नन्नय : (अकरावे शतक). आद्य तेलुगू महाकवी. त्याला ‘वागानुशासनुडू’ म्हणजे शब्दप्रभू अशी सार्थ उपाधी होती. त्याचा काळ १०२० ते १०६३ किंवा १०२५ ते १०५५ असा अभ्यासक मानतात. वेंगीचा पूर्वचालुक्य नृपती राजराज नरेंद्र (विष्णुवर्धन, कार. १०२२–६३) याच्या राजसभेत तो होता. त्याचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. तेलुगूचा आद्यतम ग्रंथकार, मार्ग पद्धतीच्या काव्यसंप्रदायाचा पहिला कवी, पहिला व्याकरणकार या दृष्टीने नन्नयाचे तेलुगू साहित्यात आगळे महत्त्व आहे. तेलुगू साहित्यातील ‘कवित्रय युगा’चा आरंभ त्याच्यापासूनच होतो. संस्कृत आणि तेलुगूचा प्रकांड पंडित, पुराणज्ञ आणि व्याकरणकार म्हणून त्याचा लौकिक होता. तो राजपुरोहित आणि राजाचा विश्वासू मित्रही होता. नारायणभट्टनामक एका विद्वान मित्राचे त्याला साहाय्य झाले असे म्हणतात. नन्नयाची मुख्य रचना आंध्रमहाभारताची पहिली अडीच पर्वे हीच होय. आंध्रशब्दचिंतामणी हे तेलुगूचे संस्कृत भाषेतील व्याकरणही त्याने लिहिले असावे, असे अनेक अभ्यासक मानतात. इंद्रविजय आणि चामुंडीविलास हे दोन ग्रंथ मात्र त्याने रचले की नाही, याबद्दल मतभेद आहेत. नन्नयाकडून अपूर्ण राहिलेले तेलुगू महाभारत पुढे तिक्कन्न व एर्राप्रेगडाने पूर्ण केले.
नन्नय हा शब्दब्रह्मवेत्ता होता; तथापि त्या काळी तेलुगू भाषेला ग्रांथिक स्वरूप नव्हते. तिचे सर्वसाधारण स्वरूपही तोवर निश्चित झालेले नव्हते. नन्नयाने तेलुगू भाषेच्या मूळ प्रकृतीचा यथायोग्य विचार करून मूळ देशी शब्दांबरोबरच तेलुगूत स्वाभाविक वाटतील अशा संस्कृत शब्दांचाही उपयोग केला. तेलुगू भाषेला स्थिर आणि प्रमाणित रूप देण्याचा त्याचा प्रयत्न खूपच यशस्वी झाला. नन्नयपूर्वकाळी कन्नड भाषेत महाभारताची रचना झाली होती. त्याचा नन्नयाच्या रचनेवर प्रभाव पडणे साहजिकच होते. मार्ग पद्धतीच्या एका प्रवाहाचे शब्द, छंद, वृत्ते आणि अलंकार यांच्या संबंधात देशी आणि मार्गी शैलींचा समन्वय करण्याकडे नन्नयाचा काहीसा कल होता. त्याने महाभारतरचनेत गद्यपद्ययुक्त चंपू शैलीचा अवलंब केल्यामुळे तेलुगू गद्याचे प्रवर्तन करण्याचे श्रेयही त्यालाच दिले जाते.
महाभारतासारखा विशाल ग्रंथ तेलुगू जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात त्याचा हेतू मुख्यत्वे समाजप्रबोधनाचा असावा. त्याचा ग्रंथ केवळ अनुवादात्मक नाही. त्यामुळे रमणीय अशा अभिजात महाकाव्यरचनेचा त्याचा उद्देशही स्पष्ट दिसतो. रसिकवृंदाचा आणि विद्धद्जनांचा परितोष व्हावा, ही आपली मनीषाही त्याने त्यात सूचित केली आहे. कथानकाची मांडणी करताना संक्षेप-विस्ताराच्या बाबतीत त्याने स्वतंत्र धोरण अवलंबिले आहे. त्याची शैली मुख्यतः वर्णनात्मकच आहे. नागयज्ञाचा प्रसंग त्याने मोठा नाट्यमय केला आहे. एकंदरीत भावरम्यता आणि शैलीची सरसता हे त्याच्या रचनेचे विशेष म्हणून सांगता येतील. नन्नय हा आदिकवी असल्यामुळे नंतरच्या कित्येक कवींनी आपल्या काव्यारंभी त्याचा आदरपूर्वक उल्लेख करून त्याच्या शैलीचे अनुकरण केले आहे.
तेलुगू महाभारताच्या निरनिराळ्या पर्वांच्या हस्तलिखित व ताम्रपत्रांवरील प्रती मद्रासचे ‘प्राच्य हस्तलिखित संग्रहालय’, काकिनाडा येथील ‘आंध्र साहित्य परिषद हस्तलिखित संग्रहालय’, तंजावरचे ‘सरस्वती महाल ग्रंथालय’, उस्मानिया विद्यापीठाचा तेलुगू विभाग यांत उपलब्ध आहेत. मद्रासचे वाविलाल रामस्वामी शास्त्रुलू यांच्या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेली तेलुगू महाभारताची सटीक आवृत्ती ही प्रमाणभूत आणि विद्वद्मान्य आहे. उस्मानिया विद्यापीठही तेलुगू महाभारताची अशीच एक सटीक आवृत्ती तयार करीत आहे. नन्नयाच्या रचनेवरील समीक्षावाङ्मयात कलाप्रपूर्ण विश्वनाथ सत्यनारायण यांचे नन्नय्यागारि प्रसन्नकथाकलितार्थयुक्ती व जी. व्ही. राघवराव यांचे नन्नय्या–भट्टु विज्ञान निरती हे दोन ग्रंथ विशेष महत्त्वाचे आहेत.
संदर्भ :
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.