घोसाळे : (हिं. घिया तोरी; गु. तुरिया, गिलका; क. तुप्पहिरेकाई; सं. राज कोष्टकी; इं. स्पंज गोर्ड, बाथ स्पंज; लॅ. लुफा एजिप्टिका ; कुल-कुकर्बिटेसी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल मूलतः भारतातील असून उष्ण कटिबंधात व भारतात सर्वत्र लागवडीत आढळते. सामान्य शारीरिक लक्षणे कुकर्बिटेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे; प्रतान (तनावे) त्रिशाखी; पाने मोठी व साधी, लवदार, खंडित; पानाच्या बगलेतील फुलोऱ्यावर ४-२० पुं-पुष्पे असतात; ती मोठी असून त्यांच्या पिवळ्या पाकळ्यांवर हिरवट रेषा असतात; स्त्री-पुष्पात पाच वंध्य केसरदले असतात; ही फुले एकटी पुं-पुष्पाच्या फुलोऱ्याच्या तळाशी पण स्वतंत्र देठावर येतात;  फळे २०-२५ सेंमी. लांब, साधारण त्रिकोणी पण दंडगोलाकृती, फिकट हिरवी व त्यांवर उभ्या रेषा असतात; कोवळे फळ मूत्रल (लघवी साफ करणारे) व दुग्धवर्धक असते; पक्व फळाचा रस रेचक असतो; चीनमध्ये पक्व फळ भाजून व पूड करून ती वायुनाशी व कृमिनाशक म्हणून वापरतात. कोवळे फळ भाजी, भरीत इ. खाद्यपदार्थ करण्यासाठी वापरतात. बिया चपट्या, सपक्ष, करड्या किंवा काळ्या, वांतिकारक व सारक असतात. बियांचे तेल खाद्य व दिव्यासाठी उपयुक्त असते. आफ्रिकेत बिनबियांचा व लहान फळे असलेला प्रकार लागवडीत आहे.

घोसाळे हे फळभाजीचे पीक आहे. यात कडू फळांचा एक प्रकार असतो. तो भाजीसाठी निरुपयोगी आहे. फुले कोमल हा अधिक उत्पन्न देणारा संकरित वाण आहे. या पिकाला मध्यम प्रकारची निचऱ्याची जमीन लागते. जमिनीत ३० सेंमी. व्यासाचे, तितकेच खोल खड्डे १.५ मी. अंतराने खणून, प्रत्येकी ८–१० किग्रॅ. शेणखत घालून प्रत्येकात ४-५ बिया पावसाळ्यात लावतात. पाऊस नसल्यास पाणी देतात. आळ्यात उगवलेल्या रोपांपैकी दोनच ठेवून बाकीची काढून टाकतात. जरूरीप्रमाणे ८-१० दिवसांनी पाणी देतात. वेलांना आधारावर चढवितात. ४५ दिवसांत फळे लागतात. फळे कोवळीच तोडतात. जून फळ कडवट बनते. त्याच्यापासून आणि कडू प्रकाराच्या फळांपासून स्पंजासारखा उपयुक्त पदार्थ मिळतो.