पांढर्‍या रंगाचे अनेक धातू आणि मिश्रधातू असून त्यांचे वितळबिंदू सापेक्षतः कमी असतात. उदा., शिसे, कथिल, अँटिमनी, जस्त; तसेच कथिल व शिसे हे मुख्य घटक असणारे विविध मिश्रधातू यांत येतात.

कथिल हा मुख्य घटक असणारे श्वेत धातू वा मिश्रधातू असे असतात. कठीण घटक म्हणून कथिलामध्ये अँटिमनी व तांबे घालतात.या कथिल-अँटिमनी-तांबे हे घटक असणार्‍या मिश्रधातूंना पुष्कळदा बॅबिट मिश्रधातू म्हणतात. अर्थात मूळ बॅबिट मिश्रधातू हा एक विशिष्ट मिश्रधातू असून त्यात ८९ % कथिल, ७.४ % अँटिमनी व ३.६ % तांबे हे घटक असतात.

श्वेत धातूची सूक्ष्म संरचना

मोठ्या टोकाच्या धारव्यांसाठी (Big- end bearings) ९३ % कथिल, ३.५ % अँटिमनी व ३.५ % तांबे असलेला मिश्रधातू वापरतात. याचा ब्रिनेल कठिनता अंक २५ असतो. ८६ % कथिल, १०.५ % अँटिमनी व ३.५ % तांबे असलेला मिश्रधातू अंतर्ज्वलन एंजिनातील भुजादंडाला आधार देणारे मुख्य धारवे (Main Bearings) आणि शीघ्र कार्य धारवे (High duty bearings) यांच्यासाठी सर्वसाधारण उद्देशांनी वापरण्यास योग्य असा आहे. त्याचा ब्रिनेल कठिनता ( BNH ) अंक ३३ आहे.

कथिल मुख्य घटक असलेले मिश्रधातू हे बहुतेक बाबतींत शिसे मुख्य घटक असलेल्या मिश्रधातूंपेक्षा सरस असतात; पण शिसे मुख्य घटक असलेले मिश्रधातू अधिक स्वस्त असतात.

ब्राँझ (कासे) वा पोलाद यांच्या बॅकिंगमध्ये  – वितळजोडकाम सुकर होण्यासाठी सांध्याच्या मागे ठेवलेल्या धातूच्या तुकड्यात –  लायनर म्हणून श्वेत धातू-ओतिवे वापरतात आणि उच्चतर गती व आलटून-पालटून बदलणारा भार यांच्यासाठी ही ओतिवे तयार करतात. अर्थात ही ओतिवे झिजेच्या बाबतीत काशापेक्षा कमी प्रतिरोधक असतात. या मिश्रधातूंची बाह्य कण स्वतःमध्ये खोतलपर्यंत सामावून वा जडवून घेण्याची क्षमता धारव्यांच्या जोडणीमधील अनियमिततेची (विषमतेची) भरपाई (प्रतिपूर्ती) करणारी आकार्यतेच्या दृष्टीने विरूपित होण्याची क्षमता उत्कृष्ट असते. कथिल हा मुख्य घटक असलेले मिश्रधातू अम्लीय तेलांमध्ये संक्षारणाला  – रासायनिक झिजेला – अधिक चांगला प्रतिरोध करतात. मात्र त्यांची किंमत शिसे प्रमुख घटक असलेल्या मिश्रधातूंपेक्षा अधिक असते. हे मिश्रधातू सर्वसाधारणपणे अंतर्ज्वलन एंजिनातील धारवे,सर्वसाधारण कामांसाठीच्या यंत्रसामग्रीतील धारवे यांच्यामध्ये वापरतात.

शिसे हा मुख्य घटक असलेल्या मिश्रधातूंमध्ये १० ते १५ % अँटिमनी, १.५ टक्का तांबे, ५ ते २० % कथिल व सु. ६५ ते ९० % शिसे हे घटक असतात. हे मिश्रधातू कथिल हा मुख्य घटक असलेल्या मिश्रधातूंपेक्षा अधिक स्वस्त असतात. पण ते जास्त बळकट नसतात व त्यांच्यात भारवहनक्षमता नसते. यामुळे त्यांचा उपयोग कमी भारवाहक धारव्यांसाठीच करतात.शिवाय त्यांचे बल तापमान वाढत जाताना कथिल मुख्य घटक असलेल्या मिश्रधातूंपेक्षा अधिक जलदपणे कमी होत जाते. विविध मिश्रधातूंपैकी ज्या मिश्रधातूत ८० % शिसे, १५ % अँटिमनी, ५ % कथिल किंवा २० % अँटिमनी हे घटक असतात, तो मिश्रधातू सर्वसाधारणपणे मध्यम दाब व कमी गती असताना वापरतात आणि त्याचा ब्रिनेल कठिनता अंक २५.६ असते. अशा शिसे हा प्रमुख घटक असलेल्या मिश्रधातूंमधील कथिल व अँटिमनी यांचा वापर मुख्यत्वे शिशाची कठिनता वाढविण्यासाठी करतात. हे मिश्रधातू बहुतकरून व्हाइट मेटल्स या नावाने ओळखले जात असले, तरी कथिल हा प्रमुख घटक असलेल्या धारव्याच्या मिश्रधातूंचे बॅबिट मिश्रधातू हे लोकप्रिय नाव आहे.

                                                                                                                                                                                                                        समीक्षक : डॉ. प्रवीण देशपांडे