मानवी शरीर, अस्थी आणि सांगाडा यांची ओळख पटविण्यासाठी कायद्याच्या चौकटीतील विविध बाबींचा अभ्यास करणारे शास्त्र. न्याय मानवशास्त्राच्या अंतर्गत येणाऱ्या शास्त्रप्रणालीचा अभ्यास एकोणीसाव्या शतकात सुरू झाला. फॉरेन्सिक म्हणजे न्यायालयाच्या उपयोगाची अथवा संबंधीत माहिती. थॉमस ड्वाईट या शास्त्रज्ञांनी मानवाचे शरीर, अस्थी (हाडे) आणि सांगाडा यांची ओळख पटावी याकरिता ज्या कायदेशीर बाबींच्या संबंधांचा अभ्यास केला, त्यातूनच न्याय मानवशास्त्र या शाखेचा उगम झाला आहे.

जीवशास्त्रीय मानवशास्त्र मानवाच्या अस्थी, रक्तगट, शारीरिक विविधता इत्यादींचा सर्वंकष अभ्यास करते. ज्या वेळी एखादा न्यायवैद्यकीय प्रश्न समोर येतो, तेव्हा जीवशास्त्रीय मानवशास्त्रातील मानवमिती, रक्तगट, त्वचारेखाटन, दंत मानवशास्त्र अशा अभ्यास प्रणाली उपयोगात येतात. मिळालेल्या अस्थी मानवाच्याच आहेत का, मृत व्यक्तीच्या शरीराच्या अवस्थेवरून मृत्यू केव्हा झाला असावा, म्हणजेच मृत्यू होऊन किती काळ लोटला असावा, फक्त सांगाडा मिळाला असल्यास मृत व्यक्ती स्त्री असावी किंवा पुरुष, अस्थींच्या परीक्षणावरून व्यक्तीचे साधारण वय काय असावे, हाडांवरील कापल्याच्या अथवा तुटल्याच्या खुणांवरून मृत्यू नैसर्गिक असावा किंवा घडवून आणलेला असावा, मृत्यूचे नेमके काय कारण असावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी मानवशास्त्र न्याय साहाय्यक शास्त्राला म्हणजेच फोरेन्सिक सायन्सला मदत करते.

जीवशास्त्रीय मानवशास्त्रात मानवी विविधता जैवशास्त्रीय अंगाने अभ्यासली जाते. यात व्यक्तीचे वय, लिंग, शारीरिक लक्षणे, व्यक्ती कोणत्या समूहाची असावी इत्यादी समजू शकते. नैसर्गिक मृत्यूमध्ये तसेच वार्धक्यामुळे आलेल्या मृत्यूमध्ये अस्थींचा अभ्यास करून व शारीरिक अवयवांवरून मृताचे वय निश्चित करता येते. अस्थिंवर उमटणाऱ्या विशिष्ट खुणा मृत व्यक्तीच्या एखाद्या जुनाट आजाराकडे बोट दाखवतात. या विषयाचा अभ्यास पुराचिकित्साशास्त्रात केला जातो. अपघाताने आलेला मृत्यू, विषबाधेतून झालेला मृत्यू, गुदमरल्यामुळे ओढवलेला मृत्यू या सर्वांचे शरीरावर वेगवेगळे आघात होत असतात. त्यांच्या स्वरूपावरून मृत्यूविषयक अनुमान लावता येते. घडवून आणलेला मृत्यू म्हणजेच आत्महत्या किंवा खून यामध्येही अशाच प्रकारे अभ्यास करून मृत्यूचे कारण स्पष्ट करता येते.

चोरी, दरोडा, खून, बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये बोटांचे ठसे घेणाऱ्या (फिंगर प्रिंट) अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळालेल्या हात-पायांचे ठसे, वाळलेल्या/गोठलेल्या रक्ताचे डाग, व्यक्तीची लाळ, केस, नखे, वीर्य इत्यादी वस्तुजन्य पुराव्यांच्या आधारे व्यक्तीचा शोध घेणे सोपे झाले आहे. तसेच व्यक्तीचे शारीरिक गुणधर्म समजणे सोपे झाले आहे. मिळालेल्या रक्ताच्या नमुन्यावरून पिडीत व्यक्तीचा व संशयिताचा रक्तगट निश्चित केला जातो. यावरून गुन्ह्यात कोण व किती व्यक्ती गुंतल्या असाव्यात याचाही पुरावा मिळतो. हात-पायांचे ठसे संग्रहित ठशांशी ताडून, तुलना करून गुन्हेगाराबद्दल माहिती मिळू शकते. स्फोटासारख्या घटनेत जेव्हा मृत शरीराची ओळख पटणे अवघड असते किंवा अपघातांमध्ये एकाच ठिकाणी, एकाच वेळी अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो, त्यांची शरीरे तुकड्यांच्या स्वरूपात मिळतात, तेव्हा न्याय सहाय्यक मानवशास्त्रज्ञ हाडांची रचना, त्यांवरील खुणा, डीएनए यांच्या साहाय्याने उपलब्ध तुकडे एकत्रित करून एकसंधपणा आणण्याचा प्रयत्न करतात. मिळालेल्या अस्थींच्या अथवा चेहऱ्याच्या मोजमापांवरून मृतांच्या चेहरेपट्टीची पुनर्रचना (रिकंस्ट्रक्ट) करता येते. कवटीवरील मोजमापे घेतल्यावर त्याच्यावरील स्नायू, उती यांची रचना, त्याचे प्रमाण यांवरून संपूर्ण चेहरा पुनर्रचित करता येतो. यासाठी मानवमिती या शास्त्राची मदत घेतली जाते.

मानवमिती, रक्तगट, त्वचारेखाटन, दंतमानवशास्त्र आणि रेण्वीय मानवशास्त्र (मॉलिक्यूलर अँथ्रोपॉलॉजी) या सर्वांच्या साहाय्याने न्याय  मानवशास्त्राच्या कक्षा अधिक व्यापक झाल्या आहेत.

संदर्भ:

  • कुलकर्णी, शौनक, आदिम, पुणे, २००२.
  • Cummins, H. & Midlo, C., Finger Prints, Palms & Soles, New York, 1961.
  • Stewart, T. D., Essentials of Forensic Anthropology, USA, 1979.

समीक्षक : शौनक कुलकर्णी