दोदिया, अतुल : (२० जानेवारी १९५९). भारतातील उत्तर आधुनिक चित्रकलेतील आघाडीचे प्रसिद्ध चित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव नंदकुँवर होते, तर त्यांचे वडील बच्चूलाल हे इमारतींच्या बांधकामाच्या ठेकेदारीचे काम करीत. अतुल यांचे शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथे झाले. पुढे त्यांनी फ्रान्स सरकारच्या शिष्यवृत्तीवर पॅरीसच्या इकोल-दे-बाउझ-आर्टस् या संस्थेमध्ये कला प्रशिक्षण घेतले. या काळातील फ्रान्समधील वास्तव्याने कलेबाबतचा त्यांचा दृष्टीकोन अमूलाग्र बदलला. कोणतीही प्रतिमा, चित्रपद्धत, शैली, माध्यम त्यांनी मानले नाही; किंबहुना या सर्वांच्या एकत्रीकरणातून एक नवी शैली त्यांनी भारतीय कलाजगतात निर्माण केली.
१९९१ मध्ये गॅलरी केमोल्ड येथील एकल प्रदर्शनातील त्यांचे जॅन हे चित्र गाजले. मुंबईच्या नरीमन पॉईंट भागाची पार्श्वभूमी या चित्रात असून अतुल यांचे ते आत्मचित्र आहे. हातात पिस्तुल, शर्टचे बटण उघडे आणि डोळ्यावरील गॉगलमध्ये एका बाजूला भूपेन खक्कर यांचे व्यक्तीचित्र तर दुसऱ्या बाजूस ब्रिटिश चित्रकार डेव्हिड हॉकनी यांचे व्यक्तीचित्र दाखवून त्यांनी यातून आपली स्फूर्तीस्थाने स्पष्टपणे मांडली आहेत.
अतुल दोदिया यांनी १९९६-९७ च्या सुमारास चित्रकार रवी वर्मा यांच्या चित्रांबरोबर पिकासोच्या चित्रांचे काही मिश्रण करून संमिश्र परिणाम दर्शविणारी चित्रे काढली. याच सुमारास महात्मा गांधींच्या फोटोद्वारे काही जलरंगातील चित्रेदेखील त्यांनी काढलेली होती. काही चित्रांमध्ये विरोधाभास तर काही चित्रांना विनोदाची झालर होती. १९९९ मधील त्यांचे विमेन वुईथ चक्की हे चित्र महत्त्वपूर्ण ठरले. चित्रातील वेगळेपणा आणि शैलीतील मिश्रस्वरूपामुळे हे चित्र उठावदार झाले. २००१ च्या सुमारास ट्यूब्स-डेसारखे ताजमहालाच्या पार्श्वभूमीवर जागतिक नेते सपत्नीक अशी एनॅमल माध्यमातील व लॅमीनेट बोर्डावरील चित्रे हे त्यांचे वेगळे प्रयोग आहेत.
२००३ मधील ॲन्टलर ॲन्थॉलॉपी या मालिकेद्वारे त्यांनी गुजराथी कवितांचा वापर चित्रघटकांप्रमाणे केला. वैविध्यपूर्ण मालिका हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. २००८-०९ च्या सुमारास अतुल यांनी दुकानांच्या शटर्सचा वापर चित्रप्रतल म्हणून केला. वरती दुकानाचे नाव, शटरवर काही प्रतिमा व ते अर्धवट उघडल्यावर त्यावर वेगळीच धक्कादायक प्रतिमा असा एकूण वास्तव वाटणारा दृश्याभास अतुल यांनी कॅनव्हासवर आणला. त्यामध्ये लोकमानसातील प्रसिद्ध प्रतिमा, नामवंत देशी-विदेशी चित्रकारांची चित्रे अशा कितीतरी गोष्टींचा प्रतिमा म्हणून वापर केला आहे. २००४ साली क्रॅक्स इन मॉन्ट्रीऑन ही मालिका त्यांनी साकारली. या चित्रमालिकेत पी. व्ही. सी. पाईपचा वापर केला होता. यात चित्रावर ओरखडे दर्शविण्यासाठी त्यांनी संगमरवराची पावडर वापरली होती.
अतुल दोदिया यांनी काढलेली चित्रे टेट मॉडर्न, लंडन; सेंटर पॉम्पीडस, पॅरीस; फिलाडेल्फिया म्यूझियम, फिलाडेल्फिया; करण नादार संग्रहालय, दिल्ली; फुकुओका एशियन आर्ट म्युझियम, जपान अशा अनेक संग्रहालयात आहेत.
अतुल दोदिया यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९८२ साली महाराष्ट्र शासनाचे सुवर्णपदक, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे सुवर्णपदक, संस्कृती पुरस्कार (१९९५), सोथबी प्राइज (१९९९), रझा ॲवार्ड (२००८), हॉल ऑफ फेम ॲवार्ड इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
अतुल दोदिया यांचा विवाह अंजू दोदिया यांच्याशी झाला असून त्याही प्रसिद्ध भारतीय चित्रकार आहेत. त्यांची मुलगी बिराज हीही कलाकार आहे.
भारतीय आधुनिक कलेला आधुनिकतेच्या व शैलीबद्धतेच्या चाकोरीतून बाजूला काढण्याचे महत्त्वपूर्ण काम अतुल दोदिया यांच्या कलेने केले. भारत सरकारच्या आधुनिक कला संग्रहालय (NGMA), नवी दिल्ली येथे त्यांचे झालेले त्यांच्या चित्रांचे ‘रीट्रॉस्पेक्टीव्ह’ प्रदर्शन त्यांच्या या कार्याची साक्ष देणारे ठरले होते.
मुंबई येथे घाटकोपर परिसरात त्यांचा स्टुडिओ व वास्तव्य आहे.
संदर्भ :
- Dodia, Atul, Experiments with Truth : Atul Dodia Works 1981-2013, NGMA, New Delhi.
समीक्षण : स्मिता गीध