डी. आय. एन. ही संज्ञा Deutsches  Institut  für Normung  या जर्मन प्रमाणसंस्थेचे संक्षिप्त रूप आहे. डीआयएन ही जर्मन देशाची राष्ट्रीय पातळीवरची जीवनावश्यक वस्तूंची प्रमाणे तयार करणारी संस्था आहे व ती आय. एस. ओ. (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) या आंतरराष्ट्रीय प्रमाणसंस्थेत जर्मन देशाचे प्रतिनिधित्व करते.

डीआयएन या संस्थेची स्थापना १९१७ मध्ये केली गेली. या संस्थेचे मुख्यालय बर्लिनला असून, तिच्या खाती ३०,००० विविध मानके जमा आहेत आणि त्यात तंत्रज्ञानातील सर्व क्षेत्रे समाविष्ट आहेत. या संस्थेची स्थापना १९१७ मध्ये झाली परंतु १९७५ पासून तिला डीआयएन या नावाने ओळख  मिळाली.

प्रमाणीकरण पद्धती : या संस्थेतर्फे निर्माण होणाऱ्‍या प्रमाणांना डीन (DIN) म्हणून संबोधिले जाते. उदा., DIN 476 हे कागदांच्या आकारासंबधी असलेले प्रमाण होय. अशा प्रकारच्या या जर्मन संस्थेच्या प्रमाणांचा प्रारंभीचा मसुदा E DIN # असा अधोरेखित केलेला असतो, तर प्राथमिक प्रमाण DIN V # (Vornorm म्हणजे प्रसिध्दीपूर्व) असे निर्देशित करतात. जर एखादे प्रमाण युरोपियन प्रमाणाची (EN) आवृत्ती असेल तर ते DIN EN # असे ओळखले जाते आणि ते एखाद्या आय. एस. ओ. प्रमाणाची आवृत्ती असेल तर DIN ISO # अशा क्रमांकाने नोंदले जाते. जर एखादे प्रमाण युरोपियन EN आणि आंतरराष्ट्रीय ISO प्रमाणाशी सुसंगत असेल तर त्याचा उल्लेख DIN EN ISO # असा केला जातो.

प्रमाणे तयार करण्याची ठराविक प्रक्रिया असते आणि त्यात कुणालाही भाग घेता येतो. मात्र ही प्रमाणे निर्माण करताना सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, ग्राहकांचे हित या बाबी कटाक्षाने विचारात घेतल्या जातात. एखाद्या उत्पादक कंपनीने या प्रमाणनिर्मिती प्रक्रियेत भाग घेतला तर त्या कंपनीला अन्य क्षेत्रातील तज्ञ व त्याच क्षेत्रातील स्पर्धक यांच्याशी संपर्क साधता येतो आणि आपला वरचढपणा सिध्द करता येतो.

संदर्भ :

• http://int.search.myway.com/search/GGmain.jhtml?p2=%5ECRB%5Exdm165%5ETTAB02%5Ein&ptb=F9A1ED05-587F-4C2B-A577

• https://www.iso.org/home.html

समीक्षक : प्रधान, हेमचंद्र