तुगालला नौपरिवहनात अग्रस्थान प्राप्त करून देण्यात व पोर्तुगीज वसाहतींचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी झालेला होता. हेन्री यांनी पन्नासपेक्षा अधिक सफरी पाठविल्या. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना ‘द नेव्हिगेटर’ या गुणनामाने संबोधले होते; परंतु ते स्वतः कोणत्याही समन्वेषण मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले नव्हते. त्यामुळे पोर्तुगीज लेखकांनी नेव्हिगेटर या नावाचा क्वचितच उल्लेख केलेला आढळतो. त्यांच्या कृपाछत्राखाली पोर्तुगालमध्ये मानचित्रकलेत आधुनिक तंत्रज्ञान आले; मार्गनिर्देशन उपकरणांत सुधारणा घडवून आणल्या गेले; सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात वृद्धी केली; तसेच पोर्तुगीज कॅरव्होल या नावाने ओळखली जाणारी शिडाचीजहाजे विकसित केली. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करून भारताकडे जाण्यासाठी सागरी मार्ग शोधणे व सागरी मार्गाने व्यापारास उत्तेजन देणे हे त्यांच्या समन्वेषण मोहिमांचे मुख्य उद्दिष्ट होते.

मोरोक्कोतील मुस्लिमांचे जिब्राल्टर सामुद्रधुनीतील स्यूता हे मोक्याचे बंदर जिंकण्याच्या मोहिमेत हेन्री यांचा सहभाग होता (१४१५). हीच त्यांच्या कर्तृत्वाची तसेच पोर्तुगालची सागरपार प्रदेशातील विस्ताराची सुरुवात होती. हेन्री हे १४१५ ते १४१८ या कालावधीत स्यूताचा गव्हर्नर होते. मोरोक्कोचा मुस्लिम शासक आणि स्पेनमधील ग्रानाडा राज्याचा शासक यांनी एकत्र येऊन स्यूताचा परत ताबा मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (१४१८). स्यूतामधून पोर्तुगालला परतल्यानंतर हेन्री यांना व्हिसेऊ प्रदेशाचा ड्यूक, तर काव्हिला प्रदेशाचा श्रीमान (लॉर्ड) ही पदे बहाल करण्यात आली. तसेच त्यांची पोर्तुगालमधील एक श्रीमंत संस्था ‘ऑर्डर ऑफ क्राइस्ट’च्या महाप्रशासकपदी १४२० मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांस आफ्रिकेच्या पारंपरिक वस्तू, गुलाम व सोन्याच्या व्यापारात सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. प्रामुख्याने १४२० पासून त्यांनी सफरी पाठविण्यास सुरुवात केली. हेन्री यांचे वास्तव्य सॅग्रेस येथे असे. सॅग्रेसनजीक त्यांनी व्हिला दो इन्फँटे येथे समन्वेषणासाठी तळ उभारला होता. तसेच तेथे वेधशाळा, भूगोलाच्या अभ्यासासाठी विद्यालय सुरू केले होते. तेथे ते मार्गनिर्देशक व मानचित्रकार यांच्याशी विचारविनिमय करत असे. तसेच मार्गनिर्देशनाच्या दृष्टीने उपयुक्त भौगोलिक माहिती व तक्त्याची (चार्टची) जुळणी करत असे. सागरी साहसी मार्गनिर्देशक व समन्वेषकांचे हे प्रसिद्ध केंद्र बनले होते. हेन्री यांनी मोहिमेवर पाठविलेले जुआंव गाँसाल्वी झाकू व त्रिशताउँ व्हाझ तेशेर हे समन्वेषक १४२० मध्ये मादीरा द्वीपसमूहातील मादीरा व पोर्तु सांतु बेटांवर पोहोचले. जेओनीज लोकांनी यापूर्वीच्या शतकात या दोन्ही बेटांना भेट दिली होती. पोर्तुगीजांनी येथे वसाहती स्थापन केल्या. मादीरा बेटावर आफ्रिकन गुलामांच्या साहाय्याने ऊस लागवड करून साखरेपासून मोठ्या प्रमाणात नफा मिळविला. त्यामुळे गुलामांद्वारे मळे लागवडीचे उदाहरण म्हणून मादीरी ओळखले जाऊ लागले.

हेन्री यांनी पुरस्कृत केलेल्या मोहिमेतील सहभागी समन्वेषक १४३२ मध्ये अझोर्स बेटावर पोहोचले. १४३३ मध्ये किंग जॉन यांचा उत्तराधिकारी म्हणून हेन्री यांचा थोरला भाऊ द्वार्ते सत्तेवर आला. हेन्री यांचे व्यक्तिमत्व तपस्वी व तटस्थ असे होते. हेन्री यांनी पोर्तुगालच्या फायद्यासाठी उदात्त हेतूने समन्वेषण मोहिमा पाठवीत होते; परंतु द्वार्ते यांच्या मते, ही सर्व उधळपट्टी होती. या मोहिमांतून होणाऱ्या फायद्यांबाबतच शंका उपस्थित करून त्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी काकू करू लागला. आफ्रिकेच्या किनाऱ्याने जास्तीत जास्त दक्षिणकेकडे जाण्यासाठी हेन्री यांनी आपल्या कप्तानांचे मन वळविले. त्यानुसार मोहिमेवर पाठविलेल्या झिल यानीश या नाविकाने आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील केप बॉजदॉर या भूशिराभोवती १४३४ मध्ये फेरी घातली. त्यानंतर हेन्री यांचे कप्तान रिओ दे ओरोच्या काहीसे दक्षिणेस गेले होते. हेन्री यांचे हे फार मोठे यश होते. त्या काळात यूरोपियनांना आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील सर्वांत दक्षिणेकडील ज्ञात ठिकाण म्हणजे केप बॉजदॉर होते. त्याच्याही दक्षिणेकडे समन्वेषण मोहीम पाठविण्याचा निश्‍चय हेन्री यांनी केला. हेन्री व पेद्रो यांच्या सूचनेनुसार नव्याने शोधलेल्या प्रदेशांत वसाहती स्थापन करण्यात येऊ लागल्या.

हेन्री यांच्या लक्षात आले की, स्यूताच्या संरक्षणासाठी तसेच महसूल प्राप्तीसाठी स्यूताच्या सभोवतालचा भाग आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने हेन्री व त्यांचा धाकटा भाऊ फर्नांदो यांनी तँजिअरवरील मोहिमेसाठी द्वार्ते यांच्याकडून परवानगी मिळविली; परंतु पेद्रो यांनी या मोहिमेला विरोध केला. नवीन भूप्रदेशाचा शोध घेण्याचे सोडून अशा मोहिमेवर जाणे म्हणजे पोर्तुगालच्या मूळ हेतूपासून फारकत घेण्यासारखे आहे. तरीही हेन्री आणि फर्नांदो यांनी तँजिअरवर १४३७ मध्ये हल्ला केला; परंतु हा हल्ला आपत्तीकारक ठरला. मूर लोकांनी फर्नांदोला पकडून बंदीवासात ठेवले. तेथे त्यांचा खूप छळ केला गेल्यामुळे १४४३ मध्ये फेस येथे त्यांचे निधन झाले. हेन्री यांचे अयोग्य सेनापतीत्व व नियोजन हेच यातून स्पष्ट झाले. हेन्री पोर्तुगालला परतण्याआधीच १४३८ मध्ये किंग द्वार्ते यांचे निधन झाले होते. तेव्हा द्वार्ते यांचा अवघ्या सहा वर्षे वयाचा मुलगा पाचवा अफान्सो हा त्याच्या आईच्या राजमुखत्याराखाली सत्तेवर आला. या कालावधीत हेन्री यांना आपल्या मोहिमांसाठी अनुकूलता लाभली. पोर्तुगालच्या अर्थव्यवस्थेत बळकटी आणण्यासाठी आफ्रिकेत सोन्याचा शोध घेऊन ते पोर्तुगालला आणणे, हा त्यांचा एक उद्देश होता. स्यूताच्या मूर लोकांकडून त्यांनी आफ्रिकेतील सोन्यासंबंधी ऐकले होते. हेन्री मोठ्या साहसी उपक्रमांवर पैशाचा अपव्यय करीत आहे, ही त्यांच्यावर होणारी टीका हेन्री यांच्या तत्कालीन समन्वेषकांनी १४४१ मध्ये आफ्रिकेतून पोर्तुगालमध्ये सोने व गुलाम आणल्यामुळे शमली होती.

 

हेन्री यांने पाठविलेला दिनीस दिआस हा जलप्रवासी १४४५ मध्ये सेनेगलच्या नदी मुखाजवळ जाऊन पोहचला. त्यानंतर १४४६ मध्ये नुनो तिस्तॅओ हा कप्तान गँबिया नदीकाठावर पोहोचला. त्यानंतरच्या दोन वर्षांत हेन्री यांचे कप्तान सिएरा लिओनमधील गेबा नदीपर्यंत पोहोचले. हेन्री यांच्या आयुष्यात शोधल्या गेलेल्या ठिकाणांपैकी हे सर्वांत दक्षिणेकडील ठिकाण होते; परंतु एका पुराव्यानुसार आयव्हरी कोस्ट किनाऱ्यावरील केप पाल्मस्पर्यंत त्यांचे समन्वेषक गेल्याचे सांगितले जाते. हे ठिकाण गेबा नदीपासून दक्षिणेस सुमारे ६४० किमी.वर आहे. १४४८ मध्ये गुलामांचा व्यापार बराच वाढला. आर्ग्वीन बेटावरील किल्ल्याच्या व वखारीच्या बांधकामासाठी या गुलामांचा वापर करून घेतला. यूरोपीयांचे त्या काळातील हेच पहिले सागरपार व्यापारी ठाणे होते.

सॅग्रेसवरून राजदरबारात परतल्यानंतर आपला पुतण्या व राजा पाचवा अफान्सो आणि भाऊ पेद्रो यांच्यातील बिघडलेल्या संबंधांत ऐक्य साधण्याचा अयशस्वी प्रयत्न हेन्री यांनी केला. त्यांच्यात संघर्ष अपरिहार्य झाला. तेव्हा हेन्री यांना राजाची बाजू घेणे भाग पडले. त्यांनी प्रत्यक्ष चकमकीत भाग घेतला नाही; परंतु दुर्दैवाने अल्फारोबेरा येथे बाण लागून पेद्रो मारला गेला. कुटुंबांतर्गत वैर भावनेतून आलेल्या उद्वेगामुळे देशत्याग करून स्यूताला जावे आणि उर्वरित आयुष्य मूर लोकांशी लढण्यात घालवावे असा त्यांनी निर्धार केला; परंतु राजाने तशी परवानगी नाकारली. पन्नास वर्षानंतरच्या इतिहासकारांनी हेन्री यांच्याबद्दल असा शेरा मारला की, ज्या वेळी पेद्रो यांना संकटातून वाचविणे आवश्यक होते, त्या वेळी हेन्री त्यांना सोडून गेले. याच्या उलट हेन्री यांचा चरित्रकार झुआरा म्हणतो की, पेद्रो यांना वाचविण्याचा हेन्री यांनी आटोकाट प्रयत्न केला होता.

अल्फारोबेरो येथील घटनेनंतर हेन्री यांनी बहुतांश काळ सॅग्रेस येथे घालविला. आफ्रिकेतील गिनीच्या किनाऱ्याकडे व्यापारासाठी जहाजे पाठविण्यात हेन्री यांना राजाकडून संमती मिळाली. अधूनमधून ते लिस्बनला राजदरबारात येत असे. आयुष्यातील अखेरच्या दशकात त्यांनी मोहिमा पुरस्कृत करण्यावर विशेष भर दिला. फक्त नवीन प्रदेशाच्या शोधापेक्षा आपल्या संपर्कातील प्रदेशांचीच व्यापारी संबंध ठेवण्यात राजाला रस होता. त्यामुळे केवळ काही लहान मोहिमाच आखल्या गेल्या. अखेरच्या सफरीवर त्यांनी व्हेनेशियन मार्गदर्शक व समन्वेषक अल्व्हाइज काडा रोस्टो (काडारोस्टो) आणि पोर्तुगीज समन्वेषक द्योगू गोमिश यांना पाठविले. त्यांनी केप व्हर्दमधील काही बेटांचा शोध लावला.

पाचवा अफान्सो यांनी १४५८ मध्ये आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील ॲल्कसे सेग्वेर (क्सार एस-श्रीहिर) ताब्यात घेण्यासाठी जी यशस्वी मोहीम केली त्यात हेन्री सहभागी होते. आफ्रिकेकडील हेन्री यांची ही अखेरची मोहीम होती. त्यानंतर ते सॅग्रसला परतले. समन्वेषण मोहिमांमध्ये फार मोठी गुंतवणूक केल्यामुळे ते खूप कर्जबाजारी झाले होते. त्यांचे खाजगी आयुष्य तसे शोकात्मिकांनी भरलेले आहे. हेन्री हे देशाच्या हितासाठी निश्चित असा समन्वेषण व संशोधन आराखडा तयार करणारे आणि पोर्तुगीज राष्ट्रवादाचा प्रतीक समजले जात होते. पोर्तुगीजांद्वारे केलेल्या समन्वेषण व शोध मोहिमांच्या युगाचा उद्गाता असे त्यांना मानण्यात येते. कल्पक युद्धतंत्रज्ञ म्हणूनही ते प्रसिद्ध असून आफ्रिकेच्या वायव्य भागातील मूर मुस्लिमांविरोधातील त्यांच्या कार्यामुळे धर्मयुद्धातील वीर असेही त्यांला संबोधले जाते. पोर्तुगीज महाकाव्यकार कामाँइश यांनेही हेन्री यांच्या कामगिरीची प्रशंसा केली होती.

हेन्री यांचे सॅग्रेसजवळील व्हिला दो इन्फँटे येथे निधन झाले.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम