भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील तसेच भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बांदीपोरा जिल्ह्यात, श्रीनगर शहराच्या वायव्येस ३२ किमी.वर हे सरोवर आहे. भूसांरचनिक क्रियेतून निर्माण झालेल्या द्रोणीमध्ये या सरोवराची निर्मिती झाली असून ते काश्मीर खोऱ्याच्या उत्तर टोकाशी सस.पासून १,५७९ मी. उंचीवर आहे. सरोवराचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ३४० १६′ ते ३४० २६′ उ. व ७४० ३३′ ते ७४० ४२′ पू. यांदरम्यान आहे. विस्तारलेल्या या सरोवराची लांबी १६ किमी. व रुंदी १० किमी. असून त्याचा विस्तार ऋतुनुसार ३० ते २६० चौ. किमी. असतो. सर्वसाधारण परिस्थितीत त्याचा विस्तार सुमारे ३२ चौ. किमी., सरासरी खोली ३.६ मी. व परिघ सुमारे ४८ किमी. असतो. पूरपरिस्थितीत हा विस्तार २६० चौ. किमी.पर्यंत वाढतो व त्यामुळे आजूबाजूचा सखल भाग जलमग्न होतो. झेलम, हरबुजी, आराह, पोहरू, बंदीपूर (प्राचीन मदुमती), बोहनर व एरिन हे प्रवाह वुलरला येऊन मिळतात. झेलम नदी दलदलीच्या प्रदेशातून वाहत येऊन आग्नेयकडून वुलरला मिळते, तर सरोवराच्या नैर्ऋत्य काठावर असलेल्या सोपूर नगराजवळ ती सरोवरातून बाहेर पडते. वुलर सरोवरामुळे झेलम नदीतील पाण्याच्या पातळीचे नियमन होते.
प्राचीन काळी महापद्मसर या नावाने हे सरोवर ओळखले जाई. पंडू (पांडव) घराण्यातील सुंदरसेन या राजाची राजधानी असलेले संदिमननगर भूकंपामुळे गाडले गेले व त्याजागी पाणी साठून वुलर सरोवराची निर्मिती झाली, असे मानले जाते. मध्ययुगीन इतिहासकार अल् बीरूनी यांनी या सरोवराला बोलोर असे संबोधले आहे. मोठ्या विस्तारामुळे सरोवरात खळाळत्या उंच लाटा निर्माण होतात. त्यांना संस्कृतमध्ये उल्लोला म्हणतात. वुलोर किंवा वुलर हा बोलोर किंवा उल्लोला याचे अपभ्रंश रूप असावे. काश्मीरी शब्द वुल म्हणजे खंड किंवा भेग. प्राचीन काळी येथे खंड किंवा भेग पडून निर्माण झालेल्या द्रोणीमध्ये हे सरोवर निर्माण झाल्याने त्याचे वुलर नाव पडले असावे, अशीही एक शक्यता सांगितली जाते. वुलर सरोवर म्हणजे सतत हेलकावे खाणाऱ्या निळ्या पाण्याचा जणू समुद्रच आहे. वादळी हवामानाच्या काळात तर पर्वतीय भागांकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे सरोवरात अधिकच उंच लाटा उसळतात. सपाट बुडाच्या होड्यांना त्या फार धोकादायक ठरतात. अशा काळात प्रवास करताना काही होड्या बुडत असत. होड्यांचे वादळापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने तसेच आवश्यकता भासल्यास होड्यांना वाटेत थांबता यावे म्हणून काश्मीरचा सुलतान झैन-उल्-आबीदीन (पंधरावे शतक) यांनी सरोवराच्या मध्यात ९१ मी. लांबीचे व ७७ मी. रुंदीचे एक बेट तयार करून घेतले (इ. स. १४४४). त्याला झैना लँक किंवा झैना डेंब हे नाव देण्यात आले. या बेटावर पंधराव्या शतकातील अवशेष आढळतात. सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठांलगत उंच पर्वत आहेत. पश्चिम काठावर असलेल्या वतलब टेकडीवर बाबा शुक्रुद्दीनची कबर आहे. सरोवरालगत एक विश्रामधामही आहे.
केंद्र शासनाने पर्यटन विकासाच्या दृष्टीने येथे नौकानयन, जलक्रीडा, पाण्यातील स्कीइंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आजूबाजूच्या खेड्यांतील रहिवाशांना या सरोवरामुळे व्यवसाय उपलब्ध झाले आहेत. सरोवरात मासेमारी चालते. श्रीनगर व इतर नागरी केंद्रांना याच सरोवरातून माशांचा पुरवठा होतो. सरोवरातील पाण्याची पातळी थोडी जरी वाढली, तरी लगतच्या काही गावांतील रहिवाशांच्या जमिनी पाण्याखाली जातात. तेव्हा त्यांचा सरोवरातील मासेमारी व शिंगाडा फळे गोळा करणे हाच मुख्य व्यवसाय असतो.
वुलर सरोवराच्या मुखाशी तुलबूल प्रकल्प उभारण्याची भारताची योजना आहे. त्याअंतर्गत १३४ मी. लांबीचा व १२ मी. उंचीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. १९८४ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले; परंतु १९८७ पासून या प्रकल्पावरून भारत-पाकिस्तान यांच्यात पाणी वाटपावरून वाद निर्माण झाले. त्याचवर्षी प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले.
वुलर सरोवराच्या सभोवताली आणि झेलम नदीच्या खोऱ्यात विस्तृत आर्द्रभूमी किंवा पाणथळ प्रदेश आहे. जैवविविधता, जलवैज्ञानिक आणि सामाजिक-आर्थिक दृष्ट्या ही आर्द्रभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचे सखोल संवर्धन, व्यवस्थापन आणि त्याच्या शाश्वत उपयोगाच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने १९८६ मध्ये या प्रदेशाला रामसर क्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यानंतर १९९० मध्ये आंतरराष्ट्रीय रामसर क्षेत्र म्हणून त्याची घोषणा करण्यात आली.
इराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ साली भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेस्टलँड्स’ या परिषदेला ‘रामसर परिषद’ (संमेलन) असे संबोधले जाते. या परिषदेत जगातील आर्द्रभूमींचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरण पूरक वापराविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्ट्या महत्त्वाच्या आर्द्रभूमी शोधून त्यांना ‘रामसर क्षेत्र’ म्हणून घोषित करावे. या परिषदेने तयार केलेला कृती आराखडा १९७५ मध्ये झालेल्या दुसऱ्या परिषदेत संमत करण्यात आला. या आराखड्यात आर्द्रभूमीची व्याख्या केली आहे. त्यानुसार सरोवरे, नद्या, तलाव, दलदलीचे प्रदेश, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्र किनारे, खारफुटी वने, भातखाचरे, वाहते तसेच शांत पाणी असलेली पाणस्थळे, बारमाही तसेच हंगामी पाणथळींच्या जागा, मत्स्य संवर्धनाची तळी, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे इत्यादींचा समावेश आर्द्रभूमीमध्ये केला जातो. त्यानुसार वुलर सरोवर प्रदेश ‘रामसर क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
समीक्षक : ना. स. गाडे