की राजनारायणन : (७ नोव्हेबर १९२२). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध तमिळ साहित्यिक. तमिळ लोककथांचे संकलक-अभ्यासक आणि तमिळमधील करिसाल या प्रादेशिक साहित्य प्रवाहाचे प्रणेते म्हणून त्यांची पूर्ण भारतभर ओळख आहे. त्यांचा जन्म तमिळनाडूतील सुदूर दक्षिण भागातील इडईसेवल या छोट्याश्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकृष्णा रामानुजम व आईचे नाव लक्ष्मीअम्मल होते. त्याच्या वडिलांनी कौटुंबिक परंपरेनुसार त्यांचे नाव रायगल्ला श्रीकृष्णा राजा नारायण पेरुमल रामानुजन नाईकर असे ठेवले होते. राजनारायणन यांनी स्वतः ते संक्षिप्त करून की. राजनारायणन असे केले. त्यांच्या पत्नीचे नाव गनावथीम्मल होते. त्यांनी की. रा. या टोपण नावाने साहित्य लेखन केले आहे.
की राजनारायणन यांचे शिक्षण इयत्ता आठवी पर्यंतच झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला. मात्र त्यांचे आजोबा आणि आजी यांनी त्यांना बालपणी परिसरातील अनेक लोककथा ऐकविल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये लोकसाहित्याची विलक्षण ओढ निर्माण झाली. आपण ज्या परिसरात जीवन जगतो, जेथे आपला अधिवास आहे, त्या परिसरातील लोकजीवनाकडे आणि पर्यावरणाकडे पाहण्याची डोळस दृष्टी त्यांना आजोळच्या लोकसाहित्याविषयक संस्कारामुळे मिळाली. त्याच प्रभावातून ते दक्षिण भारतातील द्रविड संस्कृतीमधील लोकसाहित्याचे अध्ययन आणि संकलन करू लागले. लोककथा हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. तमिळनाडूच्या सुदूर दक्षिणेला तिरुनेलवेली ते कन्याकुमारी हा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. याच परिसरात राजनारायण राहत होते.पावसाच्या अशा कमतरतेमुळे परिसरात लोकजीवनाच्या बाबतीत काही दैन्याच्या बाबी घडत होत्या. या प्रदेशाला त्यांनी करिसाल (Black Forest) नाव दिले. याच भागातील लोकांचे जीवन, श्रद्धा, विश्वास, रूढी आणि परंपरा लक्षात घेवून राजनारायण यांनी कथांचे लेखन केले आणि परिसरात प्रचलित लोककथांचे संकलन केले आणि नियतकालिकांतून त्यांचे प्रकाशन केले. की राजनारायणन यांच्या या कार्यामुळे तमिळ साहित्यात करिसाल कट्टू हा स्वतंत्र साहित्यप्रवाह निर्माण झाला. कडाईचोली या नियतकालिकाचे काही काळ त्यांनी संपादन केले आहे.
की राजनारायणन यांचे साहित्य – की राजनारायणन यांचे मुख्य कार्य म्हणजे लोककथांचे संकलन होय. शिवाय त्यांनी स्वतंत्र कथालेखनही केले आहे. त्यांच्या कथा सामान्यतः करीसाल कट्टू येथील लोकजीवनावर आधारित आहेत. त्यांची पहिली लघुकथा मायमान (द मॅझिकल हिरेण) १९५८ ला प्रकाशित झाली. संकलित लोककथा – तमिझहनट्टू नादोदी कथाईकल (१९६६),तमिझहनट्टू ग्रामिया कथाईकल (१९७७),थत्ता छोन्न कथाईकल, नट्टूपूरक कथाईकल (१९९२),पुथूवाई वत्तरा नट्टूपूरक कथाईकल (१९९३),पेन मनम (१९९५),कथिल विझुनथा कथाईकल (१९९२); लघुकथा – अप्पा पिलाई (१९८०),करिसाल कथाईकल (१९८४),कोथिसई पुरूयथी (१९८५); कादंबरी – गोपाळ ग्रामम (१९७६), पिंचुकल (१९७९),गोपाल पुर्थु मक्कल (१९८९); निबंध – करिसाल काडू काडीधासी (१९८८) इत्यादी. त्यांच्या काही पुस्तकांचे प्रीतम के चक्रवती यांनी इंग्रजीत अनुवादित केले आहे. त्यापैकी वेअर आर यु गोइंग यु मंकीज ही भाषांतरीत कादंबरी होय. २००३ मध्ये त्यांच्या ‘किडाई ‘नावाच्या लघुकथेवर तामिळ भाषेत ओरुथथी नावाचा चित्रपट बनविण्यात आला होता.
लोककथा ह्या लाक्षणिक अर्थाने अपौरुषेय असतात.त्याचा कर्ता अज्ञात असतो. लोकजीवनातून या कथांचे संक्रमण होत असते; त्यामुळे लोकजीवनाची वैशिष्ट्ये त्यात मिसळली जातात. ही सगळी वैशिष्ट्ये सांभाळत, भारतीय लोककथांची प्राचीनता आणि कथातंत्र की राजनारायणन यांनी त्यांच्या संकलनात कायम राखले आहे. श्लिष्ट अश्लिष्ट या बाबीचा विचार न करता लैंगिक विषयासंदर्भात लोककथेतील मूळ संहिता त्यांनी शाबूत ठेवली आहे. एकूणच तामिळ साहित्याच्या लोकसाहित्यामध्ये विलक्षण अशी भरीव कामगिरी त्यांनी केलेली आहे.
त्यांचे लोकसाहित्य विषयक अध्ययन आणि कार्य लक्षात घेवून १९८० मध्ये पुद्दुचेरी विद्यापीठात त्यांची लोकसाहित्याचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९८-२००२ या कालावधीमध्ये ते लोकसाहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेचे सल्लागार मंडळाचे सदस्य होते. त्यांनी याच विद्यापीठाच्या कागदपत्र आणि सर्वेक्षण केंद्राचे संचालक पद भूषविले आहे. १९४७-५१ च्या दरम्यान सीपीआय संघटित शेतकरी विद्रोहाच्या सहभागासाठी त्यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला होता. याशिवाय ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते.
त्यांच्या साहित्यविषयक कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तामिळ वारची अरीची मंद्रम पुरस्कार (१९७१), संतोम इंटरनॅशनल ख्रिश्चन सोसायटीचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार (१९९०), साहित्य अकादेमीचा पुरस्कार (१९९१),एमए चिदंबरम पुरस्कार (२००८), साहित्यिक यश विशेष पुरस्कार (२०१६) अशा महत्वाच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/ki_rajanarayanan.pdf