डेल्टा धातू हे उच्च तन्यता असलेले पितळ आहे. पितळाच्या संघटनात ३% लोखंड घालून हे पितळ तयार करतात. अशा प्रकारे याच्या एकूण संघटनात तांबे ६०%, जस्त ३७% आणि लोखंड ३% असते; शिवाय निकेल व मँगॅनीजही अल्प प्रमाणात असतात. हे पितळ संक्षारणाला किंवा रासायनिक झिजेला म्हणजे ऑक्सिडीकरणासारख्या रासायनिक प्रक्रियांनी किंवा रासायनिक कारकाच्या क्रियेने सावकाशपणे नष्ट होण्याला विरोध करते. यात लोखंडाचे प्रमाण जास्त झाल्यास याची यंत्र संस्कारक्षमता/यंत्रणक्षमता कमी होते. वस्तुतः लोखंड पितळाच्या आल्फा व बीटा या दोन्ही प्रावस्थांमध्ये विरघळणारे असून त्याच्यामुळे या मिश्रधातूच्या यांत्रिक गुणधर्मांत सुधारणा होत जाते. डेल्टा धातूवर ५५०० से. तापमानाला घडवण, लाटण, दाब कर्तन/मुद्रांकन किंवा दाबण्याची क्रिया करून कोणत्याही इष्ट आकाराची वस्तू तयार करता येते. जेथे संक्षारणालाही विरोध करायचा असतो, तेथे मृदू पोलादाऐवजी डेल्टा धातू वापरतात.
समीक्षक : डॉ. प्रवीण देशपांडे