इनाक,कोलकलूरी : (१ जुलै १९३९). प्रसिद्ध भारतीय तेलुगू साहित्यिक. भाषा अभ्यासक आणि अध्यापक म्हणून ते सर्व परिचित आहेत. तेलुगू साहित्यात दलित, स्त्रीवादी, अल्पसंख्यांकवादी आणि आदिवासी लेखक अशी अनेक अंगांनी त्यांची ओळख करून दिली जाते ; मात्र आपण तेलुगू साहित्यिक आहोत अशी नम्र भूमिका ते घेतात. कविता, कथा, समीक्षा, नाटक आणि बालसाहित्य अशा सर्वच साहित्यप्रकारात त्यांनी तेलुगू भाषेत लेखन केले आहे. तेलुगू ते इंग्रजी आणि इंग्रजी ते तेलुगू असा द्विस्तरीय अनुवादही त्यांनी केला आहे. त्यांच्या साहित्याचे देशविदेशातील प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील वेज्ंद्ला या लहानशा गावात, आर्थिक संपन्नता नसलेल्या दलित माडगा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव विरम्मा व वडिलांचे नाव रामय्या आहे. जन्मगावातील ए बी एम विद्यालयात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. आर्थिक विपन्नता आणि धार्मिक अवहेलनेमुळे तिसऱ्या वर्गातच त्यांना शिक्षण सोडावे लागले होते; मात्र टी. देविदास नावाच्या सद्गृहस्थाने त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली.महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी गुंटूरच्या  ए.सी. महाविद्यालयातून घेतले. महाविद्यालयीन जीवनामध्ये १९५७ ते १९५९ पर्यंत त्यांनी सतत वार्षिक स्पर्धांमध्ये लघुकथा, कविता आणि नाटक यासाठी पारितोषिक मिळविले होते. इनाक यांनी एस.के. विद्यापीठ अनंतपूर येथून तेलुगू साहित्यात आचार्य पदवी प्राप्त केली आणि याच विद्यापीठातून संशोधनोत्तर पदवीही मिळविली (पोस्ट डॉक्टरल). दरम्यान चित्तूर आणि काकिनाडा येथील शासकीय महाविद्यालयात ते पदवीला तेलुगू साहित्य आणि भाषा हा शिकवीत होते. इनाक यांचे विद्याशाखीय जीवन खूपच प्रेरणादायी असून त्यांनी अधिव्याख्याता, प्रपाठक आणि अधिष्ठाता या अध्यापन क्षेत्रातील उच्च पदावर कार्य केले आहे. आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे. त्यांनी दलित जीवन जाणीवा आणि महिला सबलीकरण या विषयाला केंद्रीभूत ठरवून मोठे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. तिरुपती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्य करण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे.

इनाक यांनी त्यांचे साहित्य लेखन १९५४ मध्ये ‘उत्तरम’ या लघुकथेने सुरू केले. त्यांचे प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे : कवितासंग्रहआशाज्योती, शारा मामुली, कुलम धनम, नन्नू कलगनानीवंदी, आदि अंधरदु (२००८),कीलला करखाना (२००८), त्रीद्रव्या पाठकम, चेप्पालू, मेरुपुला आकासम (२०१०), कान्निथीगोनथू, सर्पयागम; नाटकअम्मा (१९९९),जयहिंद (२००९), इडूगु ईशु क्रीस्तु (२०१२),मनीवाहनंदू (२००२), मलानंती मनीशी, साक्षी (२०१२),वोटलता (२०१२),निदा (२०१२); कादंबरीसमता, अनाथा (२०१०),इरुलावो वीरूलू ,अनंतजीवनम,सौभाग्यवती,सौंदर्यवती (२०१०); लघुकथा गुलाबी नवविण्डी,यदा जीविथम,भवानी,उराबावी,काकी, अस्पृश्यगंगा (१९९९),दलित कथालु (२०१४) ; समीक्षण – आधुनिक साहित्य विमर्श सूत्रम (२०१०), तेलुगू व्यास परिणामम, जनपदुला साहित्य विमर्श,पत्रत्रयी (२०१३),साहित्य परामर्श (२०१३).इत्यादी.

इनाक यांच्या साहित्यात वंचित, दलित, स्त्री, मागासवर्ग, आदिवासी आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न अभिव्यक्त झाले आहेत. अमानवीय जगणे अपरिहार्य ठरलेल्या माणसांना मानवीय पातळीवर आणणे हे त्यांच्या साहित्याचे आणि जीवनकार्याचे ध्येय राहिले आहे. त्यांच्या सर्जनशील लेखनाचा अक्ष हा त्यांनी जगलेल्या, अनुभवलेल्या आणि पाहिलेल्या जीवनावर केंद्रित आहे. त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांची साहित्याभिव्यक्ती त्यांच्या अश्रुचे प्रतिनिधित्व करते. आर्थिक, धार्मिक आणि जातिगत वंचीतता यामुळे आलेली हतबलता आणि एकटेपण त्यांच्या सर्व प्रकारच्या साहित्यातून प्रकट झाले आहे. त्याचबरोबर या हतबलतेवर अतीव कष्टाने मात करण्याच्या प्रेरणांचा एक संघर्षमय आलेखही त्यांच्या साहित्यातून प्रतीत होतो. संयत परंतु परिवर्तनावर ठाम असणारी भूमिका ते त्यांच्या साहित्यातून मांडत आले आहेत. सामजिक न्याय आणि महिला सबलीकरण याबद्दल ते आयुष्यभर वचनबद्ध राहिले त्यामुळे त्यांचे व्यक्तित्व आणि त्यांचे साहित्य यामध्ये कायम एकसंधता पाहायला मिळते.

लेखकाबरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही इनाक यांची दृढ ओळख आहे. त्यांनी अनंतपूर येथील आंबेडकर विज्ञान पीठाचे आणि हैदराबाद येथील दलित लेखक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आंध्रप्रदेश साहित्य अकादेमी पुरस्कार (१९९८), तेलुगू भाषात्सोव पुरस्कार (२००४), तेलुगू भारती पुरस्कार (२०१०), मल्लेमाला साहित्य पुरस्कार (२०१०), केंद्रीय साहित्य अकादेमी पुरस्कार (२०१८) आणि भारतीय ज्ञानपीठ संस्थेचा मुर्तीदेवी पुरस्कार इत्यादी महत्वाच्या पुरस्कारांचा त्यात समावेश होतो.

संदर्भ :

• http://acharyaenoch.blogspot.com/p/writer.html.

• http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/kolakaluri_enoch.pdf