ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक संस्थान. ते राजपुतान्यात आग्नेयीस वसले होते. क्षेत्रफळ २,०७४ चौ. किमी. लोकसंख्या १,२२,२९९ (१९४१). उत्पन्न सु. चार लाख रुपये होते. उत्तरेस कोटा, पश्चिमेस इंदूर–ग्वाल्हेर, दक्षिणेस सितामाऊ–जावरा–देवास–ग्वाल्हेर, पूर्वेस टोंक–इंदूर या संस्थानांनी सीमित होते व संस्थानचा ३८ चौ. किमी.चा प्रदेश–किर्पापूर हा प्रमुख प्रदेशापासून अलग होता. संस्थानात पाच तहसील, ४१० खेडी आणि झालरपाटण व छावणी ही दोन शहरे होती.

झालवाड संस्थानचे राज्य-चिन्ह.

संस्थानच्या प्रदेशाचा बराच भाग सपाट व प्रमुख काली नदी त्यातून वाहते. झालवाडचे घराणे झाल राजपुतांतील असून त्यावरून झालवाड हे नाव पडले. कोट्याचा दिवाण जालिमसिंगाचा नातू मदनसिंग व कोट्याचे राजे यांच्यातील तंटे मिटविण्यासाठी इंग्रजांनी कोट्याचा १२ लाखांचा प्रदेश वेगळा करून मदनसिंगाला देवविला (१८३८). तेव्हा हे नवीन संस्थान अस्तित्वात आले. इंग्रजांनी त्याला ‘महाराज राणा’ ही उपाधी व पंधरा तोफांच्या सलामीचा मान दिला व त्याला इतर संस्थानिकांप्रमाणे दर्जाही दिला. मदनसिंगाने त्याबदली ८०,००० रु. खंडणी आणि जमेल त्या सैन्याची मदत इंग्रजांना द्यावी, असे ठरले. मदनसिंग १८४५ मध्ये मरण पावला व त्याचा मुलगा पृथ्वीसिंग गादीवर आला. त्याने १८५७ च्या उठावात इंग्रजांना बहुमोल मदत केली. त्याबद्दल इंग्रजांनी १८६२ मध्ये संस्थानला दत्तकाचा अधिकार दिला. त्याच्या मृत्यूनंतर १८७५ मध्ये भक्तसिंग हा दत्तकपुत्र गादीवर आला. संस्थानच्या संकेतानुसार झालिमसिंग हे नाव त्याने धारण केले. तो लहान असल्यामुळे राज्यव्यवस्था पोलिटिकल सुपरिंटेंडंट व कौन्सिल यांच्याकडे होती. १८८० मध्ये तो गादीवर आला; परंतु तो ब्रिटिशांच्या धोरणानुसार वागेना, तेव्हा त्यांनी १८८७ मध्ये पोलिटिकल सुपरिंटेंडंटच्या हातात सर्व सूत्रे दिली. पुढे त्याचे वर्तन फारसे सुधारले नाही, तेव्हा ब्रिटिशांनी त्याला पदच्युत केले. त्याला मुलगा नव्हता. १८९७ मध्ये कनवर भवानीसिंग या दुसऱ्या ठाकूर घराण्यातील मुलास इंग्रजांनी झालवाडच्या गादीवर बसविले. १८९९ मध्ये इंग्रजांनी संस्थानचे १७ जिल्हे कोट्याला पुन्हा देऊन पाटण, पंचपहाड, आवर, डांग व गंगधर या अवशिष्ट महालांवर या जालिमसिंगाच्या वंशजाचा हक्क कायम केला. भवानीसिंगाच्या कारकिर्दीत संस्थानने पहिल्या महायुद्धात इंग्रजांना सर्वोतोपरी साहाय्य दिले. भवानीसिंग सुशिक्षित, सुसंस्कृत व विद्वान होता. त्याने संस्थानामध्ये अनेक सुधारणा केल्या. विसाव्या शतकात संस्थानात रेल्वे, डाक, सडका, शिक्षण, आरोग्य अशा बऱ्याच सुधारणा झाल्या. १९४८ मध्ये राणा हरिश्चंद्र याच्या कारकिर्दीत संस्थान विलीन होऊन राजस्थान संघात सामील झाले.