विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. यामध्ये शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सतत केले जाते. आजच्या वैज्ञानिक युगाची प्रगती मापनावर आधारित आहे. मापनासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत रॉस म्हणतात की, ‘जर मापनाची सर्व तंत्र-साधने या जगातून नाहीशी झाली, तर या आधुनिक जगाची सर्व सभ्यता वाळूच्या भिंतीप्रमाणे ढासळून पडेल.ʼ

प्राथमिक शिक्षण हे पायाभूत शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक अशा स्तरांवरील क्षमता आणि कौशल्ये यांचा विकास होऊन एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अपेक्षित असतो. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली जातात. बोधात्मक उद्दिष्टे ठरविताना विषयांचा विचार केला जातो, तर भावात्मक उद्दिष्टे ठरविताना अभ्यासेतर कार्यक्रमांचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता व कौशल्ये निर्माण होण्यासाठी त्यांना वेगवगेळे अनुभव दिले जातात व अनेक अध्ययन-अध्यापनपद्धती वापरल्या जातात.

शिक्षणप्रक्रियेत सर्वांत महत्त्वपूर्ण परिवर्तन म्हणजे मूल्यमापनपद्धतीत झालेला बदल होय. विद्यार्थ्यांमध्ये क्रीयात्मक कौशल्ये विकसित होण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिकासारखी कार्ये दिली जातात. त्यांचा सर्वांगीण विकास होत असताना त्यांच्या अध्ययनातील त्रुटी, उणिवा या मूल्यमापनातून दूर व्हाव्यात व त्यांची अपेक्षित प्रगती व्हावी, अशी अपेक्षा असते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कोठारी आयोग (Kothari Commission), डॉ. आर. एच. दवे समिती अहवाल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Policy On Education), राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training : NCERT) या संस्थेचे निर्देश अशा विविध आयोगांच्या अहवालांमधून मार्गदर्शक तत्त्वे आणि नावीन्यपूर्ण मूल्यमापन साधन-तंत्रांची सूचना केली आहे. शैक्षणिक गुणवत्ताविकासाच्या दृष्टीने हा बदल आमूलाग्र आणि क्रांतिकारी आहे.

शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया ही अध्ययन-अध्यापन, शिक्षणप्रक्रियेचा दर्जा आणि परिणामी एकंदर शैक्षणिक व्यवस्था यांवर परिणाम करते. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक हे मूल्यमापनपद्धतीबाबत अत्यंत संवेदनशील असतात. शैक्षणिक मूल्यमापनपद्धती नजरेसमोर ठेवून सर्व शैक्षणिक प्रक्रियेचे नियोजन व कार्यवाही होते. शैक्षणिक मूल्यमापनप्रक्रियेत उणिवा, त्रुटी राहिल्यास शैक्षणिक गुणवत्ताविकासात अडथळे निर्माण होतात. मूल्यमापन हा अध्ययन-अध्यापनपद्धतीचा एक भाग असून अध्ययनाच्या विविध टप्प्यांवर मूल्यमापन व्हावे आणि अध्यापकांद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती पडताळावी. यात विद्यार्थी हा शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. हे लक्षात घेऊन अध्ययनात आढळलेल्या त्रुटींवर निदानात्मक उपाय करावेत. अभिरुची व कला यांचेही मूल्यमापन करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासाच्या सर्व पैलूंकडे विद्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययनप्रक्रियेकडे तसेच त्यांच्या वर्तनातील दृश्य बदलांकडे सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे साध्य होण्यासाठी विविध साधनतंत्रांच्या मदतीने अध्ययन-अध्यापन होणे गरजेचे आहे.

मूल्यमापनाची पद्धत : सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना मुख्यत: आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन या दोन पद्धतींनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले पाहिजे.

(१) आकारिक मूल्यमापन : विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होत असताना केले जाणारे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ या कायद्यान्वये विद्यार्थ्यांना आठवी इयत्तेपर्यंत नापास न करण्याचा शासनाचा आदेश असल्यामुळे आकारिक मूल्यमापनाचे काटेकोर उपयोजन करणे हे शिक्षण-शिक्षक यांना बंधनकारक आहे. अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते किंवा नाही, याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन, वर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. या मूल्यमापनप्रक्रियेसाठी दैनंदिन निरीक्षण, स्वाध्याय (कथा, निबंध, अहवाल, वर्ण, पत्र, संवाद, एखाद्या विषयाची माहिती इत्यादींचे लेखन करणे.), तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक कार्ये, कृतियुक्त कार्ये, प्रयोगात्मक कार्ये, प्रकल्प, प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, चाचणी (कोणत्याही वेळापत्रकाशिवाय आणि कोणतीही पूर्व कल्पना न देता अल्प कालावधीत घेण्यात येणारी अनौपचारिक स्वरूपाची लेखी चाचणी), स्वयं-अध्ययनाद्वारे वैयक्तिक व गटांत शैक्षणिक उपक्रम राबविणे इत्यादी साधन-तंत्रांचा वापर करावा लागतो. प्रत्येक मूल हे वेगवगेळ्या पद्धतीने शिकत असते. कोणाला कृतीद्वारे लवकर आकलन होते, तर कोणाला श्रवणाद्वारे; कोणाला आकृतीद्वारे आकलन होते, तर कोणाला शिक्षणाद्वारे कळते. म्हणजे मुलांचे अध्ययन सोपे व सुटसुटीत होण्यासाठी मुलांची विषयातील आवड आणि त्यांचे उद्दिष्टे यांप्रमाणे अध्यापनाच्या पद्धतीत तसेच साधन-तंत्रांच्या उपयोगाबाबत बदल करावा लागतो.

आकारिक मूल्यमापनातून संविधानातील मूल्ये, गाभाघटक व जीवनकौशल्ये यांचे मूल्यमापन केले जाते. आकारिक मूल्यमापनात अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन या प्रक्रिया एकाच वेळी चालतात. अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन यांतील परस्परसंबंध शोधून त्यांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांकडे वर्षभर लक्ष दिल्याने भविष्यात वाया जाणारा वेळ व श्रम वाचविता येतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. विद्यार्थ्यांना ताणरहित अध्ययन करता येते. आकारिक मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे संपूर्ण चित्र मिळते; परंतु नोंदी करतांना अडथळे, उणिवा, त्रुटींची नोंद इत्यादींमुळे विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनावर अनिष्ट परिणाम करणार नाहीत, तर उणिवा दूर करण्यास प्रोत्साहन मिळेल अशा कराव्यात. उणिवा दाखवितानाच्या सुधारणेसाठी उपाय सुचवावेत.

विद्यार्थी शिकत असताना त्यांचे मूल्यमापन होत असते. हे होत असतानाच अध्ययनातील उणिवा वेळच्या वेळी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून ‌दिल्यामुळे अध्यनातील त्रुटी-उणिवा दूर होतात व अध्ययन सहजपणे होते. शिकण्यासाठी नाट्यीकरण, गटचर्चा, गटकार्य, कृती, उपक्रम, प्रकल्प, प्रयोग उपलब्ध होतात. विद्यार्थी अध्ययनासाठी धडपडत असतो. त्यामुळे अध्ययन व मूल्यमापन आनंददायी होते. विद्यार्थ्यांकडे सातत्याने लक्ष दिल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांची बलस्थाने शोधून त्यात अधिक प्रगती करण्यासाठी त्यास मदत करण्याची दिशा ‌निश्चित करता येते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज भासत नाही.

(२) संकलित मूल्यमापन : आकारिक मूल्यमापनामध्ये दिसलेली प्रगती टिकून आहे की नाही, हे पडताळणारे मूल्यमापन म्हणजे संकलित मूल्यमापन होय. हे ठरावीक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपात करावयाचे मूल्यमापन आहे. संकलित मूल्यमापनात वर्षातून दोन वेळा प्रत्येक सत्राच्या अखेरीस मूल्यमापन केले जाते. यामध्ये दूरगामी उद्दिष्टांचा जास्त प्रमाणात विचार केला जातो. मूल्यमापनासाठी लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा या साधनांचा वापर केला जातो. लेखी स्वरूपातील साधनांमध्ये खुले (मुक्त) प्रश्नांचा (open ended questions) अधिक वापर करण्यात यावा. संविधानातील मूल्ये, गाभाघटक, जीवनकौशल्ये व दूरगामी उद्दिष्टे या सदंर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार व्हावा. मूल्यमापन करतांना विषयांची उद्दिष्टे पाहावीत व त्यांनुसार मूल्यमापनाची कार्यपद्धती वापरावी.

संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करताना ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्ये, अभिरुची, अभिवृत्ती, रसग्रहण इत्यादी उद्दिष्टांचा विचार करण्यात येते. संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करताना सर्व उद्दिष्टांना योग्य प्रमाणात भारांश द्यावा. तसेच वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी या प्रश्नांसाठी इयत्तानिहाय योग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा. संकलित मूल्यमापनासाठी साधने तयार करतांना विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती, सर्जनशीलता आणि बहुविध बुद्धिमत्तेला वाव देणे गरजेचे असते. विद्यार्थांना आपली मते मुक्तपणे व सहज मांडता येतील असे मूल्यमापन करावे. शिक्षकाने शाळाव्यतिरिक्त इतर खाजगी यंत्रणेकडून तयार करण्यात आलेली मूल्यमापनाची साधन-तंत्रे व प्रश्नपत्रिका न वापरता वर्गनिहाय आणि विषयनिहाय संकलित मूल्यमापन करावे. या मूल्यमापनातून विद्यार्थांच्या उल्लेखनीय बाबी, वैयक्तिक गुण आणि त्यांची आवड इत्यादी लक्षात घेऊन त्या गुणांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. सर्वंकश मूल्यमापनामध्ये जे विद्यार्थी शैक्षणिक व इतर बाबतींत मागे असतील, अशांना वैयक्तिक अथवा गटांमध्ये अतिरिक्त पुरक असे मार्गदर्शन करून त्यांच्या अध्यनातील व इतर बाबतींतील अडचणी/त्रुटी यांचा शोध घेऊन त्यांना अपेक्षित विकासापर्यंत आणले जाते.

समीक्षक – रघुनाथ चौत्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा