काब्राल, पेद्रू आल्व्हारिश : (१४६७ किंवा ६८ – १५२०). पोर्तुगीज सरदार, मार्गनिर्देशक, समन्वेषक व ब्राझीलचा शोध लावणारा पहिला यूरोपीय. त्यांचा जन्म पोर्तुगालमधील कॉव्हील्लाजवळील बेलमाँट येथे एका सरदार घराण्यात झाला. सरदार घराण्यातील असल्यामुळे त्यांना राजदरबारातच चांगले शिक्षण मिळाले. पोर्तुगालचा राजा मॅन्युएल पहिला यांच्याशी त्यांची जवळीक होती. राजाबद्दल त्यांना नितांत आदर होता. त्यामुळे राजदरबारात काब्राल यांना अनेक सन्मान मिळाले. राजांनी १४९७ मध्ये त्यांना वैयक्तिक भत्ते, मंत्रिमंडळ सदस्यत्व, राजाचा सल्लागार, मिलिटरी ऑर्डर ऑफ क्राइस्ट असे वेगवेगळे मानसन्मान व अधिकार दिले.

पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा (Vasco da Gama) यांनी केप ऑफ गुड होप (Cape of Good Hope) या भूशिराला म्हणजेच आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध लावला होता. वास्को द गामा यांचे कार्य पुढे नेण्यासाठी इ. स. १५०० मध्ये भारताकडे दुसरी सफर पाठविण्याचा निर्णय मॅन्युएल राजांनी घेतला होता. राजांनी मोठ्या विश्वासाने त्या सफरीचे नेतृत्व आणि ॲडमिरलपद काब्राल यांना देण्याचा निर्णय १४९९ मध्ये जाहीर केला. प्रत्यक्षात गलबत चालविण्याचा कसलाही अनुभव काब्राल यांना नसतानाही केवळ हुशार व्यक्तिमत्त्व आणि राजघराण्याशी असलेली निष्ठा यांमुळेच त्यांची निवड करण्यात आली होती. काब्राल यांच्यापेक्षाही अनुभवी असलेल्या द्येगो दीयश, निकोलाऊ कोएल्हे, १४८८ मध्ये केप ऑफ गुड होप या भूशिराचा शोध लावणारे दर्यावर्दी व समन्वेषक दीयश बार्थालोमेऊ (Dias Bartolomeu) इत्यादींसारख्या मार्गनिर्देशकांना काब्राल यांच्याच सफरीत दुय्यम अधिकाराचे स्थान देऊन त्यांच्याबरोबर पाठविले होते. वास्को द गामांनी शोधलेल्या मार्गानेच भारताकडे जाऊन भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे, मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातील अरब, तुर्की आणि इटालियन व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढायची आणि परत येताना फार मोठ्या प्रमाणावर किंमती मसाल्याचे पदार्थ घेऊन यायचे, असे या सफरीचे उद्देश ठरविण्यात आले होते.

काब्राल यांनी ९ मार्च १५०० रोजी १३ जहाजांचा ताफा आणि १,२०० सहकारी (पैकी ७०० सैनिक) घेऊन लिस्बनजवळील बेलेमपासून भारताकडील सफरीसाठी निघाले. वास्को द गामांना भारताकडे जाताना आलेल्या प्रवासाच्या अनुभवांवरून काब्राल यांना त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. गामांनी अनुसरलेला मार्गच त्यांनाही अनुसरायचा होता. गिनीच्या आखातातील शांत सागरी पाण्याचा भाग ओलांडून पुढे जाईपर्यंत प्रथम नैर्ऋत्य दिशेने जहाजे न्यायची होती. त्यानुसार आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळील कानेरी आणि केप व्हर्द बेटे ओलांडून ते पुढे गेले. वातावरणीय परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे त्यांना आशा होती की, वाऱ्याच्या अनुकूल स्थितीमुळे आपण केप ऑफ गुड होपला वळसा घालून पुढे जाऊ; परंतु विषुववृत्तीय सागरी प्रवाह आणि वातावरणामुळे त्यांचा ताफा दक्षिणेकडे जाण्याऐवजी जास्त पश्चिमेकडे म्हणजे अटलांटिकच्या पश्चिम भागात पोहोचला. तेथे त्यांना भूप्रदेश दिसला. सुरुवातीस त्यांना वाटले की, हे एक मोठे बेट असावे; परंतु तेथील किनाऱ्याचे समन्वेषण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हे बेट नसून एक मोठे खंड असावे. हा भूप्रदेश म्हणजेच दक्षिण अमेरिका खंडाच्या ईशान्य भागातील ब्राझील देशाच्या आग्नेय किनाऱ्याचा भूप्रदेश होता. अशाप्रकारे अगदी अपघातानेच २२ एप्रिल १५०० रोजी त्यांना ब्राझीलचा शोध लागला. त्यामुळे ब्राझीलच्या शोधाचे श्रेय काब्राल यांना दिले जाते. वास्को द गामांनी आपल्या भारताकडील सागरी मार्गाने केलेल्या सफरीच्या वेळी आलेल्या अनुभवांवरून त्यांनी दक्षिण अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस जमीन असल्याची चिन्हे नोदविली होती. काब्राल यांनी या भूप्रदेशाला लँड ऑफ द ट्रु क्रॉस असे नाव दिले. पुढे मॅन्युएल राजांनी त्या भूप्रदेशास होली क्रॉस असे नाव दिले. जहाजांवरून जमिनीवर उतरून तेथील भूप्रदेशाचे समन्वेषण करीत असताना तेथे काब्राल यांना मोठ्या प्रमाणावर ब्राझीलवुड नावाचे वृक्ष दिसले. त्या लाकडापासून लाल रंग तयार होतो. या वृक्षाला टेरा दो बासिल म्हणून ओळखले जाई. या वृक्षाच्या नावावरूनच या प्रदेशाला पुढे ब्राझील हे नाव पडले.

स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात १४९४ मध्ये झालेल्या टॉर्डासील्यसच्या तहानुसार ब्राझीलचा हा भाग पोर्तुगालच्या अखत्यारीतील पट्ट्यात येत होता. साहजिकच काब्राल यांनी त्यावर पोर्तुगालचा हक्क सांगितला. त्यामुळे ब्राझीलवर पोर्तुगीज सत्ता स्थापन झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. पुढील समन्वेषणाच्या प्रवासाचा मार्ग ब्राझीलवरून जात असल्यामुळे त्या मार्गाला ब्राझीलला वळसा घालून जाणारा मार्ग (Circle Around Brazil) म्हणून ओळखले जाई. ब्राझीलपर्यंतच्या प्रवासात काब्राल एक जहाज गमावून बसले होते. पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी त्यांनी ब्राझीलवर पोर्तुगालची सत्ता प्रस्थापित केल्याची बातमी मॅन्युएल राजाला देण्यासाठी एक जहाज परत पोर्तुगालला पाठविले. ब्राझीलच्या भूमीवर ८ ते १० दिवस घालविल्यानंतर उर्वरित ११ जहाजांसह काब्राल पूर्वेकडे भारताकडील प्रवासासाठी निघाले.

केप ऑफ गुड होपला वळसा घालून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच २९ मे १५०० रोजी अचानक आलेल्या वादळात त्यांची जहाजे विखुरली गेली. चार जहाजांचा तर पत्ताच लागला नाही. त्यांच्यातील लोकांसह ती नाहीशी झाली. दीयश बार्थालोमेऊ यांचाही त्यात अकाली अंत झाला. एक जहाज मादागास्करला पोहोचले. त्यानंतर उर्वरित सर्व सहा जहाजे मोझँबीकजवळ एकत्र मिळाली. तेथून ती आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याने उत्तरेकडे निघाली. स्थानिकांकडून माहिती घेतघेत ती जहाजे पूर्वेकडे वळविली. हिंदी महासागर पार करून ही जहाजे १३ सप्टेंबरला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील, सांप्रत केरळमधील कालिकत (कोझिकोडे) बंदरात पोहोचली. सुरुवातीला तेथील झामोरीन राज्यकर्त्याबरोबरील व्यापारी हक्कांबद्दलच्या आणि वखार स्थापन करण्याबद्दलच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या. तेथे कारखाना आणि व्यापारी ठाणे स्थापन करण्याची त्यांना परवानगीही मिळाली होती; परंतु तेथील अरब व्यापाऱ्यांना शंका आली की, पोर्तुगीजांच्या या विस्तारवादी व्यापारी धोरणामुळे व्यापारातील आपली मक्तेदारी संपुष्टात येईल. त्यामुळे चिडून मुस्लिम आणि हिंदू दोघांनीही १७ सप्टेंबर रोजी पोर्तुगीजांवर अचानक हल्ला केला. त्यात काही पोर्तुगीज लोक मारले गेले. पोर्तुगीजांनीही प्रतिकार करीत तेथील अरब व्यापाऱ्यांची जहाजे लुटली, त्यांना आगी लावल्या आणि कालिकत शहरावर बाँबहल्ले केले. कालिकत येथील अपयशामुळे काब्राल हे दक्षिणेकडील कोची (कोचीन) आणि कननोर (कन्नूर) येथे गेले. तेथील राज्यकर्त्यांशी व्यापारासंदर्भातील मित्रत्वाची बोलणी यशस्वी झाली. मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करण्यास आणि व्यापारी ठाणी स्थापन करण्यास त्यांना परवानगी मिळाली. मौल्यवान मसाल्याच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ते त्यांनी आपल्या सहा जहाजांत भरले. १६ जानेवारी १५०१ रोजी काब्राल हे परत पोर्तुगालला निघाले. परतीच्या प्रवासात सहापैकी दोन जहाजांत पाणी शिरून ती बुडाली. पोर्तुगालवरून सफरीसाठी १३ जहाजांसह निघालेले काब्राल फक्त चार जहाजांसह २३ जून १५०१ रोजी लिस्बनला परतले. पोर्तुगाल (यूरोप) ते भारत (आशिया) असा सागरी मार्गाने प्रवास करणारे वास्को द गामा यांच्यानंतरचे काब्राल हे दुसरे प्रवासी ठरले.

मॅन्युएल राजांनी भारताकडे दुसरी सफर पाठविण्याचा निर्णय घेतला. या सफरीसाठीही राजांनी काब्राल यांचाच विचार केला होता. त्यादृष्टीने काब्राल यांनी आठ महिने सफरीची तयारीही केली; परंतु वास्को द गामा व इतर मार्गनिर्देशकांनी त्यांना विरोध केला. प्रमुख नौ-सेनाधिपती या नात्याने तो माझाच हक्क असल्याचे गामांनी राजांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच काब्राल यांच्या पहिल्या सफरीच्या यशस्वीतेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. काब्राल यांच्या पहिल्या सफरीतील जहाजांच्या प्रचंड नुकसानीस आणि त्यांवरील लोकांच्या मृत्यूस काब्राल हेच जबाबदार असल्याचे दाखवून दिले गेले. त्यांच्या राजकारणी वृत्तीवरही खूप टीका होत होती. त्यांच्या ब्राझीलच्या प्रथम शोधावरही अनेक ऐतिहासिक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. ब्राझीलला जाणारे पहिले यूरोपीय काब्राल की, त्यांच्या आधी स्पॅनिश किंवा फ्रेंच समन्वेषक, दर्यावर्दी तेथे पोहोचले असावेत, याबाबत दुमत आहे; कारण काब्राल यांच्या आधी स्पॅनिश समन्वेषक व्हिथेंते यान्येत पिंथॉन (Vicente Yanez Pinzon) ७ फेब्रुवारी १५०० रोजी ब्राझीलच्या किनाऱ्यावर पोहोचल्याचे दाखले मिळतात. भारताकडे जाताना काब्राल हे दूरवर असलेल्या ब्राझीलला अपघाताने पोहोचले की, जाणीवपूर्वक? या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांच्या विरोधकांकडे कोणतेही लिखित आणि ठोस पुरावे नसल्यामुळे काब्राल यांनी अपघाताने ब्राझीलचा शोध लावला, हे मान्य केले जाते. काब्राल यांना असलेल्या विरोधाचा विचार करून राजांनी त्यांना डावलून वास्को द गामाची निवड नव्या सफरीसाठी केली.

काब्राल यांनी त्यानंतर राजदरबारातील सेवेतून निवृत्ती घेतली. पोर्तुगालचा राजा डोम फर्नांदो दुसरा यांच्या घराण्यातील श्रीमंत युवती इझाबेल दे कास्ट्रो हिच्याशी १५०३ मध्ये काब्राल यांनी विवाह केला. त्यानंतर बेईरा बाइक्सा प्रांतातील स्वमालकीची स्थावर मिळकत असलेल्या ठिकाणी ते राहायला गेले. सांतारेम येथे त्यांचे निधन झाले. ब्राझीलचा इतिहासतज्ज्ञ फ्रान्सिस्को आडॉल्फो व्हार्नहेगन याला पोर्तुगालमधील सांतारेम शहरी काब्राल यांचे थडगे आढळले. काब्राल यांच्या पाचव्या जन्मशताब्दीवर्षानिमित्ताने १९६८ मध्ये ब्राझील आणि पोर्तुगाल या देशांनी एकत्र मिळून एक समारंभ आयोजित केला होता. तसेच ब्राझील व भारताकडील सफर करणाऱ्या या ॲडमिरलच्या स्मरणार्थ ब्राझीलमधील रिओ दे जानेरो आणि पोर्तुगालमधील लिस्बन येथे त्यांची स्मारके उभारण्यात आली.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा