मराठेशाहीच्या वतीने इंग्लंडला गेलेले हे सर्वांत पहिले शिष्टमंडळ. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपदी स्वत:ची नियुक्ती करण्यासाठी रघुनाथराव ऊर्फ राघोबा पेशवे (१७३४-१७८३) यांनी तीन जणांचे एक शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवले होते (१७८०). सातारा संस्थानचे मुत्सद्दी रंगो बापूजी यांच्या आधी अंदाजे सत्तर वर्षांपूर्वी मराठेशाहीच्या वतीने इंग्लंडला गेलेले हे सर्वांत पहिले शिष्टमंडळ होय. नारायणराव पेशव्यांचा खुनानंतर काही काळ पेशवेपदाचा उपभोग घेतल्यानंतर नाना फडणीसांच्या अध्यक्षतेखालील बारभाईंनी रघुनाथरावांना पदच्युत केले. तेव्हापासून गेलेले पेशवेपद पुन्हा मिळवण्यासाठी रघुनाथराव प्रयत्नशील होते. त्या करिता १७७५ सालीच मुंबईकर इंग्रजांसोबत त्यांचा करार झाला. या करारान्वये काही पैसे व प्रदेशाच्या बदल्यात ब्रिटिश त्यांना मदत करणार होते. परंतु कलकत्त्याहून गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने नापसंती दर्शवून हा करार मोडीत काढला. तरीही मुंबईकर इंग्रजांनी अगोदरच्या रद्द झालेल्या करारान्वये मुंबईजवळील साष्टी बेट आणि आसपासच्या प्रदेशाचा महसूल हडपला आणि राघोबांना आश्रयही दिला. त्यातूनच पुढे पहिले इंग्रज-मराठे युद्ध उद्भवले. अशातच राघोबादादांनी इंग्लंडच्या राजाला मदतीकरिता एक पत्र पाठवले (१७७६). पोर्तुगाल व फ्रान्स येथील राजांशीही त्यांनी पत्रांद्वारे संपर्क साधला. पण पोकळ आश्वासनांपलीकडे हाती काही न लागल्याने शेवटी त्यांनी इंग्लंडला शिष्टमंडळ पाठवले.

शिष्टमंडळातील मुख्य राजदूत म्हणून राजापूरच्या हणमंतराव याची निवड करण्यात आली. त्याच्या दिमतीला मणियार रतनजी आणि त्याचा मुलगा कर्सेटजी मणियार हे दोघे पारशी पितापुत्र देण्यात आले. या आधी सु. पन्नास वर्षांपूर्वी १७२४ मध्ये नवरोजी नामक पारशी व्यापाऱ्याने इंग्लंडला जाऊन ईस्ट इंडिया कंपनीकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध यशस्वी रीत्या दाद मागितली होती, शिवाय ब्रिटिशांशी व्यापाराच्या निमित्ताने पारशी समाजाचा जवळचा संबंध होता. त्यामुळे दोघा पारशी पितापुत्रांची निवड स्वाभाविक होती. पण हणमंतरावाला ब्रिटिशांचा विशेष अनुभव नव्हता, इंग्लिशही येत नव्हते; परंतु १७६६ मधील मोगल शिष्टमंडळाचे अयशस्वी अनुभव पाहता अशा मोहिमेचे नेतृत्व कुणा ब्रिटिशाकडे देण्यापेक्षा स्वकीय माणसाकडे देणे श्रेयस्कर, अशा विचाराने हणमंतरावाची निवड झाली असावी.

रघुनाथरावांनी हणमंतरावाकडे इंग्लंडचा तत्कालीन राजा जॉर्ज (तिसरा) याला उद्देशून लिहिलेले एक पत्र दिले. त्यात त्यांनी ब्रिटिश प्रतिनिधी आपले ऐकत नसल्यामुळे आपले गाऱ्हाणे खाशांच्या कानावर घालण्याकरिता तिघांना पाठवत असल्याचे नमूद केले होते. हे पत्र घेऊन १७८० मध्ये हणमंतराव, मणियार आणि कर्सेटजी काही नोकरांसोबत मुंबईहून एका जहाजातून इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. पुढे सत्तावीस दिवसांनी येमेन देशातील मोखा येथे ते थांबले. तेथून मार्गक्रमणाकरीत ते सौदी अरेबिया येथील जेद्दा येथे थांबले. तेथील सुभेदाराने जहाजावरील सामानाच्या झडतीकरिता तिघांनाही एका खोलीत दोनतीन दिवस ठेवले. त्या कालावधीत त्यांना दिलेल्या जेवणाचा पारशांनी समाचार घेतला, परंतु हणमंतरावाने मात्र कशालाही तोंडसुद्धा लावले नाही. जेद्दाच्या सुभेदाराला खूप आश्चर्य वाटले. अखेरीस मराठी बोलता येणाऱ्या तेथील एका मुलाकरवी हणमंतरावाने त्याला सांगितले की, धर्माज्ञेमुळे त्याला परधर्मीयांनी रांधलेले अन्न खाता येणार नाही. अखेरीस त्याच्यासाठी एक वेगळा तंबू उभारण्यात आला आणि तेथे हणमंतरावाने स्वहस्ते बनवून अन्न खाल्ले. या अगोदर त्याने जहाजावरचे अन्न न खाता भारतातून आणलेले भोपळे इत्यादींवरच गुजराण केली. मजल दरमजल करीत शिष्टमंडळ तेथून जहाज इत्यादी बदलून इटली येथील लिव्होर्नो येथे पोहोचले. लिव्होर्नोतील ब्रिटिश अधिकारी जॉन उडनी हा तेथून त्यांच्या सोबतीस इंग्लंडपर्यंत आला. त्यानेच इंग्लंडमध्ये त्यांची देखभाल केली. लिव्होर्नोहून फ्रँकफर्ट व ब्रसेल्सहून लंडनला १७८१ च्या जानेवारी महिन्यात ते पोहोचले असावेत.

लंडनमध्ये गेल्याबरोबर शिष्टमंडळाने सर्वप्रथम ब्रिटिश परराष्ट्रखात्याशी संपर्क साधून आपल्या मोहिमेची कल्पना दिली. इंग्रज-मराठे युद्धातील बदलत्या समीकरणांशी परिचय नसल्याने पूर्वानुभवाच्या आधारावर याचा निर्णय करण्यासाठी त्यांनी शिष्टमंडळाला ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जाण्यास सांगितले. कंपनीच्या संचालक मंडळाने सिटी ऑफ लंडनजवळच इसलिंग्टनला त्यांची रवानगी केली आणि आपसात खलबते सुरू केली. या शिष्टमंडळाने लंडनमधील अनेक उच्चभ्रू ब्रिटिशांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्याशी वाटाघाटी करण्यात ईस्ट इंडिया कंपनीने अशी टाळाटाळ करावी, हे अनेकांना आवडले नाही. त्यांत राजकीय विचारवंत, संसदपटू, प्रसिद्ध लेखक एडमंड बर्क (१७२९-१७९७) हा ही होता. बर्कने शिष्टमंडळाची आस्थेने विचारपूस केली. हणमंतरावाच्या अन्न, स्नानशौचादी नियमांबद्दल समजल्यानंतर त्याने लंडनहून पंचेचाळीस किमी. अंतरावरील बीकन्सफील्ड या छोट्याशा गावी आपल्या हवेलीत त्याची राहायची सोय केली. तेथे हणमंतराव हिंदू रूढी नियमांचे पालन करून राहू लागला. मणियार व कर्सेटजी हे दोघे लंडनमध्येच राहिले.

बर्कमुळे एका अतिशय अनपेक्षित प्रकरणात या शिष्टमंडळाची वर्णी लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील – विशेषत: बंगालमधील – मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्सची एक समिती स्थापन करण्यात आली होती. बर्क तिचा प्रमुख होता. कंपनीच्या कारभाराबद्दल आलेल्या तक्रारींचा परामर्श घेऊन त्यांचे निराकरण करणे, जरूर पडल्यास कंपनीच्या कायद्यांमध्ये बदल करणे असे त्या समितीच्या कामाचे स्वरूप होते. १७७५ मध्ये बंगालमधील नंदकुमार नामक जमीनदाराला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वॉरन हेस्टिंग्जच्या प्रेरणेने फाशी दिल्याचे प्रकरण तेव्हा खूप गाजत होते. नंदकुमार लोकप्रिय असल्याने या फाशीमुळे बंगालमध्ये खळबळ उडाली. त्याचे पडसाद लंडनपर्यंतही पोहोचले. हेस्टिंग्जवर खूप टीका झाली. त्यामुळे यापुढे भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक नियमांचाही परामर्श अशा गोष्टींमध्ये घेतला पाहिजे, असे या समितीचे मत पडले. हणमंतरावही तेथे असल्याने त्याला ब्रिटिश पार्लमेंटच्या या समितीपुढे हिंदू धर्माचे प्राथमिक यमनियम, धर्मशास्त्रे, इत्यादींबद्दल साधारण कल्पना देण्याकरिता बोलवले गेले. २६ फेब्रुवारी १७८१ रोजी हणमंतरावाने त्या संबंधात भाषण केले. इंग्लिश येत नसल्याने तो मराठीतच बोलला असावा, असे परिस्थितीजन्य पुराव्याने म्हणता येईल. पुढे त्याचे इंग्लिश भाषांतर केले गेले. यात त्याने हिंदू धर्मातील चार वर्ण, स्पृश्यास्पृश्य, दिवाणी व फौजदारी कायदे, वाळीत टाकणे, कर्जवसुली, इत्यादी अनेक गोष्टींबद्दल विवेचन केले. नंदकुमारला फासावर लटकवल्याबद्दल त्याने कंपनीवर टीका केली. नंदकुमार हा ब्राह्मण असून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ब्रह्महत्या निषिद्ध होती. त्यातूनही खूप मोठा अपराध घडला, तर शस्त्राने डोके उडवावे, परंतु फाशी देऊ नये अशी धर्मशास्त्रातील तरतूद असल्याचे त्याने सांगितले. या आणि काही अशाच अन्य वाटाघाटींचा परिपाक म्हणून पुढे १७८१ चा बंगाल ज्युडिकेचर ॲक्ट आणि १७८४ चा पिट इंडिया ॲक्ट असे दोन कायदे पास करून अंमलात आणले गेले. यात भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक रूढींचा विचार करून न्यायनिवाड्याची पद्धत सांगितली होती.

यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना शिष्टमंडळाची दखल घेणे भाग पडले. शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींना त्यांनी निर्वाहभत्ता व घरभत्ता पुरवला. परंतु तरीही राघोबांना द्यायचे उत्तर तयार करेपर्यंत जून महिना उजाडला. ६ जुलै १७८१ रोजी एक सीलबंद लखोटा शिष्टमंडळाला देण्यात आला. तेव्हा मणियार व कर्सेटजी यांनी लखोट्यातल्या पत्रातील मजकुराबद्दल पृच्छा केली. परंतु कंपनीच्या संचालकांनी ते न ऐकता आठ दिवसांच्या आत इंग्लंडहून परत जाण्यास सांगितले. त्यामुळे मणियारने भडकून संचालकांना शिवीगाळ केली. त्यावर संचालकांनी दोघांना खोलीबाहेर काढून त्यांचा निर्वाहभत्ता थांबवण्याची तंबी दिली. हणमंतराव या भेटीस उपस्थित नव्हता. अशा धमक्या मिळूनही शिष्टमंडळाने इंग्लंडहून जाण्याची तयारी केली नाही. पुन्हा एकदा बर्क त्यांच्या मदतीला धावला. एका सार्वभौम राजाच्या प्रतिनिधींशी अशा प्रकारे वर्तणूक करणे ही कंपनीला बट्टा लावणारी गोष्ट असून, मणियारचे वर्तन योग्य नसले तरीही इंग्लंडची आतिथ्यशीलता त्यांच्या मनावर ठसावी याकरिता त्यांना काही भेटी देऊन सन्मानाने परत पाठवावे, असे त्याने नमूद केले. याखेरीज कंपनीच्या काही सभासदांनीही (शेअर होल्डर्स) या मुद्द्यावरून कंपनीला धारेवर धरले होते. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी शिष्टमंडळाला १००० पौंड परतीच्या खर्चाकरिता देऊन १ ऑगस्ट १७८१ च्या आत इंग्लंडहून परत निघण्यास सांगितले. तरीही इंग्लंडच्या राजाचे पत्र न मिळाल्यामुळे शिष्टमंडळ परतायला नाखूष होते. अखेरीस स्टेट सेक्रेटरी हिल्सबरोने राघोबांना उद्देशून एक पत्र लिहून शिष्टमंडळाला दाखवले. मोघम गोष्टींखेरीज त्यात काहीच नव्हते. त्याशिवाय बर्कने राजा जॉर्जच्या मनातही या शिष्टमंडळाबद्दल अनुकूल भावना तयार केली. परिणामी सुमारे दोनशे पौंड किमतीच्या भेटवस्तू जॉर्जतर्फे शिष्टमंडळाला देण्यात आल्या. वरखर्चासाठी आणखी दोनशे पौंड दिल्यावर १५ ऑगस्ट १७८१ रोजी शिष्टमंडळ परतीच्या मार्गाला लागले.

इंग्लिश खाडी ओलांडून ते ब्रुसेल्स, फ्रँकफर्ट आणि तेथून व्हेनिसला पोहोचले. सोबत पीटर मोलिनी नामक इंग्रजही होता. हणमंतराव आणि मणियार यांच्यात व्हेनिसहून भारतात कोणत्या मार्गे जायचे या प्रश्नावरून भांडणे झाली. व्हेनिसहून इजिप्तमधील अलेक्झांड्रिया, तेथून आलेप्पो व बसरामार्गे भारतात यायचे असे मणियारचे म्हणणे, तर तुर्कस्थानातील इस्कंदरूनमार्गे आलेप्पो व बसरा असे जावे, हे हणमंतराव म्हणत होता. मणियार भडकून हणमंतरावाला मारणार एवढ्यात रिची नामक इंग्रजाने त्याला घट्ट धरून ठेवले. या भांडणांमुळे हणमंतराव आणि मणियार व कर्सेटजी हे दोघेही वेगवेगळ्या मार्गांनी प्रथम आलेप्पो येथे आले आणि तेथून बसरामार्गे वेगवेगळेच मुंबईला परत आले. राघोबांना भेटेपर्यंत १७८२ सालचा उत्तरार्ध उजाडला. काही काळाने राजा जॉर्जने पाठवलेल्या भेटवस्तूंच्या अकरा पेट्याही आल्या. परत आल्यावर हणमंतरावाने समुद्र ओलांडल्याबद्दलचे प्रायश्चित्त घेतले. सोन्याची योनी तयार करून तीतून बाहेर येणे, असे त्याचे स्वरूप होते. म्हणजेच तो प्रतीकात्मक पुनर्जन्म होय. सर्व प्रतिनिधी परत आल्यावर राघोबांनी प्रथम बर्कला त्याने केलेल्या साहाय्याबद्दल त्याचे आभार मानणारे पत्र पाठवले. बर्कने उत्तरादाखल भविष्यात अजून हिंदू प्रतिनिधी पाठवल्यास त्यांच्या धर्माप्रमाणे राहण्याची सर्व सोय केली जाईल, असे वचनही दिले.

राजकीयदृष्ट्या पाहता शिष्टमंडळाचा हेतू साध्य झाला नाही. १७८२-८३ मधल्या सालबाईच्या तहान्वये इंग्रज-मराठे युद्ध संपले व रघुनाथरावांची पेशवेपदाची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. तरीही रघुनाथरावांनी राजा जॉर्जला एक पत्र लिहून मदतीचे आवाहन केले. त्याचाही काही परिणाम झाला नाही. १७८३ साली रघुनाथरावही मरण पावले. तरीही या शिष्टमंडळाचा हा प्रवास अनेक प्रकारे ऐतिहासिक ठरला. पुढे जवळपास एका शतकभराने बंगालमध्ये जेव्हा हिंदूंनी समुद्र ओलांडावा किंवा नाही याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली, तेव्हा देशभरातून या विषयावर मते मागवण्यात आली. तेव्हा प्रसिद्ध लेखक व राजकीय नेते न्यायमूर्ती रानडे यांनी हणमंतराव व रंगो बापूजी यांच्या उदाहरणांद्वारे हे सिद्ध केले की, हिंदू धर्माला समुद्रप्रवास वर्ज्य नाही.

संदर्भ :

  • Fisher, Michael H. Counterflows to Colonialism: Indian Travellers and Settlers in Britain, 1600-1857, Permanent Black, New Delhi, India, 2006.
  • The Hindu Sea-Voyage movement in Bengal, The standing committee on the Hindu Sea-Voyage question, Calcutta, India, 1894.

                                                                                                                                                                                        समीक्षक : सचिन जोशी