अध्यापनातील गुंतागुंत कमी करण्याकरिता नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय. या संकल्पनेत अध्यापनाचे सूक्ष्मीकरण अभिप्रेत असते. शिक्षणतज्ज्ञ टर्नी यांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार यात अध्यापन आाशय, वेळ आणि विद्यार्थीसंख्या या सर्वांचेच सूक्ष्मीकरण करून एका वेळी एकाच अध्यापन कौशल्यावर केंद्रीकरण केले जाते.
अध्यापनकौशल्ये या संकल्पनेवर अनेक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांनी व्याख्या केल्या आहेत :
- ब्राऊन, जी. ए. : ‘विद्यार्थ्यांच्या अध्ययनास चालना देण्याच्या हेतूने केलेल्या परस्परसंबंधी अध्यापन कृतींचा संच म्हणजे, अध्यापनकौशल्येʼ.
- गेज, एन. एल. : ‘अध्यापक वर्गात वापरू शकतील अशा विशिष्ट कार्यपद्धती तंत्रे म्हणजे, अध्यापनाची तांत्रिककौशल्येʼ.
- सिंह, एल. सी.; जोशी, ए. एन. : ‘कार्यगट साध्य करणारा व विद्यार्थ्यांबरोबरच्या आंतरक्रियात्मक परिस्थितीमध्ये अवबोधात्मक व बोधात्मक क्रियांचा परिपाक म्हणून अध्यापकाने प्रदर्शित केलेला शाब्दिक व अशाब्दिक कृतींचा संयुक्त संच म्हणजे, अध्यापनकौशल्येʼ.
- पासी, बी. के. : ‘प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या अध्यापनास चालना देण्यास उपयुक्त ठरणारा अध्यापन वर्तनांचा संच म्हणजे, अध्यापनकौशल्येʼ.
शिक्षणतज्ज्ञ ॲलन ड्वाईट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६० मध्ये अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात सूक्ष्म अध्यापन या तंत्राचा उदय व विकास केला. त्यानंतर भारतात आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यापीठे बी. एड.च्या व डी. एड.च्या अभ्यासक्रमात या तंत्राचा वापर करीत आहेत. सूक्ष्म अध्यापन हे शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे एक महत्त्वपूर्ण तंत्र आहे. त्यामुळे सूक्ष्म अध्यापन या तंत्राबरोबरच अध्यापनकौशल्ये ही नवी संकल्पना शिक्षक प्रशिक्षणात आली. अध्यापन अधिक विकसित, प्रगत व परिणामकारक होण्यासाठी सूक्ष्म अध्यापन प्रक्रिया उपयुक्त ठरते.
वर्ग अध्यापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्या गुंतागुंतीचे दडपण शिक्षकांवर येऊ शकते; मात्र अध्यापनाचे सूक्ष्मीकरण केल्यामुळे ही गुंतागुंत कमी होते. त्यामध्ये सोपेपणा येऊन वर्गातील/शाळेतील शैक्षणिक परिस्थितींवर शिक्षकांचे नियंत्रण वाढते. नियंत्रित परिस्थितीत शिक्षक एखाद्या कृतीचा किंवा कृतीसंचाचा अधिक सहजगत्या सराव करू शकतो. त्याचबरोबर स्वत: सर्व कृती कशा कराव्यात, हे आत्मसात करू शकतो. या कृती किंवा कृतीसंचांनाच ‘अध्यापनकौशल्येʼ असे म्हणतात. सूक्ष्म अध्यापनाची परिस्थिती शिक्षकांना नवनवीन अध्यापनकौशल्ये साध्य करण्यासाठी किंवा जुनी कौशल्ये सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
वैशिष्टे : सूक्ष्म अध्यापनकौशल्य हे उत्तम अध्यापक तयार करण्याचे शास्त्रशुद्ध, सरस आणि उपयुक्त असे आधुनिक तंत्र असून त्याची वैशिष्टे पुढीलप्रमाणे :
- अध्यापनकौशल्ये हे वर्तनाचा एक संच असतो.
- सूक्ष्म अध्यापनकौशल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या चालना मिळवून देण्यास अध्यापकाला साह्य होते.
- सूक्ष्म अध्यापनकौशल्ये इतर वर्तनसंचाच्या समवेत अध्यापनात सहजगत्या वापरता येते.
- प्रत्येक कौशल्याचे प्रशिक्षण विशिष्ट हेतू डोळ्यांसमोर ठेवून दिले जाते.
- संकीर्णतेकडून सुलभतेकडे नेणारे हे तंत्र आहे.
- यामध्ये अध्यापनाच्या सर्व कौशल्यांची माहिती होते.
- एका वेळी एकाच अध्यापन कौशल्याचा सराव केला जातो.
- अध्यापन परिणामकारक होऊन शिक्षक व विद्यार्थांत चिकित्सक दृष्टीकोन विकसित होतो.
- या तंत्रात विद्यार्थिसंख्या मर्यादित असून पाठाचा कालावधी अल्प असतो . शिवाय अध्यापनकौशल्ये साधे असते.
- या अध्यापनात प्रत्याभरणपद्धती असल्यामुळे त्यात स्वयं मूल्यमापन करता येते.
- अध्यापनात गुंतागुंत कमी होऊन योग्य रितीने सराव होतो.
सूक्ष्म अध्यापनकौशल्यात सेवापूर्व प्रशिक्षण आणि सेवांतर्गत प्रशिक्षण असे दोन दृष्टिकोन आहेत. सेवापूर्व प्रशिक्षण : सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष सेवेला सुरुवात करण्यापूर्वी देण्यात येणारे प्रशिक्षण होय. सेवापूर्व प्रशिक्षणात अध्यापनास उपयुक्त सर्वसामान्य अशा सर्वच अध्यापन कौशल्यांचा विचार होतो.
सेवांतर्गत प्रशिक्षण : सेवांतर्गत प्रशिक्षण म्हणजे सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी दिले जाणारे प्रशिक्षण. सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी सूक्ष्म अध्यापनकौशल्यांचा नैदानिक दृष्टिकोन विचारात घेण्यात येतो. म्हणजेच शिक्षकाचे कोणत्या अध्यापनकौशल्यांवर प्रभुत्व आहे, ते पाहून उर्वरित कौशल्यांच्या प्रशिक्षणाचा यात विचार होतो.
सूक्ष्म अध्यापन पाठ : सूक्ष्म अध्यापन पाठ पुढील मुद्द्यांनुसार प्रभावी करावा :
- सज्जता प्रवर्तन : पाठाची परिणामकारक सुरुवात करणे.
- स्पष्टीकरण : विद्यार्थ्यांपर्यंत ठळक आवाजात व सुस्पष्टपणे माहिती पोहोचविणे.
- मुक्त प्रश्न : विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणे.
- प्रबलन : विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन अध्ययनास चालना देणे.
- उदाहरणांचा वापर : उदाहरणे व दाखले देऊन मुद्दा स्पष्ट करणे.
- चेतक बदल : विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करून घेणे.
- फलकाचा अध्यापनातील उपयोग : फळ्याचा योग्य व परिणामकारक वापर करणे.
- शैक्षणिक साधनांचा उपयोग : जास्तीत जास्त शैक्षणिक साधनांचा योग्य व परिणामकारक उपयोग करणे.
- समारोप : पाठाचा परिणामकारक शेवट करणे.
- वर्ग व्यवस्थापन : वर्गावर नियंत्रण ठेवणे.
पायऱ्या : सूक्ष्म अध्यापन विकसित करताना पुढील पायऱ्या असतात :
- पाठ नियोजन : प्रशिक्षणार्थी आपल्या निरीक्षकाच्या साह्याने ५ ते ७ मिनिटांच्या पाठात असा आशय निवडावा की, ज्यामध्ये कौशल्यांचा जास्तीत जास्त सराव होईल.
- कौशल्य प्रशिक्षण : प्राध्यापक हे शिक्षक-प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण देत असताना. त्यामागील मानसशास्त्रीय बैठक, कौशल्याचे प्रयोजन इत्यादी समजून देऊन तसे प्रात्यक्षिकही करून दाखवावेत.
- पुन: अध्यापन सत्र : प्रशिक्षणार्थ्याने सुरुवातीच्या पाठात विविध साधनांचा वापर केला असला, तरी पाठ असमाधानकारक झाला असेल, तर त्याला पुन्हा त्याच पाठाचे अध्यापन करावे लागते. त्याचे निरीक्षक आणि विद्यार्थी दोघेही मूल्यमापन व चिकित्सा करतात. त्यानंतर परत त्याच पाठाचे अध्यापन दुसऱ्या विद्यार्थ्यांसमोर केले जाते; मात्र या वेळी वेळेचे बंधन नसते.
- प्रत्याभरण व चिकित्सा सत्र : प्रशिक्षणार्थ्याचा पाठ प्रभावी झाला नसल्यास त्याला त्याच्या अध्यापनातील दोष, मर्यादा, उणिवा दाखविल्या जातात. पाठात कोणत्या ठिकाणी सुधारणा करणे गरजेचे आहे, ते सांगून त्याला पुन्हा प्रत्याभरणाची संधी दिली जाते. आवश्यकतेनुसार आदर्श अध्यापन पाठाची चित्रफीत दाखविली जाते.
मार्गदर्शन तत्त्वे :
- तात्विक माहिती : यात विशिष्ट कौशल्याचे महत्त्व, वर्ग अध्यापनातील त्याचे नेमके स्थान, त्यात समाविष्ट असलेल्या योग्य अथवा अयोग्य घटकांचे स्पष्टीकरण व उदाहरणे यांची माहिती असते.
- नमुना सादरीकरण : तज्ज्ञ प्रशिक्षक ज्या वेळी प्रत्यक्ष एखाद्या कौशल्याचा पाठ सादर करतात, त्या वेळी संबंधित कौशल्यातील योग्य घटकांचा अधिकतम वापर व अयोग्य घटकांचा त्याग यांवर त्यांचा कटाक्ष असतो. कोणता घटक केंव्हा, कोठे व कसा आला, तसेच संपूर्ण पाठात तो घटक किती वेळा आला, या चर्चेसाठी निरीक्षण श्रेणीच्या आधारे निरीक्षण करण्यात येते.
- नियोजन : सूक्ष्मपाठ नियोजनात कौशल्याचा अधिकतम वापर या तत्त्वाला प्राधान्य असते. ५ ते ७ मिनिट कालावधीचा सदर पाठ असतो. आशयाला येथे गौण स्थान असते; मात्र सर्व योग्य घटक अधिकतम स्वरूपात पाठात येणे महत्त्वाचे असते. नियोजन करतांना शिक्षककृती, विद्यार्थीकृती आणि कौशल्यघटक या तीन स्तंभात त्याचे लेखन असते.
- अध्यापन : दहा शिक्षक-प्रशिक्षणार्थ्यांच्या गटात अभिरूप परिस्थितीत सूक्ष्म पाठाचे अध्यापन चालते. त्यात दोन शिक्षक-प्रशिक्षणार्थी, पाठ निरीक्षक, एक वेळ पाहणारा, एक पाठ घेणारा आणि उर्वरित शिक्षक-प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची भूमिका बजावतात.
- प्रत्याभरण : प्रत्येक पाठानंतर निरीक्षण श्रेणीतून प्राप्त माहितीनुसार प्रत्याभरण होत असते. त्यात प्रथम: सर्व निरीक्षणांची फळ्यावर नोंद; निरीक्षण भिन्नतेवर प्रथम चर्चा; अपेक्षित घटक त्याची वारंवारीता याकडे लक्ष वेधणे; कोणता घटक केंव्हा, कोठे, कसा आला याची चर्चा; न आलेल्या घटकांची पाठात येण्याच्या दृष्टिने चर्चा; त्यासाठी आवश्यक तेथे दिग्दर्शन, प्रत्याभरणानुसार पाठात दुरुस्ती इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात.
सूक्ष्म अध्यापनपद्धती ही अध्यापनकौशल्याचे प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणामागे विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि वर्गाला निदेशन करणे ही तत्त्वे गृहीत धरण्यात येतात. तसेत प्रत्याभासाला अथवा अभिरूपाला किती महत्त्व आहे, हे दिसून येते.
निरिक्षकाचे कार्य :
- सूक्ष्म अध्यापनात निरीक्षकाची भूमिका बारकाईने आणि वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून निरीक्षण करण्याची असते.
- प्रशिक्षणार्थ्यांने पाठ कसा घ्यावा, याचे तो मार्गदर्शन करतो आणि पाठ संपल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांने कसा पाठ घेतला ते सांगतो.
- पाठ यशस्वी करण्याकरिता निरीक्षकाने प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा, विचारविनिमय करावा.
- शाळेमध्ये जाऊन प्रशिक्षणार्थ्यांची भेट घेऊन सूक्ष्म अध्यापन पाठाचे नियोजन करण्यास, पाठाची अनुसूची करण्यास साह्य करावे.
- निरीक्षकाने पाठाचे मूल्यांकन करून प्रत्याभरण करावे.
- प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य संपादन क्षमता वाढविण्याचा निरीक्षकाने सदैव प्रयत्न करावा.
कार्यपद्धती : सूक्ष्म अध्यापनात प्रथमत: विशिष्ट कौशल्याची तात्विक माहिती स्पष्ट केली जाते. त्यानंतर तज्ज्ञांद्वारा संबंधित कौशल्याचे सादरीकरण व चर्चा केली जाते. पुढे विद्यार्थ्यांना एक सूक्ष्म पाठ टाचण काढून प्रत्यक्ष पाठाचे सादरीकरण करण्यास सांगण्यात येते. प्रत्येक पाठावर प्रत्याभरण देऊन पुन्हा पाठ नियोजन, पुन्हा अध्यापन व चर्चा अशा कृती केल्या जातात. त्याला सूक्ष्म अध्यापन चक्र असेही म्हणतात.
सूक्ष्म अध्यापनकौशल्ये निरीक्षण तक्त्यामध्ये प्रत्येक कौशल्याच्या चिकीत्सक मुद्द्यांचा विचार करून अपेक्षित व त्याज्य घटकांची यादी करण्यात येते. त्यापुढे १० ते १२ उभे स्तंभ आखून मूल्यमापन श्रेणी तयार केली जाते. पाच मिनिटांसाठी १० स्तंभ, सात मिनिटांसाठी १४ स्तंभ दिले जातात. अध्यापन व पुनरअध्यापनासाठी एकाच प्रकारची श्रेणी वापरली जाते. प्रत्येक स्तंभ वेळेचा निदेशक असतो. एक स्तंभ अर्ध सेकंद कालावधीसाठी असतो. शेवटी एकूण असा एक स्तंभ असतो, ज्यात ते विशिष्ट वर्तन त्या ५ ते ७ मिनिटांत किती वेळा घडले ते स्पष्ट करता येते. श्रेणीच्या शेवटी गुणात्मक शेरे देण्यासाठी ही जागा दिलेली असते.
मर्यादा : सूक्ष्म अध्यापनपद्धती ही अध्यापनकौशल्य आणि अध्यापन गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असून त्याच्या काही मर्यादा पुढीलप्रमाणे :
- सूक्ष्म पाठाचे टाचण काढताना मर्यादित विषय घटकावरच पाठ घ्यावा लागत असल्यामुळे इतर विषय घटकांचे आकलन होत नाही.
- सूक्ष्म अध्यापनपद्धती अतिशय यांत्रिक स्वरूपाची आहे.
- सूक्ष्म अध्यापन या पाठात मर्यादीत (५ ते ७) विद्यार्थी संख्या असल्यामुळे शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर वर्गात सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकविताना निर्माण होणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापन यांसंबंधी कल्पना येणार नाही.
- अध्यापन करणे ही सलग कृती असल्यामुळे त्यातील कौशल्ये अलग करून पाठ घेणे ही कृत्रिमता आहे.
- प्रत्येक कौशल्याचा वापर केव्हा व कोठे करायचा, याचे प्रमाणक ठरले नाहीत.
समीक्षक – संतोष गेडाम
खूपच छान माहिती आहे. यात सूक्ष पाठाचे विवेचन केलेले आहे. सदर विवेचन हे खूप मार्गदर्शक असून सूक्ष्म पाठाचे विविध प्रकार, पद्धती, घटक समजण्यास अतिशय सुंदर अशी मदत झाली. धन्यवाद!