मानवी उत्क्रांतीचा उलगडा करण्यासाठी अस्तीत्वात आलेली शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्रातील एक शाखा. पारंपारिक दंत वैद्यकशास्त्राच्या अखत्यारीत असलेल्या या विषयाला मानवशास्त्रज्ञांनी मानवाची उत्क्रांती समजून घेण्यासाठी विसाव्या शतकाच्या अखेरीस हात घातला. एखाद्या समाजाचा जीवशास्त्रीय अभ्यास व उत्क्रांती समजण्यासाठी हे शास्त्र उपयोगी पडते. दात हे दीर्घकाळ जमिनीत अखंड शाबूत राहत असल्याने उत्क्रांतीविषयक अभ्यासात पुरातत्त्वशास्त्रात हाडांपेक्षा दातांना विशेष महत्त्व आहे. कालौघात मानवसदृश्य कपिंच्या दातात उत्क्रांतीनुरूप झालेला बदल; सांस्कृतिक घटक, वातावरण आणि आहार यांचा मानवी दातांच्या स्वरूपावर व आकारावर होणारा परिणाम; त्या अनुषंगाने आहारशास्त्र व आरोग्य यांसारख्या अंगाने मानवी उत्क्रांतीचा अभ्यास; विविध समाजांचा तौलनिक अभ्यास इत्यादींमुळे दंत मानवशास्त्र ही आज महत्त्वाची शाखा ठरली आहे.

दंत्य मानवशास्त्रात इतर मानवशास्त्रीय शाखांप्रमाणेच प्राचीन मानव व आधुनिक मानव यांचा तौलनिक अभ्यास केला जातो. त्यामध्ये दातांचे स्वरूप, आकारमान, त्यांची मापे, दातांचा जबड्यांच्या आकाराशी असलेला संबंध, जबड्यांची एकमेकांवरील ठेवण, डाव्या व उजव्या बाजूंकडे दिसून येणारे फरक, दुधाचे दात किंवा कायमचे दात येण्याचे वय, दातांची रचना म्हणजेच एकमेकांवर दाटीवाटीने आलेले दात, लैंगिक भिन्नता अशा विविध घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश होतो.

पुराश्मयुग, मध्याश्मयुग, हडप्पा कालखंड, नवाश्मयुग, ताम्रपाषाणयुग तसेच महापाषाणयुग या मानवी उत्क्रांतीच्या कालखंडातील बहुतेक संस्कृतीमधील मानवी दातांचे अवशेष आजही उपलब्ध आहेत. मध्याश्मयुगातील मानवी दात कच्च्या आणि जाडसर आहारासाठी पूरक असावेत, असे त्यांच्या मोठ्या आकाराच्या दातांवरून दिसून येते. त्या तुलनेने हडप्पा संस्कृतीत सापडलेले लहान दात हे पूर्ण शिजलेल्या वा प्रक्रियायुक्त आहाराचा वापर तेथील लोक अन्न म्हणून करत असावेत, हे निदर्शनास आणून देतात. यांच्या आहारात पिष्टमय व कर्बोदके या पदार्थांचे प्रमाण जास्त असावे; कारण सापडलेल्या दातांत किडलेल्या दातांची संख्या अधिक पाहायला मिळते.

दातांची रचना, त्यांचे स्वरूप, त्यांचे आकारमान यांचा उत्क्रांती आणि आहाराशी निकटचा संबंध आढळून येतो. त्याचप्रमाणे सांस्कृतिक घटकांचा जीवशास्त्रीय घटकांवर होणारा परिणामही सूचित करतो. एकाच कालखंडातील विभिन्न संस्कृती त्यांच्यातील असलेल्या विविध भौगोलिक प्रदेशांमुळे, त्यांच्यातील अंतरांमुळे सांस्कृतिक व आहारविषयक घटकांमध्ये भिन्नता दिसून येतात. उदा., दायमाबाद संस्कृतीमध्ये (इ. स. पू. २२०० ते ११४०) लोकांची उपजीविका मुख्यत्वेकरून शिकारीवर अवलंबून होती; मात्र त्यांनी प्राथमिक स्वरूपात शेतीव्यवसायास सुरुवात केल्याचे दिसून येते. याउलट, याच संस्कृतीतील इ. स. पू. १६०० ते ७०० या कालखंडातील इनामगाव येथील लोक शेतीव्यवसायात प्रगत होते. त्यांचा उल्लेख ‘आद्य शेतकरी’ असा केला जातो. या कालखंडात शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, डुकरे, कुत्री, घोडे यांसारखे असंख्य पाळीव प्राणी त्यांनी बाळगल्याचे पुरावे सापडतात. त्यातील कित्येक प्राण्यांच्या हाडांवर मारल्याचे, भाजल्याचे वैशिष्ट्यपूर्ण खुणा आढळून आल्या आहेत. यांशिवाय इनामगाव येथे सापडलेली हत्यारे, तांब्याची औजारे, मातीच्या भांड्यांचे विविध प्रकार व इतरही काही कलाकृती यांवरून हा समाज दायमाबाद येथील समाजापेक्षा तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत असल्याचे दिसून येते. मांसाहाराबरोबरच बार्ली, गहू, वाटाणा, घेवडा इत्यादी प्रकारच्या प्रक्रियायुक्त अन्नाचा समावेश येथे केला जात असे. याचा दातांवरील परिणाम म्हणजे, दायमाबाद येथे सापडलेले दातांचे सरासरी आकारमान इनामगाव येथे सापडलेल्या दातांच्या सरासरी आकारमानापेक्षा थोडे मोठे आढळून आले आहे.

शेती व्यवसाय हा मानवी प्रगतीतील मोठा टप्पा मानला जातो. शेतीमुळे मानवाची स्थिर जीवनास सुरुवात झाली. माणुस हा समुहाने एकत्र राहू लागल्यामुळे कालांतराने खेडी, छोटी शहरे अस्तित्वात येऊ लागली. या प्रक्रियेत डोंगरी व दुर्गम भागातील लोकसमूह संकुचित होऊन प्रगत शेतकी जीवन जगणारे लोक डोंगरदऱ्यांमध्ये अतिक्रमण करून राहू लागले. या स्थित्यंतराबरोबरच काही आदिम जमातीतील लोकांनी प्रगतीशील लोकांबरोबर राहून त्यांच्याकडून शेती व इतर तंत्रज्ञान आत्मसात करून घेतले. अभिसरणाच्या प्रक्रियेत विविध गटांचे समूह निर्माण होऊ लागले. जे सर्वांत प्रगत समूह होते. त्यांनी अन्न शिजविणे, त्यावर प्रक्रिया करणे अशा इत्यादी कला अवगत करून घेतल्या. प्रक्रियायुक्त अन्न खाणाऱ्या मानवाच्या दातावरील ताण पुढे कमी होत गेला. पर्यायाने दाताचे आकारमान लहान झाले. पिढ्यांपिढ्या व वर्षानुवर्षे स्थिर नागरी जीवन जगणाऱ्या मानवी समूहांमध्ये दाताचे आकारमान हे भटक्या जमाती, कंदमुळे आणि शिकार करून मांस खाऊन जगणाऱ्या समूहांपेक्षा लहान आढळते. विशेषत्वाने हा फरक आफ्रीकन आणि आशियाई लोकांत उठून दिसतो. एस्किमो आणि ऑस्ट्रेलियन आदिवासी (ॲबॉरिजिनीझ्) यांचे दात आकाराने सर्वांत मोठे आढळून येतात.

निसर्गतः कपि व मानव यांच्या जबड्यांत दातांचे दोन संच असतात. पैकी पहिला संच दुधाच्या दातांचा, तर दुसरा कायमस्वरूपी होय. दातांचे आकार कार्यपरत्वे निरनिराळे असून त्यांच्या शिखरांच्या आकारावरून पटाशीचे दात, सुळे दात, उपदाढा आणि दाढा असे चार प्रकार दिसून येतात. दोनही जबड्यांतील डाव्या व उजव्या बाजूकडील दात एकाच प्रकारचे असून ते दर्शविण्यासाठी दंत्यसूत्र वापरला जातो. मनुष्यातील दंत्यसूत्र २-१-२-३ म्हणजेच कोणत्याही जबड्याच्या मध्याक्षाच्या डावी किंवा उजवीकडे अनुक्रमे पटाशीचे २, सुळा १, उपदाढा २ आणि दाढा ३ असे एकूण ८ दात दिसून येतात. एका जबड्यातील मध्याक्षाच्या एका बाजूला म्हणजेच डावीकडे किंवा उजवीकडे हा दातांचा संच असतो. एका जबड्यात खालच्या बाजूला दोन व वरच्या बाजूला दोन असे दातांचे संच असतात. म्हणून खालच्या जबड्यातील १६ व वरच्या जबड्यातील १६ असे एकूण ३२ दात मानवी जबड्यात दिसून येतात. दुधाच्या दातांच्या बाबतीत दंत्यसूत्र २-१-०-२ म्हणजेच पटाशीचे २, सुळा १ व दाढा २ असे दिसून येते. यात २ दाढा असतात, तर उपदाढा नसतात.

दातांची मोजमापे करण्यासाठी शक्यतो विद्युत व्यासमापकाचा (इलेक्ट्रॉनिक कॅलिपर) वापर करतात. मेसिओडिस्टल म्हणजे मध्याक्षापासून डाव्या अथवा उजव्या बाजूपर्यंतच्या दाताची लांबी मोजणे, तर बकोलिंग्यूअल म्हणजे दातांची जाडी मोजणे होय. या दोन मुख्य मापांवरून क्राऊन एरिया, क्राऊन इंडेक्स, क्राऊन मोड्युल ही दातांच्या आकारमानाशी संबंधित परिणामे तसेच इतर गुणोत्तरेही तयार करण्यात येतात.

जबड्यांतील दातांच्या एकावर एक अशा स्थितीला संशोशष (Occlusion) किंवा चर्वणाची बाजू असे म्हणतात. यामध्ये जबड्यांतील दातांची रचना तीन प्रकारची पाहायला मिळते. एक, वरच्या जबड्यातील दात खालच्या जबड्यातील दातांवर आले असल्याचे (वरचे दात किंचित पुढे); दोन, खालच्या जबड्यातील दात वरच्या दातांवर (खालचे दात पुढे) आणि तीन, दोनही जबड्यातील दात एकमेकांवर व्यवस्थित रित्या बसणारे. यांशिवाय दातांच्या रचनेचा अभ्यास करताना दातांची गर्दी (डेंटल क्राऊडिंग) हा प्रकार पाहावयास मिळतो. पहिले आलेल्या दातांमुळे नवीन येणाऱ्या दातांस जागा न मिळाल्याने त्याचा कोन बदलून ते दोनही दात एकमेकांवर आलेले दिसतात. यात जबड्याचा लहान आकार दातांना सामावून घेण्यास अपुरा पडतो व पर्यायाने दातांची गर्दी दिसते. पुरातत्त्वीय अवशेषांमध्ये अशा प्रकारचे पुरावे सहसा सापडत नाहीत. त्यामुळे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जबड्याच्या आकारमानात घट झाली असल्याचे अनुमान करता येते.

प्रत्यक्ष दातांच्या रचनेत वरच्या जबड्यातील पटाशीच्या दातात जिभेच्या बाजूने थोडीशी खोली आढळते. दाताच्या डाव्या अथवा उजव्या बाजू जाड होऊन दाताच्या मागच्या बाजूला आतून फावड्यासारखा (Shovel Shape) आकार तयार झालेला दिसतो. असेच स्वरूप काही प्रमाणात सुळे व खालच्या पटाशीच्या दातांमध्येही पाहायला मिळते. मंगोलॉईड किंवा एस्किमो लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. काही व्यक्तींमध्ये वरच्या जबड्यातील सुळ्यांना जिभेच्या बाजूने हिरडीजवळ एक अगदी छोटासा उंचवटा आढळून येतो. दाढांचा अभ्यास करताना त्यांच्यावरील उंचवटे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या खोबणी तपासल्या जातात. वरच्या जबड्यातील दाढांवरील जिभेच्या बाजुकडून दाढेच्या पुढच्या बाजूला निर्माण होणाऱ्या उंचवट्याला ‘काराब्रेली कस्प’ (Carabelli Cusp) म्हणतात. वरच्या जबड्यातील दाढांच्या चर्वण करण्याच्या भागांवरील खोबणींसह असलेल्या उंचवट्यास ‘हायपो कोन’ असे म्हणतात. या दाढांवर एकूण चार उंचवटे असतात; परंतु उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पहिल्या दाढेवर चार उंचवटे व त्यामुळे होणारे चार भाग, तर दुसऱ्या दाढेवर तीन पूर्ण उंचवटे व तिसरा अर्धवट अवस्थेतील उंचवटा अशी रचना दिसते. तिसऱ्या दाढेवर अनेकदा चौथा हायपो कोन हा उंचवटा अदृष्य आढळतो किंवा अगदी छोट्या प्रमाणात आढळतो.

खालच्या जबड्यातील दाढांवर बहुधा चार किंवा पाच उंचवटे दिसून येतात. या उंचवट्यांमुळे दाढांच्या चर्वण करण्याच्या भागावर इंग्रजी मुळाक्षरांतील ‘Y’, ‘T’, किंवा ‘+’, ‘×’ असे आकार तयार होतात. यांतील ‘Y’ आकाराच्या पाच उंचवट्यांनी झालेल्या रचनेस त्याठिकाणी ड्रायोपिथिकस जीवाश्मांमधील सापडलेल्या साधर्म्यामुळे ‘ड्रायोपिथिकस पॅटर्न’ असेही म्हणतात. पहिल्या दाढेवर याचे प्रमाण जास्त पाहावयास मिळते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दाढेमध्ये ते इतर प्रकारात पहावयास मिळते.

दंत्य विकृतीविज्ञान (Dental Pathology) या शाखेत उपलब्ध पुराव्यावरून व्यक्तीच्या उपजीविकेची साधने, सांस्कृतिक निकष, मौखिक आरोग्य, ताण, आहार, खाण्या-पिण्याच्या सवयी, दाताचे आरोग्य इत्यादींबाबत अंदाज बांधता येतो. चर्वण प्रक्रियेतून होणारी दाताची झीज हीसुद्धा मानवी सवयींवर प्रकाश टाकते. ओबडधोबड वाटलेल्या अन्नामुळे दातांवर ताण येऊन त्यांची झीज अधिक प्रमाणात होते, तर प्रक्रियायुक्त अन्न अर्थात फास्टफूड खाल्ल्याने दातांवर ताण कमी येऊन त्यांची झीज मर्यादित प्रमाणात होते. व्यक्तीचे वय, लिंग, सांस्कृतिक घटक, भौगोलिक क्षेत्र यांचाही दाताची झीज होण्यामागे अप्रत्यक्ष सहभाग असतो. दातावर जमा होणारे किटण हिरडीजवळ किंवा खालच्या जबड्यातील पटाशीच्या दातांच्या आतून किंवा वरच्या जबड्यातील दाढांजवळ गालाच्या बाजूने जमा झालेले दिसते. अशा प्रकारच्या दोषात दात मुळासकट हिरडीपासून अलग झालेले दिसून येतात. दातावरील आवरण किंवा वल्क यामुळे आजारपण येऊ शकतो. कुपोषणामुळे दातावर रेषा, खड्डे, व्रण आढळून येतात. पूर्वीचे लोक आपल्या पटाशीच्या दातांनी बांबू किंवा वाक वर्षानुवर्षे सोलून काढण्याचे काम केल्याच्या खुणा पुरातत्त्व कालखंडातील उत्खननात सापडलेल्या पटाशीच्या दातांवरून त्यांच्या आतील बाजूस झीजेच्या स्वरूपात दिसून आल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत.

संदर्भ :

  • कुलकर्णी, शौनक, आदिम, पुणे, २००२.
  • Das, B. M., Outlines of Physical Anthropology, Allahabad, 1998,
  • Jurmain & Nelson, Introduction of Physical Anthropology, New York, 1994.
  • Walimbe, S. R.; Kulkarni, S. S., Biological Adaptions in Human Dentition, Pune, 1993.

 

समीक्षक : शौनक कुलकर्णी