सोतो, दे एर्नांदो (Soto, de Hernando) : (२७ ऑक्टोबर १४९५? – २१ मे १५४२). मिसिसिपी नदी, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा आग्नेय भाग व मध्य अमेरिका यांचे समन्वेषण करणारा स्पॅनिश समन्वेषक. त्यांचा जन्म स्पेनमधील बॉथाहोस प्रांतातील बार्कारोता येथे झाला. त्यांचे बालपण हेरेझ द लोस काबायेरोस येथे गेले. त्यांच्या वडिलांनी त्यांना वकील करण्याचे ठरविले होते; परंतु लहान वयातच त्यांनी वेस्ट इंडीजला जाण्याची इच्छा त्यांच्या वडिलांजवळ प्रकट केली. त्यासाठी ते सेव्हिल येथे गेले. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचे धाडस व अश्वारोहणातील चपळाई यांमुळे त्यांना इ. स. १५१४ मध्ये पेद्रो आर्यास दे आव्हिला या पनामाच्या स्पॅनिश गव्हर्नरसमवेत डॅरिएन येथे जाण्याची संधी मिळाली. धाडसी व परिश्रम करण्याची वृत्ती यांमुळे पनामामध्ये एक चांगला समन्वेषक व व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. १५१६ ते १५२४ या कालावधीत त्यांनी रेड इंडियनांविरुद्धच्या अनेक साहसी लष्करी मोहिमांचे नेतृत्व केले. तसेच आव्हिलाच्या समवेत उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा व अंतर्गत भागाचे समन्वेषण केले. १५२० च्या सुमारास त्यांनी निकाराग्वा व पनामा संयोगभूमीच्या प्रदेशात गुलामांचा व्यापार करून भरपूर संपत्ती मिळविली. १५२४ ते १५२७ या कालावधीत निकाराग्वावरील नियंत्रणाच्या अधिकारावरून हील गाँथालेथ दे आव्हिला याच्याशी त्यांचा संघर्ष होऊन त्यात त्यांचा विजय झाला. त्यानंतर निकाराग्वाचा लष्करी कमांडर म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले.

सोतो यांनी १५३१ ते १५३६ या कालावधीत आव्हिला व फ्रांथीस्को पिझारो यांच्यासमवेत अनुक्रमे मध्य अमेरिका व पेरू यांच्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. १५३१ मध्ये आव्हिलाचा मृत्यू झाला व सोतो हे पिझारोच्या मोहिमेत सामील झाले. त्यांना मोहिमेचा कॅप्टन करण्यात आले. पेरूतील इंकां साम्राज्याच्या विरुद्ध मोहिमेत सोतो यांनी चांगली कामगिरी बजावली. १५३२ मध्ये काहामार्का येथे इंकांचा पराभव झाला व पुढे कूस्को ही त्यांची राजधानीही स्पॅनिशांच्या ताब्यात आली. इंकांचा सम्राट अतावाल्पा याच्याशी संघर्ष करणारे हे पहिले यूरोपीय असावेत, असे मानले जाते. या कालावधीत सोतो यांनी भरपूर संपत्ती मिळविली व १५३६ नंतर ते स्पेनला परतले. त्यांनी आव्हिलाची मुलगी इझाबेल दे बोबॉथील्यॉ हिच्याशी विवाह केला. मध्य अमेरिकेतील त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे स्पेनचा राजा पाचवा चार्ल्स यांनी क्यूबाचा गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक केली व त्याबरोबरच सांप्रतच्या फ्लॉरिडा प्रदेशाचे समन्वेषण करण्याचे अधिकारही त्यांना दिले. त्यामुळे १५३८ मध्ये सोतो हे हाव्हॅना (क्यूबा) येथे गेले. या काळात सोन्याच्या शोधासाठी उत्तर अमेरिकेच्या मध्य व आग्नेय प्रदेशांत स्पर्धा चालू होती. सोतो यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली १५३९ मध्ये उत्तर अमेरिकेच्या समन्वेषणाची मोहीम आखली व त्याच वर्षी ते फ्लॉरिडाच्या किनाऱ्यावर टँपा बेजवळ पोहोचले. सोन्याच्या शोधार्थ ही त्यांच्या धाडसी मोहिमेची सुरुवात होती. १५३९ ते १५४१ या काळात त्यांनी जॉर्जिया, कॅरोलायना, टेनेसी त्यानंतर दक्षिणेस ॲलाबॅमा या प्रदेशांत सोन्याचे शोधकार्य केले; परंतु त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. १५४० मध्ये ॲलाबॅमा येथे रेड इंडियनांबरोबरच्या लढाईत ते जखमी झाले. त्या वेळी त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले व युद्धसाहित्यही नष्ट झाले. एक महिन्यानंतर ते पुन्हा उत्तरेकडे परतले; परंतु त्यांचा हा निर्णयसुद्धा दुर्दैवी ठरला. रेड इंडियनांनी हल्ले करून त्यांना हैराण केले. याच प्रवासात २१ मे १५४० रोजी त्यांना मिसिसिपी नदीचा शोध लागला. या नदीचा शोध लावणारे व ती नदी ओलांडणारे ते पहिले यूरोपीय मानले जाते. पुढे आर्कॅन्सॉ, लुइझिॲना या प्रदेशांचे समन्वेषण करून ते मिसिसिपी नदीकडे परत आले; परंतु १५४२ मध्ये या नदीच्या किनारी भागाच्या मोहिमेवर असताना ते तापाने आजारी पडले व त्यातच त्यांचे पूर्वीच्या लुइझिॲना राज्यातील फेरिडे येथे निधन झाले. रेड इंडियनांकडून त्यांच्या देहाचा अनादर होऊ नये म्हणून त्यांच्या सोबत्यांनी झाडाच्या एका ओंडक्यामध्ये त्यांचा देह ठेवून तो मिसिसिपी नदीमध्ये बुडविला. पेरूतील एक सर्वोत्कृष्ट लेखक व इतिहासकार रिकार्दो पाल्मा (१८३३ – १९१९) यांनी सोतो यांचे ‘सूर्यपुत्रालाही जिंकणारा सच्चा स्पॅनिश सहृदयी सद्गृहस्थ’ असे वर्णन केले आहे.

समीक्षक : वसंत चौधरी