उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा आणि संयुक्त संस्थानांतील एक निसर्गसुंदर गोड्या पाण्याचे सरोवर. याचा विस्तार कॅनडातील आँटॅरिओ व मॅनिटोबा प्रांतांत आणि संयुक्त संस्थानातील मिनेसोटा राज्यात झालेला आहे. या सरोवराचा दोन तृतीयांश भाग कॅनडात आणि एक तृतीयांश भाग संयुक्त संस्थानांत आहे. स. स. पासून ३२३ मी. उंचीवर असलेले हे सरोवर तुलनेने उथळ असून त्याचा आकार अनियमित आहे. या सरोवराची लांबी सुमारे ११० किमी., रुंदी ९५ किमी., क्षेत्रफळ ४,४७२ चौ. किमी., सरासरी खोली ८ मी. आणि कमाल खोली ६४ मी. आहे. या सरोवराच्या किनारपट्टीची लांबी ४०,००० किमी. असून त्याचे जलवाहनक्षेत्र ७०,३७० चौ. किमी. आहे. सरोवरात १४,००० पेक्षाही अधिक बेटे आहेत. या सरोवराला आग्नेयीकडून रेनी नदी येऊन मिळते. रेनी नदीशिवाय काकागी आणि शोल ही सरोवरे लेक ऑफ द वुड्स सरोवराच्या पाण्याचे इतर प्रमुख स्रोत आहेत. ईशान्य भागातून बाहेर पडणारी विनिपेग नदी पुढे विनिपेग सरोवराला जाऊन मिळते. विनिपेग सरोवराचे पाणी नेल्सन नदीमार्गे अखेरीस हडसन उपसागराला मिळते. नॉर्थवेस्ट अँगल हा सरोवर भाग कॅनडा आणि संयुक्त संस्थाने या दोन्ही देशांच्या सीमेवरील भाग आहे. जागतिक तापमानवाढीमुळे जलवाहन क्षेत्रातील हिमनद्यांचे बर्फ वितळून सरोवराला मिळणाऱ्या प्रवाहांचे पाणी वाढत आहे. त्यामुळे या सरोवराच्या पाणीपातळीत आणि विस्तारात वाढ होत आहे.

फ्रेंच समन्वेषक झाक दे नोयोन यांनी इ. स. १६८८ मध्ये सर्वप्रथम या सरोवरास भेट दिली. त्या वेळी पश्चिम कॅनेडियन प्रदेश आणि पंचमहासरोवरे यांदरम्यानचा लेक ऑफ द वुड्स हा प्रमुख फर व्यापारमार्ग बनला होता. सभोवतालच्या प्रदेशात असलेल्या दाट जंगलामुळे सरोवराला हे नाव पडले असावे. वन्यजीवांचा हा प्रमुख अधिवास आहे. या भागात अनेक सुंदर पक्षी दिसून येतात. सरोवरात विविध जातीचे मासे आढळून येतात. या सरोवर प्रदेशात आँटॅरिओची प्रसिद्ध अशी चार प्रांतीय उद्याने आहेत. सभोवतालच्या शहरांतून या सरोवराच्या पाण्यात विविध प्रकारची अपशिष्टे व सांडपाणी सोडल्यामुळे सरोवरातील पाण्याच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. सरोवराच्या परिसरातील निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आणि सरोवरातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ पाणी अधिनियम (१९७२) हा कायदा करण्यात आलेला आहे. कॅनडा आणि संयुक्त संस्थाने या दोन्ही देशांनी या सरोवराच्या संवर्धनास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे.

पर्यटन हा या सरोवराच्या परिसरातील स्थानिक अर्थकारणाचा प्रमुख भाग आहे. सरोवराच्या उत्तर टोकाशी केनोरा नगर असून ते पर्यटन, लाकडाचा लगदा व कागदगिरण्या, पीठगिरण्या, मत्स्यप्रक्रिया आणि बोटी बांधण्याच्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय अनेक वसाहती (टाउनशिप) आणि नगरे या सरोवराच्या परिसरात आहेत. उदा., नॉर्थवेस्ट अँगल, अँगल टाउनशिप इत्यादी. तुलनेने हे सरोवर एकाकी आहे; परंतु सरोवरात आणि सरोवराच्या परिसरात उपलब्ध असलेली असंख्य रिसॉर्ट्स आणि विविध मनोरंजनाच्या सुविधा यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. नेस्टर फॉल परिसरात पर्यटकांना हवाई उड्डाणे करण्यासाठी छोटी विमाने उपलब्ध आहेत. जलपर्यटनासाठी सरोवरात क्रूझ सेवा उपलब्ध आहे.

समीक्षक : वसंत चौधरी