आचरेकर, मुरलीधर रामचंद्र : (१४ नोव्हेंबर १९०७ – १८ डिसेंबर १९७९). श्रेष्ठ वास्तववादी चित्रकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलादिग्दर्शक. त्यांचा जन्म पनवेल (जि. रायगड)  जवळील आपटे या गावी झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. गिरगावातील केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे घेतले. पुढे त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळाला; परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही.

वयाच्या सोळाव्या वर्षी आचरेकर यांचे जलरंगातील एक चित्र चित्रमय जगत या नियतकालिकात प्रकाशित झाले. १९२३ मध्ये त्यांनी शिळामुद्रण पद्धतीचा (Lithography) अभ्यास केला आणि स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. त्यांच्या कॉन्सेन्ट्रेशन  या व्यक्तिचित्राला १९२९ मध्ये भावनगर महाराजांचे पारितोषिक प्राप्त झाले. पुढे बंगलोर व नागपूर येथील प्रदर्शनांत याच चित्राला सुवर्णपदकही मिळाले. त्यांचे टॉयलेट (१९२९) हे तैलचित्र विशेष गाजले. यातील नाट्यपूर्ण प्रकाशयोजना, आरशातील प्रतिबिंबाची अचूकता, चेहऱ्यावरील हावभाव, स्त्रीने नेसलेल्या नऊवारीच्या चुण्या हे सर्व अतिशय अप्रतिम आहे. हे चित्र आजही जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या संग्रही पाहावयास मिळते. आचरेकरांच्या प्रेयर या चित्राला १९३० मध्ये बाँबे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळाले, तर १९३१ मध्ये रिपोझ या चित्राला सुवर्णपदक मिळाले. यांशिवाय शृंगार – कागदावर जलरंग (सु. १९३०), डिव्हाइन म्यूझिक – कागदावर जलरंग (सु. १९३२), नेहरू व ख्रुश्चॉव्ह – कागदावर पेन्सिल (सु. १९६०) या त्यांच्या आणखी काही उल्लेखनीय कलाकृती होत.

नेहरू व ख्रुश्चॉव्ह – कागदावर पेन्सिल (सु. १९६०).

आचरेकर यांनी १९३२ ते १९३४ या काळात लंडनच्या रॉयल कॉलेजमध्ये चित्रकलेचे उच्च शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी गोलमेज परिषद हे चित्र काढले. १९३५ मध्ये भारताचे तत्कालीन  व्हॉइसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांच्या शिफारशीवरून त्यांना पंचम जॉर्जच्या राज्यारोहणाची चित्रे रंगवण्यासाठी लंडनला पाठवण्यात आले. हा त्यांचा सन्मानच होता. १९३७ ते १९३९ या काळात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेचे ते अध्यक्ष होते.

आचरेकर यांनी प्रथम दिल्ली आणि नंतर मुंबई येथे ‘आचरेकर कला अकादमी’ची स्थापना केली. त्यांच्या दिल्ली येथे भरलेल्या पहिल्या एकल प्रदर्शनाचे उद्घाटन मंडीच्या महाराजांच्या हस्ते झाले. शाहजहान (१९४६) या चित्रपटासाठी दिग्दर्शक अब्दुल रशीद करदार यांना हिंदू–इस्लामी स्थापत्यकलेत निपुण असलेला कलादिग्दर्शक हवा होता. त्यासाठी त्यांनी आचरेकरांना निमंत्रित केले. याच चित्रपटापासून त्यांची कलादिग्दर्शक म्हणून चित्रपटकारकीर्द सुरू झाली. पुढे प्रसिद्ध चित्रपटकलावंत, दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि आर. के. समूहाशी ते जोडले गेले. श्री ४२० (१९५५) या प्रसिद्ध चित्रपटातील एका गाण्यातील रस्त्याचे चित्रीकरण आचरेकरांच्या कल्पक नेपथ्यावर झाले आहे. यात दिव्यांचे खांब आणि प्रकाशयोजनेच्या साहाय्याने दूरवर जाणारा भासमान रस्ता दाखवला आहे. या चित्रपटाबरोबरच मीना बाजार (१९५०), नौजवान (१९५१), आन (१९५२), दिल ए नादान (१९५३) आवारा (१९५६), संगम (१९६०), आम्रपाली (१९६६) इत्यादी अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शनही त्यांनी केले. आवारा या चित्रपटामधील स्वप्नदृश्य देखावा हिंदी चित्रपटसृष्टीत खूपच लक्षणीय ठरला. त्यांना १९५७, १९५९ आणि १९६१ सालचा कलादिग्दर्शनासाठीचा पुरस्कार मिळाला.

शृंगार – कागदावर जलरंग (सु. १९३०).

आचरेकरांनी काढलेली व्यक्तिचित्रे खूप गाजली. त्यांनी राजकीय पुढारी, गायक, चित्रपटसृष्टीतील कलावंत यांची व्यक्तिचित्रे काढली. गुरुदत्त, नर्गिस, वहिदा रहमान, लता मंगेशकर, मीनाकुमारी यांची व्यक्तिचित्रे त्यांना समोर बसवून त्यांनी रंगविली. त्याचप्रमाणे गोलमेज परिषद, १९४७ सालचे भारताचे स्वातंत्र्य, १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना अशा ऐतिहासिक घटनांवर त्यांनी चित्रे काढली. तसेच काही समारंभांत प्रत्यक्ष उपस्थित राहून आरेखनांच्या (Sketches) आधारे त्यांनी चित्रे काढली. त्यांत बडोदा संस्थानच्या गायकवाड महाराजांचा राज्याभिषेक (कॅनव्हासवरील तैलरंग), पंचम जॉर्जचे राज्यारोहण इत्यादींचा समावेश आहे. या चित्रांतून व्यक्ती, स्थान यांसोबतच अलंकरण, पेहराव यांचाही त्यांचा विशेष अभ्यास प्रत्ययास येतो. त्यांनी पेन्सिलच्या साहाय्याने तिरप्या रेषांच्या वेगवान फटकाऱ्यांनी (Strokes) काढलेली आरेखने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रवासात ते नेहमी आरेखनपुस्तक जवळ बाळगत. त्यांची ही आरेखने स्क्रेपर्स अँड फ्लाइंग गंधर्वाज या पुस्तकात प्रसिद्ध आहेत. या पुस्तकास राष्ट्रपती ताम्रपत्र पुरस्कार लाभला आहे. मानवाकृती, रचनाकृती, निसर्गचित्रे, प्रसंगचित्रे अशी विविध प्रकारची चित्रे त्यांच्यातील समर्थ कलावंताची साक्ष देतात.

बडोदा नरेशांचा राज्याभिषेक – कॅनव्हासवरील तैलरंग.

चित्रकला, कलादिग्दर्शन, कलाशिक्षण, पुस्तकप्रकाशन अशा विविध क्षेत्रांत आचरेकरांनी मुसाफिरी केली. विविध क्षेत्रांतील त्यांच्या मौलिक योगदानाप्रीत्यर्थ त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. १९६८ मध्ये भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. रेखा पब्लिकेशन ही त्यांची स्वतःची प्रकाशनसंस्था होती. रूपदर्शिनी हे त्यांचे पुस्तक भारतीय शिल्पाकृती आणि वास्तववादी शैलीतील शरीरप्रमाणबद्धता या विषयावर आहे. १९७९ मध्ये राष्ट्रपती संजीव रेड्डी यांचे चित्र काढण्यास त्यांना आमंत्रित करण्यात आले; मात्र दिल्ली स्थानकावरच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ :

  • बहुळकर, सुहास; घारे, दीपक, संपा., दृश्यकला – शिल्पकार चरित्रकोश,  खंड – ६, हिंदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई, २०१३.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा