भारतातील केरळ राज्यातील कोची येथे २०१२ साली सुरू झालेले पहिले व अग्रगण्य द्वैवार्षिक कलाप्रदर्शन. ‘कोची–मुझिरिस बिनालेʼ या नावानेही ते ओळखले जाते. केरळ राज्याचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री एम. ए. बेबी, चित्रकार व कलासंयोजक कृष्णम्माचारी बोस, रियाझ कोमू, चित्रकार ज्योथी बसू आणि एम. जे. पिल्लई यांच्या सामूहिक प्रयत्नांतून ‘बिनाले’ ही संकल्पना तेथे अवतरली. भारतात समकालीन कलांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ नसल्यामुळे व्हेनिस बिनालेच्या धर्तीवर कोची बिनालेची कल्पना बोस व रियाझ यांनी मांडली व त्यातून भव्य स्वरूपाचा सांस्कृतिक दृश्यकला उत्सव ‘कोची बिनाले’ नावाने जन्माला आला. १२ डिसेंबर २०१२ या दिवशी कोची मुझिरिस बिनालेचा आरंभ झाला.
भारतातल्या या पहिल्या कोची बिनालेमध्ये सु. ८० कलावंत निवडले गेले. सुबोध गुप्ता यांचे बोटीचे मांडणी-शिल्प, सुदर्शन शहा यांचे स्मृतिमंदिरासारखे लाकडी-शिल्प अशा कितीतरी कलाकृतींचा सहभाग बिनालेच्या या पहिल्या आवृत्तीत होता. पाश्चात्त्य वसाहतवादी जगतातील अत्याचारी संस्कृती कोचीत पुन्हा आणली जात आहे, असाही आरोप या बिनालेवर झाला; परंतु गेल्या पाच वर्षांनंतर हे बिनाले लोकांचे झाले आहे. कोचीच्या लोकमानसात बिनाले सामावू पाहत आहे.
कोची मुझिरिस बिनालेच्या दुसऱ्या आवृत्तीत म्हणजे २०१४ च्या बिनालेमध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते मुंबईत जन्मलेले व ब्रिटनचे नागरिक असलेले शिल्पकार अनीश कपूर यांचे डिसेशन (घुसळण) हे मांडणी-शिल्प. नावाप्रमाणे सतत जोराने घुसळले जाणारे पाणी त्यांनी समुद्रकिनारी काही अंतरावर मांडणीस्वरूपात रचले होते. गुजराती चित्रकार व कलासमीक्षक गुलाम महंमद शेख यांचे गांधी आणि गामा हे भव्य चित्रही खूप गाजले. म्हैसूरचे चित्रकार एन. एस. हर्षा यांचे पुनरपि जननम् पुनरपि मरणम् हे ७५ फूट लांब व १० फूट उंच चित्रही बिनालेचे आकर्षण ठरले. या प्रदर्शनासाठी कलासंयोजक जितिश कल्लट यांनी जगभरातून ९६ कलावंतांची निवड केली होती.
कोची बिनालेच्या तिसऱ्या हंगामात म्हणजे २०१६-१७ मध्ये दृश्य किंवा चित्रफीत स्थापनेवर (व्हिडिओ इन्स्टॉलेशन) मुख्य भर होता. चित्रकला-विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी बिनाले’ नावाचा स्वतंत्र विभाग होता. टाटा उद्योग समूहाच्या सहयोगाने विद्यार्थिवर्गातील नव्या कलावंतांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईचे शिल्पकार सुदर्शन शेट्टी हे या बिनालेचे कलासंयोजक होते. या सर्वांत अलीकडच्या बिनालेमध्ये स्लोव्हेनियन कवी व लेखक ॲलेस स्टेगर यांनी केलेला निर्वासित कवींचा पिरॅमिड (The Pyramid of Exiled Poets – 2016) विशेष आकर्षण ठरला. त्याचबरोबर चिलीचे कलावंत राऊल झुरीता यांची दी सी ऑफ पेन (वेदनांचा सागर) ही कलाकृती आगळीवेगळी ठरली. कलादालनातील पांढऱ्या डब्यामधून कलाकृती बाहेरच्या मोकळ्या जगात आणणे हा बिनालेचा मूळ उद्देश यामुळे सफल झालेला दिसतो.
समीक्षक – महेंद्र दामले