नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (एन.पी. एल.) या संस्थेची  स्थापना ही  विज्ञान आणि उद्योगधंद्याशी निगडित असलेल्या कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या परिषदेद्वारा ४ जानेवारी, १९४७ रोजी केली गेली.

उद्दिष्ट : भौतिक विज्ञानात संशोधन आणि विकास करून देशाच्या एकूण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीला हातभार लावणे, हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मूळ हेतू होता.

कार्यक्षेत्र : ब्युरो ऑफ इंडियन स्टँडडर्स (B.I.S.) ही संस्था आपल्या देशातील उद्योगधंद्यात तयार होणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध मानके पुरवीत असते. पदार्थाच्या गुणवत्तेची छाननी करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या प्रयोगशाळेत घ्याव्या लागतात. ह्या प्रायोगिक कसोट्यांसाठी आवश्यक पध्दती आणि त्यासाठी लागणारी उपकरणे व साधने ही ठराविक मोजमापाची असावी लागतात. तरकाटा (Hydrometer), तापमापक (Thermometer), श्यानतामापक (Viscometer) तसेच प्रयोगशाळांतील अन्य उपकरणांच्या मानकांचे महत्त्वाचे काम एन.पी.एल. करत असते.

शासकीय, सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांतील तसेच लष्कर, हवाई दल व नाविक दलाच्या प्रयोगशाळांतील संशोधन आणि विकासासाठी एन.पी.एल.द्वारे मानकीकरण केलेली संदर्भ साधने व उपकरणे वापरली जातात. त्यामुळे संपूर्ण देशातील संशोधनात एकसमानता येऊ शकते. या हेतूस्तव भारत सरकारने नॅशनल कोऑर्डिनेशन ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन या नावाची योजना जाहीर केली. त्यातूनच नॅशनल ॲक्रिडेटेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज (N.A.B.L.) या राष्ट्रीय पातळीवरील कार्यरत असलेल्या स्वायत्त बोर्डाची स्थापना झाली. या संस्थेद्वारा होणाऱ्या दर्जा-परीक्षणात मनुष्यबळाच्या सक्षमतेसोबतच उपकरणाची अचूकता तपासली जाते. या साधना-उपकरणांना एन.पी.एल. प्रमाणित करत असते.

विविध उपकरणे : एन.पी.एल.ची साधने-उपकरणे तसेच विविध स्थितीतील पदार्थांचे मोजमाप करण्यासाठी वापरली जाणारी मानके ही आंतरराष्ट्रीय मानकांशी संलग्न असतात.

सिझियम आणवीय घड्याळ

सिझियम आणवीय घड्याळ (Cesium atomic clock) : याचा वापर करून ‘सेकंद’ तर क्रिप्टॉन-८६ मूलद्रव्याच्या प्रारणलहरीच्या लांबीवरून ‘मीटर’ या मापाची अचूकता ठरवली जाते. अशाप्रकारे लांबी, वेळ, वस्तुमान, वीजप्रवाह, प्रकाशाची तीव्रता, तापमान, बल, कोन, पोकळी, शक्ती, सूक्ष्मलहरी इ.ची मोजमापे प्रमाणित करून त्यांची अचूकता राखण्याचे काम एन.पी.एल.च्या विविध विभागीय प्रयोगशाळांतून चालू असते.

इलेक्ट्रॉनिकी व वैद्यकीय उपकरणे : पदार्थाची शुध्दता, त्याची अंतर्गत रचना, त्यातील विविध घटक, त्याचा पृष्ठभाग इ.ची तपासणी करण्यासाठी एन.पी.एल.मध्ये इलेक्ट्रॉन क्रमवीक्षित सूक्ष्मदर्शक (Scanning electron microscope), इलेक्ट्रॉन प्रेषित सूक्ष्मदर्शक (Transmission electron microscope), त्रिमितीय स्फटिकी क्ष-किरण प्रणमनमापक (Triple crystal X-ray refractor) यांसारखी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. संपर्कसाधने, अंतराळसंशोधन, पर्यावरण या महत्त्वाच्या क्षेत्रांत उपयोगी पडणाऱ्या रेडिओ विज्ञानातदेखील ही संस्था आपल्या संशोधनाद्वारे मोलाचा हातभार लावीत आहे.

इलेक्ट्रॉनिकी क्षेत्रात आवश्यक असलेले वाळूचे (सिलिकॉन) स्फटिक, सौरऊर्जेवर चालणारी बॅटरी, जलजीवांचा अभ्यास करण्यासाठी तसेच जीवरसायन व वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारी श्राव्यातीत (ultrasonic) उपकरणे, चुंबकीय क्षेत्रामध्ये उपयोगी पडणारी साधने यांच्या निर्मितीमध्ये एन.पी.एल.चा पुढाकार असतो. औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात नियमित तपासणीसाठी लागणारे शून्य क्ष-किरण लेखक (Zero radiograph) हे उपकरण या संस्थेने निर्माण केले आहे.

सध्याच्या प्रदूषणाच्या काळात बहुपयोगी ठरणारे स्थितिक विद्युत धूलिकण संकलक (Electrostatic dust collector) हे एन.पी.एल.चे उपकरणदेखील नावीन्यपूर्ण आहे.

अवकाश संशोधन : एन.पी.एल. या संस्थेने क्षेपणास्त्राच्या तोंडाशी लागणारा व उच्चतापसह त्रिमितीय कार्बन-कार्बन संमिश्र (Three dimensional Carbon-Carbon composite) हा अपूर्व पदार्थ तयार केला. हा पदार्थ रॉकेट तथा उपग्रहाच्या बांधणीत उपयोगी ठरत आहे. अवकाश संशोधनामध्ये या त्रिमितीय पदार्थाची निर्मिती महत्त्वाचा टप्पा आहे.

कालकूपी

कालकूपी : महत्त्वपूर्ण कागदपत्रांची प्रदीर्घ काळ जपणूक व्हावी म्हणून एन.पी.एल.ने कालकूपी (Time capsule) तयार केली आहे. या कालकूपीमध्ये एखादा दस्तऐवज सु. १०० वर्षे व्यवस्थित टिकून राहू शकतो. स्टेनलेस स्टील आणि उच्च दर्जाच्या काचेने वेष्टित अशा या कूपीत बसविलेले इलेक्ट्रॉनिक हीलियम फलक (Electronic helium monitor) हे जोडयंत्र त्या कूपीतील वातावरण सतत निष्क्रिय राहील याची काळजी घेत असते. काचेमुळे कूपीतल्या कागदपत्रांचे सहज निरीक्षण करता येते. भारतीय घटनांसंबंधीची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी संसदेच्या विनंतीवरून या संस्थेतील संशोधकांनी हा प्रकल्प राबवला होता. आपल्या देशाने आतापर्यंत आखलेल्या सातही अंटार्क्टिका मोहिमांत एन.पी.एल.च्या संशोधकांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला आहे.

शैक्षणिक भूमिका : मोजमापांची विविध मानके आणि त्यांच्या अचूकतेसाठी वापरल्या जाणाऱ्या पध्दतींची देशातील औद्योगिक आणि प्रयोगशालेय अधिकाऱ्यांना माहिती व्हावी म्हणून प्रशिक्षण देण्याचे कामही एन.पी.एल.द्वारे केले जाते. शिवाय, या संस्थेत अधूनमधून देशविदेशातील विद्वान शास्त्रज्ञांना  आमंत्रित करून भौतिकी विज्ञानातील विविध विषय आणि तत्सबंधित लेखन यासंदर्भात चर्चा होते.

संदर्भ : तुस्कानो, जोसेफ विज्ञानवेध  पार्टनर पब्लिकेशन, विरार, २०१०.

समीक्षक : हेमचंद्र प्रधान