तांबे आणि जस्त विविध प्रमाणांत एकत्र वितळवून पितळाचे विविध प्रकार तयार करतात. ७० % तांबे व ३० % जस्त असलेल्या पितळाला काडतूस पितळ म्हणतात. काडतूस पितळ हा महत्त्वाचा मिश्रधातू असून त्याचे असंख्य उपयोग आहेत. हे आल्फा पितळ आहे. तसेच हे शीत कार्यकारी पितळ आहे. म्हणजे अनुशीतनाच्या तापमानापेक्षा कमी तापमानाला याचे आकारी विरूपण होते.(मिश्रधातूवर उष्णतेची क्रिया करून मग ते थंड करण्याला अनुशीतन म्हणतात. यामुळे अंतर्गत ताण निघून जातात व मिश्रधातू कमी ठिसूळ होतो.)

काडतूस पितळेची सूक्ष्म संरचना

हे एका प्रावस्था घटकांतील शेवटचे पितळ आहे. याची शीत विरूपणक्षमता उत्कृष्ट आहे. खोल दाबक्रियेने आकार देण्यासाठी हा मिश्रधातू फार उपयुक्त आहे.

ओतीव अवस्थेत आल्फा घन विद्रावाची संरचना गाभायुक्त असते. यावरील शीत कार्यानंतरच्या तापानुशीतनाने जुळी स्फटिक संरचना निर्माण होते. अशा प्रकारची संरचना ही या अवस्थेतील फलक-केंद्रित घनीय जुळे स्फटिक हे या मिश्रधातूचे वैशिष्ट्य आहे. शीत कार्य (संस्कार) केलेल्या व तापानुशीतन केलेल्या स्थितीमधील या मिश्रधातूचे नमुनेदार यांत्रिक गुणधर्म पुढीलप्रमाणे असतात. ०.१ टक्का शरणतुल्य प्रतिबल दर चौ. सें.मी. ला ८१० किग्रॅ., ताणबल दर चौ. सेंमी. ला ३४०० किग्रॅ. आयामवर्धन ७० %, व्हिकर्स कठिनता (VPN) ६५. संक्षारणाला असणारा याचा विरोध वाढविण्यासाठी त्यात कथिल वा ॲल्युमिनियम घालतात. काडतूस पितळ शीत अवस्थेत लाटण्यात येणार्‍या पत्र्यांसाठी, तोफांचे गोळे, बंदुकीची काडतुसे यांच्या कवचांसाठी वापरतात. थंड अवस्थेत लाटण्यात येणार्‍या पत्र्यांसाठी, तारानिर्मितीसाठी, पत्रे, पट्ट्या व नलिकांसाठी उदा., साखर कारखान्यात उसाचा रस उकळण्याच्या यंत्रातील नळ्या  हा मिश्रधातू वापरतात. ॲल्युमिनियम पितळात ७६ % तांबे, २२ % जस्त व २ % ॲल्युमिनियम असतात; तर ॲड्मिरॅल्टी पितळात ७० % तांबे, २९ % जस्त व १ टक्का कथिल हे धातू असतात. काडतूस पितळासारखे हे मिश्रधातू सागरी विद्युत् धारित्र व इतर उष्णता विनिमयक सामग्रीसाठी वापरतात.

                                                                                                                                                                                                                         समीक्षक : डॉ. प्रवीण देशपांडे