शार्प, फिलिप ॲलेन : (६ जून, १९४४).
अमेरिकन आनुवंशिकीतज्ञ आणि रेणवीय जीववैज्ञानिक. विभाजित जनुके (Split Genes) या शोधाबद्दल १९९३ मध्ये फिलिप शार्प यांना रिचर्ड जे. रॉबर्ट्स यांच्याबरोबर शरीरविज्ञान व वैद्यकशास्त्र या विषयातील नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.
फिलिप ॲलेन शार्प यांचा जन्म फॉलमाउथ, केंटकी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बटलर शाळेत आणि माध्यमिक शिक्षण पेंडलटन काउंटी हायस्कूल येथे पूर्ण झाले. केंटकी येथील युनियन कॉलेजमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी इलिनॉय विद्यापीठात प्रवेश घेतला आणि रसायनशास्त्रात पीएच. डी. मिळवली. सांख्यिकी आणि भौतिकी सिद्धांतांच्या आधारे डीएनएचे बहुवारिक (polymer) म्हणून केलेले वर्णन हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता.
पीएच.डी.चा अभ्यास करत असताना जनुकीय संकेत (genetic code) याबाबतची माहिती फिलिप शार्प यांच्या वाचनात आली. यामुळे रेणवीय जीवशास्त्र (molecular biology) व आनुवंशिकता (genetics) यांमध्ये त्यांना आवड निर्माण झाली. परिणामत: रेणवीय जीवशास्त्रातील एका संशोधन कार्यक्रमात कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी येथे त्यांनी पोस्टडॉक्टरेट शिक्षण पूर्ण केले. जीवाणूतील गुणसूत्रापासून प्लाझ्मिड (plasmid) कशा पध्दतीने आनुवंशिक क्रम (genomic sequence) मिळवतात याचा त्यांनी अभ्यास केला. तसेच मानवी पेशींमधील जनुकांच्या अभिव्यक्तीच्या रचनेचा (structure of genetic expression) व मार्गाचा देखील (pathway) त्यांनी अभ्यास केला. कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीमध्ये त्यांची वुल्फ पीटरसन यांच्याशी मैत्री झाली. वुल्फ पीटरसन हे मानवी ॲडिनो विषाणूच्या (Adenovirus) वाढीमध्ये निष्णात होते. दोघांनी मिळून ॲडिनो विषाणूसंबंधी अनेक गोष्टींवर संशोधन केले. त्यांपैकी एक म्हणजे — जिनोमचा केवळ एकच विशिष्ट भाग E1 क्षेत्र हे कर्करोगाचे जनुक (Oncogene) पेशी परिवर्तनाला जबाबदार असते, हे सिद्ध केले.
१९७४ मध्ये मॅसेचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कर्करोग संशोधन केंद्रात ते सामील झाले. काही कालावधीनंतर जीन फ्लिंट यादेखील शार्प यांच्यासह पेशीच्या वेगवेगळ्या भागात आढळणाऱ्या आरएनएच्या पातळीवर काम करू लागल्या. शार्प आणि फ्लिंट अशा निष्कर्षाप्रत आले की, ॲडिनो विषाणूने संक्रमित झालेल्या पेशीकेंद्रकात विषाणूजन्य रिबोन्यूक्लिइक अम्लाचे (RNA) अनेक संच असतात, ज्याचे पेशीद्रव्यात परिवहन होत नाही. केंद्रकीय आरएनएवर प्रक्रिया होऊन पेशीद्रव्यातील संदेशवाही आरएनए (Messenger RNA) तयार होतात यावर त्यांचा विश्वास होता.
१९७७ मध्ये शार्प आणि त्यांच्या गटाने असा शोध लावला की, ॲडिनो विषाणूचे संदेशवाही आरएनए हे डीएनएच्या चार स्वतंत्र खंडित विभागांशी मिळतेजुळते असतात. रिचर्ड जे. रॉबर्ट्स यांनी स्वतंत्रपणे केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष देखील असाच होता. पुढे शार्प यांची एमआयटीच्या कर्करोग संशोधन केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर ते जीवशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. १९९९ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहिले.
एमआयटीतील आपले कार्य चालू असताना त्यांनी मॅकगव्हर्न इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्च येथे संचालक म्हणून काम केले (२०००-२००४). सध्या ते जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात आणि कोच इन्स्टिट्यूट या संस्थेचे सभासद आहेत.
संदर्भ : https://www.thefamouspeople.com/scientists.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा