जीवशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचा समन्वय असलेली अर्थशास्त्राची एक शाखा. ही शाखा मुख्यतः एकविसाव्या शतकात वेगाने विस्तारत गेलेली आढळते. अर्थशास्त्रात हाताशी असणाऱ्या साधनसामग्रीचा मानवाकडून कसा वापर व्हावा, याचा विचार केला जातो; तर जीवशास्त्रात सर्व सजीवांचा विचार केला जातो. उदा., प्राणी, पक्षी, मासे, झाडे, झुडपे, कीटक इत्यादी. या सजीवांचा मानवी आयुष्याशी काय संबंध आहे व ऐहिक विकास आणि कल्याण साधताना त्या प्रयत्नांचा मानवेतर सजीवांवर काय परिणाम होतो, याचा विचार या शाखेत होतो.

विकास साधत असताना मानवेतर सजीवांचा प्रतक्ष व अप्रत्यक्ष सहभाग त्या प्रक्रियेत असतो. त्याचा व्यापक व परिपूर्ण अभ्यास होणे आता या विद्याशाखेत अभिप्रेत आहे. जसे, टेबल, खुर्ची किंवा फर्निचर बनविण्यासाठी लाकडाचा उपयोग होता. येथे लाकूड हे फर्निचरसाठी कच्चा माल किंवा आदान आहे. वजनानुसार त्याची किंमत हिशेबात धरणे, हे खर्च मोजणीच्या वाणिज्य पद्धतीनुसार बरोबर असले, तरी तो विचार अपुरा व एकांगी ठरतो. ज्या झाडांची लाकडे तोडून किंवा झाडे तोडून फर्निचर किंवा रस्ते किंवा विमानतळ बनविली जातात, त्या झाडांच्या योगदानाचा पुरेपूर व सर्वांगीण विचार होणे अतिशय महत्त्वाचे आहे. झाडांपासून मिळणारी फळे, फुले, पाने; झाडांच्या पानांपासून रोज मिळणारा प्राणवायू, तसेच खत; झाडांच्या अस्तित्वामुळे टिकून राहणारे पर्जन्यमान; झाडांमुळे निर्माण होणारे आर्द्रता आणि वाष्प यांचा निसर्गचक्रातील सहभाग; वातावरणाच्या शुद्धीकरणामध्ये झाडांचा सहभाग; एका झाडापासून पुढे कितीतरी नव्या झाडांची होणारी निर्मिती; झाडांच्या सावलीमुळे मिळणारे सुख-समाधान-आनंद; झाडांमुळे होणारे मृदुसंधारण, तसेच जमिनीच्या धुपीपासून होणारे रक्षण; शेवटी झाडाचे सरपण म्हणून होणारा वापर असा व्यापक आणि समन्वित विचार या विद्याशाखेत होतो.

एखाद्या वृक्षाचे आयुष्य ५० वर्षे असेल, तर हे सर्व लाभ त्या कालखंडावर मोजले जाणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे, तर अशा झाडांवर होणारी पक्ष्यांची घरटी, त्या पक्ष्यांकडून किडे खाण्यामुळे होणारे रोगराईचे निर्मूलन, पक्ष्यांच्या विष्ठेतून मिळणारे खत, पक्षी-कीटकांकडून होणारे परागीभवन इत्यादी लक्षात घेतले, तर निसर्गाच्या साखळीचा आणि परस्परावर अवलंबून असण्याचा कसा साकलिक विचार आवश्यक आहे, हे समजते. मानव, निसर्ग, सर्व सजीव हे परस्पर पूरक व परस्परावलंबी असून त्यांचा आंतरविद्याशाखीय विचार होणे गरजेचा आहे, असे या अभ्यासामध्ये समजून येते. मानवांसह सर्व सजीवांच्या विकासाच्या प्रकल्पांमध्ये असा विचार आता अटळ झाला आहे. मग तो एखादा कागद कारखाना असो किंवा मोठी धरण योजना असो.

जैव अर्थशास्त्र ही विद्याशाखा परिस्थिती विज्ञान, पर्यावरणशास्त्र, शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र, विकासाचे समाजशास्त्र अशा अनेक विषयांना स्पर्श करते. जैव अर्थशास्त्राच्या दृष्टिकोणातून अभ्यास केल्यावर वास्तव खर्चलाभ गुणोत्तर मांडता येते. त्यानुसार आर्थिक धोरण कसे असावे, याची दिशा स्पष्ट होते. जर आर्थिक विकास फक्त मानवकेंद्रित मानला, तर नफेखोरी, सुखवाद, चंगळवाद यांनाच प्राधान्य मिळते. त्याऐवजी विकास हा सजीवकेंद्रित मानावा, असे जैव अर्थशास्त्र मानते. प्राणी, वनस्पती व मानव यांचे सहअस्तित्व लक्षात घेऊन विकासाच्या प्रतिमानांची मांडणी करावी, या भूमिकेस ही विद्याशाखा चालना देते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने विचार करून जे विकास प्रकल्प स्वीकारार्ह वाटतात, ते जैव अर्थशास्त्राच्या सर्वस्पर्शी भूमिकेतून कदाचित रद्द ठरतात. शाश्वत व समतोल विकासाच्या दृष्टीने ही नवी विचारधारा शास्त्रशुद्ध मानली जाते. विकास व जैव सृष्टीतील बदल यांमुळे अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होऊ शकतात, असे मानण्यास जागा आहे. उदा., स्वयंपाकासाठी जर कुकिंग गॅसचा किंवा गोबर गॅसचा वापर वाढला, तर सरपणासाठी होणारी वृक्षतोड कमी होईल किंवा नाहिशी होईल. त्यामुळे पर्यावरणातील भूआच्छादन वाढेल व जमिनीची सुपीकताही सुधारेल. मानवी हस्तक्षेपाचे जैवसृष्टीवर जे अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होतात, त्यांची बेरीज व वजाबाकी करून परिणाम मोजला जातो. हा नक्त परिणाम विकासाची धोरणे ठरविताना मार्गदर्शक ठरतो.

समीक्षक ꞉ विजय परांजपे