दशोपनिषदातील आकाराने लहान पण अतिशय आशयघन असलेले माण्डूक्योपनिषद हे अथर्ववेदाचे उपनिषद आहे. या उपनिषदाचा कर्ता अज्ञात असून याचा काळ इ.स.पू. ११०० ते १००० मानला जातो. यामध्ये केवळ बारा गद्यमय मंत्र आहेत.

आद्य शंकराचार्यांचे गुरू गौडपादाचार्य यांनी या मंत्रांचा अर्थ विशद करण्यासाठी चार प्रकरणांत एकूण २१५ कारिका लिहिल्या आहेत. या कारिकांमधून मंत्रांचा आशय विस्ताराने स्पष्ट केला आहे. या कारिकांवर आद्य शंकराचार्यांनी भाष्य लिहिले आहे. मूळ अत्यंत लहान असलेल्या या उपनिषदाचा कारिका आणि भाष्य यांसहित मोठा विस्तार झाला आहे. गौडपादाचार्यांनी माण्डूक्योपनिषदावर कारिका रचल्या असल्या, तरी त्या कारिका म्हणजे एक स्वतंत्र उपनिषद असावे अशा प्रकारची रचना आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

या उपनिषदाचा ‘ॐकार’ हा प्रमुख प्रतिपाद्य विषय आहे. हा विषय प्रकरणानुसार पुढीलप्रमाणे मांडला आहे : प्रथम प्रकरणाचे नाव ‘आगम’ असून यात २९ कारिका आहेत. ॐकाराचे ज्ञान म्हणजेच आत्म्याचे ज्ञान असे प्रतिपादन करून या ज्ञानाच्या व्याप्तीचा विचार यात मांडला आहे. द्वितीय प्रकरणाचे नाव ‘वैतथ्य’ असून यात ३८ कारिका आहेत. वैतथ्य म्हणजे विपरीत ज्ञान. दोरीवर सर्पाचे ज्ञान होणे, हे विपरीत ज्ञान. दोरीचे यथार्थ ज्ञान झाले की, सर्पाचा भास नष्ट होतो. त्याप्रमाणेच द्वैतमय संसाराचे यथार्थ ज्ञान झाले की, संसार असत्य आहे याचे ज्ञान होते. हा अनुभव या वैतथ्य प्रकरणात मांडला आहे. तृतीय प्रकरणाचे नाव ‘अद्वैत’ असून यात ४८ कारिका आहेत. मूळ वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा होणारा भास पूर्णपणे नाहीसा झाल्यावर मूळ वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान होते. द्वैत नष्ट होऊन एकच स्वरूप शिल्लक राहाते. तेच साक्षात ब्रह्म असून तेच एकमेव अविनाशी सत्य आहे, याचे विश्लेषण या प्रकरणामध्ये आहे. चतुर्थ प्रकरणाचे नाव ‘अलातशांति’ असून यात १०० कारिका आहेत. यामध्ये ज्ञानाला विरोध आणणाऱ्या मिथ्या द्वैतवादाचे निराकरण गौडपादाचार्यांनी केले आहे.

या उपनिषदाच्या प्रारंभी ‘ॐ भद्रं कर्णेभि:….’ हा शांतिमंत्र म्हटला जातो. प्रत्यक्ष उपनिषदाचा पहिला मंत्र असा : ‘ॐ ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानम्। भूतं भवत् भविष्यदिति सर्वमोंकार एव। यच्चान्यत् त्रिकालातीतं तदप्योंकार एव।’ याचा अर्थ : भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्व काळांत जे आहे, ते सर्व ॐकारच आहे. याशिवाय त्रिकालातीत असे जे काही आहे, तेही ॐकारच आहे. ॐ हे एक अक्षर असून ते सर्व काही आहे. माण्डूक्योपनिषदाच्या या पहिल्या मंत्रातूनच या उपनिषदाच्या प्रतिपादनाचा मुख्य विषय समजतो.

यानंतरच्या मंत्रांमध्ये ॐकार हेच ब्रह्म आहे, हाच आत्मा आहे आणि हा आत्मा चार पादांचा आहे, असे वर्णन येते. वैश्वानर (विश्व), तैजस, प्राज्ञ आणि अमात्र या चार पादांचा जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय या आत्म्याच्या चार अवस्थांशी असलेला अनुबंध उपनिषदाच्या या मंत्रांमध्ये वर्णिला आहे. तसेच आत्म्याच्या पादांचा आणि ॐकाराच्या मात्रांचाही संबंध दर्शविला आहे.

पहिला पाद वैश्वानर असून त्याचे स्थान जागृती आहे. वैश्वानर हा पाद म्हणजे ॐकाराची ‘अ’ ही पहिली मात्रा आहे. द्वितीय पाद हा तैजस असून त्याचे स्थान हे स्वप्नावस्था आहे. हा पाद म्हणजे ॐकाराची ‘उ’ ही दुसरी मात्रा आहे. तिसरा पाद ‘प्राज्ञ’ नावाचा असून याची सुषुप्ती अवस्था आहे. हा पाद म्हणजे ॐकाराची ‘म्’ ही तिसरी मात्रा आहे. ‘अमात्र’ अर्थात मात्राशून्यता हा ॐकाराचा चवथा पाद आहे. याचे वर्णन या उपनिषदाच्या शेवटच्या मंत्रात आले आहे. वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञ हे पाद गोचर असून सूक्ष्माकडून सूक्ष्मतराकडे जाणारे आहेत. आत्म्याचा चतुर्थ पाद सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. तो इंद्रियगोचर नाही. अन्य पाद गोचर आहेत. हा गोचर भाग पूर्णपणे विरून गेला तरच आत्म्याच्या चतुर्थ पादापर्यंत जाता येते. त्यानंतर मिळणारा आनंद हा अक्षय असतो. या आनंदामध्येच द्वैत संपून अद्वैताचा अनुभव येतो. या अवस्थेला ‘तुरीयावस्था’ म्हणतात. ही अवस्था प्राप्त होणे म्हणजेच आत्मरूपाचा अनुभव घेणे, आत्मा ॐकारमय आहे हे ज्ञान होणे. हीच परमोच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी माण्डूक्योपनिषदात ॐकारोपासना सांगितली आहे.

संदर्भ :

  • अभ्यंकर, शं. वा. भारतीय आचार्य, पुणे, २००१.
  • गोयंदका, हरिकृष्ण दास, ईशादि नौ उपनिषद, गोरखपूर, २०१६.
  • देवधर, स. कृ. मुण्डकोपनिषद व माण्डूक्योपनिषद, पुणे, १९८८.
  • http://vedicheritage.gov.in/upanishads/mandukyopanishad/

                                                                                                                                                             समीक्षक : भाग्यलता पाटस्कर