ली क्वॉन यू : (१६ सप्टेंबर १९२३ – २३ मार्च २०१५). आग्नेय आशियातील सिंगापूर या स्वतंत्र, सार्वभौम नगरराज्याचे राष्ट्रनिर्माते व पहिले प्रधानमंत्री. १९५९ ते १९९० अशी ३१ वर्षे त्यांनी प्रधानमंत्री पद भूषविले. सिंगापूर येथे त्यांचा जन्म झाला. ‘एलकेवायʼ या नावानेही परिचित. त्यांच्या वडिलांचे नाव ली चिन कुन, तर आईचे नाव चुवा जिम नेवो असे होते. ली यांचे शिक्षण राफेल्स इन्स्टिट्यूशन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केंब्रिज येथे झाले. त्यांनी केंब्रिजमधील फिट्झविल्यम कॉलेजमधून कायद्याची पदवी उच्च गुणवत्तेसह पहिल्या वर्गात मिळवली. ते १९५० साली लंडनच्या मिड्ल टेम्पलमधून बॅरिस्टर झाले. १९५९ पर्यत त्यांनी वकिली व्यवसाय केला. ली क्वॉन यू यांचा विवाह १९५० साली झाला. त्यांच्या पत्नीचे नाव क्वा जीवोक चू. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये झाली. सिंगापूरचे विद्यमान प्रधानमंत्री ली सुएन लुंग हे ली क्वॉन यू यांचे पुत्र आहेत.

सिंगापूर येथे ब्रिटिशांची वसाहत व नाविक तळ होता. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आशिया खंडात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली. सिंगापूरमधील ब्रिटिश राजवटीचा शेवट करण्यासाठी १९५४ साली स्थापन झालेल्या पीपल्स ॲक्शन पार्टी (पीएपी) या पक्षाने तेथे स्वातंत्र्यचळवळ संघटित केली. ली त्या पक्षाचे एक संस्थापक आणि पक्षाचे पहिले महासचिव होते. त्यांनी पक्ष महासचिव पद १९९२ पर्यंत सांभाळले आणि आपल्या पक्षाला आठ वेळा निवडणुकांत विजय मिळवून दिला. पीपल्स ॲक्शन पार्टीचा स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला. ब्रिटिश सरकारने १९६३ साली सिंगापूर व मलाया यांना स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय सार्वमताचा कौल पाहून मलाया, सिंगापूर, बोर्निओ, सारावारू या प्रांतांचे मिळून मलेशिया नावाचे नवीन संघराज्य निर्माण करण्यात आले; तथापि नवीन संघराज्यातील वांशिक संघर्ष व वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षांनी १९६५ मध्ये या संघातून सिंगापूर बाहेर पडले, तेव्हा ली यांनी सिंगापूरला स्वतंत्र व सार्वभौम नगरराज्य म्हणून विकसित करण्याचे ठरवले.

त्यांनी मोठ्या कल्पकतेने, दृढ निर्धाराने व कठोर शिस्तीने सिंगापूरची जडणघडण एका आधुनिक सधन राष्ट्रात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूरचे अल्पावधीत तिसऱ्या जगातील अविकसित देशामधून पहिल्या जगातील विकसित देश असे स्थित्यंतर झाले. सिंगापूर हे वित्त व व्यापार यांचे महत्त्वाचे जागतिक केंद्र बनले आहे. पर्यटन हा त्या देशाचा मोठा व्यवसाय आहे. त्यांनी सिंगापूरच्या धर्मनिरपेक्षता व बहुसांस्कृतिकतेचा विकास करून आशियाच्या भूमीवर पूर्णपणे यूरोपीय वळणाचे आधुनिक संसदेसह मलायी राज्य निर्माण केले. ब्रिटिश वसाहतवादाच्या जोखडातून सिंगापूरला मुक्त करून आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून त्याचा नावलौकिक वाढवण्यात ली यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची होती.

ली यांची संसदीय कारकीर्द प्रदीर्घ होती. १९५५ ते १९५९ या काळात ते सिंगापूरचे पहिले विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते विविध मंत्रिपदांवर कार्यरत होते. ते सिंगापूरचे पहिले प्रधानमंत्री (१९५९–१९९०), प्रधानमंत्री कार्यालयातील दुसऱ्या क्रमाकांचे ज्येष्ठ मंत्री (१९९०–२००४), त्यानंतर त्यांचे पुत्र प्रधानमंत्री ली सुएन लुंग यांच्या कार्यकाळात सिंगापूरचे मार्गदर्शक मंत्री (२००४–२०११) या पदांवर कार्यरत होते. ते अखेरपर्यत सिंगापूरच्या संसदेचे सदस्य होते (२०१५).

ली यांनी विपुल ग्रंथ लेखन केले. त्यांपैकी दि सिंगापूर स्टोरी (१९९८) आणि फ्रॉम थर्ड वर्ल्ड टू फर्स्ट : सिंगापूर स्टोरी (२०००) हे आठवणींचे खंड, तसेच २०१३ मध्ये प्रकाशित झालेले दि विट् ॲण्ड विजडम ऑफ एलकेवाय आणि वन मॅन्स व्ह्यू ऑफ द वर्ल्ड हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

सिंगापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Josey, Alex, Lee Kuan Yew: The Crucial Years, 1968.
  • Drysdale, John, Singapore: Struggle for Success, 1984.
  • कदम, य. ना.; भोसले, अरुण, चालू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, कोल्हापूर, २०१७.
  • कुलकर्णी, प्रसाद, संपा., प्रबोधन प्रकाशन ज्योती, अंक : ३२९, समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी, एप्रिल २०१५.

       समीक्षक : अवनीश पाटील