सर्वसामान्यपणे शिक्षकाने एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा तोंडी स्वरूपात केलेले मूल्यमापन म्हणजे नैदानिक चाचणी होय. सदर चाचणीचा उपयोग शिक्षकाच्या अध्यापनानंतर वर्गातील विद्यार्थी अपेक्षित पातळी गाठतात की नाही? संबंधित विद्यार्थ्याने वा विद्यार्थिगटाने अपेक्षित पातळी का गाठली नाही? तो कोठे कमी पडला? का कमी पडला? कमी पडण्याचे नेमके कारण काय? इत्यादी प्रश्नांचे निदान करण्यासाठी केला जातो. मूल्यमापनानंतर शिक्षकाने शिकविलेल्या भागाचे वर्गातील किती मुलांना आकलन झाले, याची पडताळणी केली असता वर्गातील काही विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिगटाला त्या घटकाचे आकलन चांगले झालेले असते, तर काहींना त्या घटकातील काही संज्ञा, संकल्पना, संबोध यांचे आकलन झालेले नसते. अशा वेळी शीघ्रबुद्धीच्या मुलांपेक्षा मंदबुद्धीच्या मुलांना तो भाग का समजला नाही किंवा कोणता भाग समजला नाही याचे निदान या शैक्षणिक नैदानिक चाचणीद्वारे केले जाते.

निदान हा शब्द मूळ वैद्यकशास्त्रातील आहे. निदान या शब्दाचा शब्दश: अर्थ चिकित्सा असा होतो. चिकित्सा करत असताना डॉक्टर रोग्याची तपासणी करून रोगाचे कारण काय, ते शोधतात. अनेक कारणांपैकी नेमके कारण शोधून उपचार करतात. या पद्धतीलाच ‘निदान’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे शिक्षणशास्त्रातदेखील निदान हा शब्द वापरला जातो. अध्यापनानंतर अपेक्षित पातळी गाठू न शकणारा विद्यार्थी शिक्षकाच्या दृष्टीने आजारीच असतो. १९८८ मध्ये प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम  कार्यान्वित होत असतानाच राष्ट्रीय किमान अध्ययनक्षमता निश्चित करण्यासाठी १९९० मध्ये आर. एच. दवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आणि क्षमताधिष्ठित अध्यापन व मूल्यमापनप्रक्रिया सुरू झाली. त्यातूनच नैदानिक चाचण्या विकसित होऊन भाषा, गणित व परिसर अभ्यास यांबरोबरच विविध विषय आणि भाषांमध्ये विकसन करून शैक्षणिक नैदानिक चाचणीच्या वापरास सुरुवात झाली.

नैदानिक चाचणीची वैशिष्ट्ये :

 • विद्यार्थ्यांने प्राप्त केलेले खास कौशल्यप्रभुत्व (कमकुवत दुवे व बलस्थाने) ही चाचणी निर्देशित करते.
 • प्रत्येक विषयातील छोटे छोटे घटक किंवा बिंदू विचारात घेऊन नैदानिक चाचणी तयार केली जाते.
 • प्रत्येक विषयात विद्यार्थ्यांची प्रगती न होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी या चाचणीची मदत होते.
 • नैदानिक चाचणी ही संबंधित वर्गशिक्षक आणि शिकवत असलेला विषय व घटक यांसंबंधित असते.
 • नैदानिक चाचणीचे कार्य विश्लेषणात्मक असते.
 • निदान झालेले कारण दूर करण्यासाठी त्याच बिंदूला धरून कसोटी तयार केली जाते.
 • कसोटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कमकुवत दुवे शोधून त्यांचे बलस्थानात रूपांतर करण्यासाठी उपचारात्मक अध्यापनाला शिक्षकास मार्गदर्शक ठरते.
 • नैदानिक चाचणीचे निश्चित असे कोणतेही स्वरूप मान्य नाही. तसेच ती चाचणी प्रमाणित असण्याची गरज नाही; कारण व्यक्तिभिन्नता असल्याने विविधता राहते.

थोडक्यात, नैदानिक चाचणी विद्यार्थ्यांने प्राप्त केलेल्या खास कौशल्यप्रभुत्वाचे निर्देशन करते; विद्यार्थ्याने शिकवलेल्या कोणत्या भागावर प्रभुत्व मिळविले व कोणता भाग त्याला समजला नाही, ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणते.

नैदानिक चाचणीचे प्रकार : विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निदान करणे, निदान झालेले कारण दूर करण्यासाठी त्याच बिंदूला धरून कसोटी तयार करणे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे दोष दूर करणे हे शिक्षकाचे काम आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर अनेक शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञांनी विविध प्रयोग केले. नैदानिक चाचणीचे प्रामुख्याने पुढील तीन प्रकार मानले जातात :

 • प्रश्नोत्तरावर आधारित चाचणी : या प्रकारात बिंदू निश्चित करून त्या बिंदूला धरून प्रश्न तयार केले जातात. वस्तुनिष्ठ प्रकारातील बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडण्यास किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यास विद्यार्थ्यांना सांगितले जाते. फ्रान्समधील मानसशास्त्रज्ञ ‘बिने’ यांच्या वयोमानानुसार बुद्धिमापन चाचण्या (IQ) विकसित करून मानसिक वय व शारीरिक वयानुसार बुद्ध्यांक निश्चित करण्यात आला. दोन ते तीन वर्षांच्या मुलांपासून चौदा ते पंधरा वर्षांसाठीच्या मुलांचा बुद्ध्यांक या पद्धतीने काढला जातो.
 • कार्य संपादन चाचणी : या चाचणीच्या प्रकारात शिकविलेल्या भागावर विद्यार्थ्यांनी किती क्षमता प्राप्त केली, याची चाचणी घेतली जाते. उदा., भाषेच्या संदर्भात आकलन, व्याकरण, शब्दसंपदा, शुद्धलेखन इत्यादी घटकांचा विचार करता येतो. विज्ञानाच्या संदर्भात संज्ञा, संकल्पना, नियम, सूत्रे या मूलभूत घटकांचा विचार केला जातो. गणितातील भाषेचा अर्थ, संख्या लिहिणे, चिन्हांचा वापर करणे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येणे; सूत्रातील अक्षरांचा अर्थ जाणणे इत्यादी गोष्टींचा विचार करून चाचणी तयार केली जाते. विशिष्ट वयानुसार किती क्षमता प्राप्त केली जाते आणि विशिष्ट वयानुसार किती क्षमता प्राप्त करता आली याचे निदान या चाचणीप्रकारातून केले जाते.
 • अभिव्यक्ती तंत्र : या प्रकारामध्ये स्विस मानसशास्त्र हेरमान रोर्शाक (Hermann Rorschach) यांनी विकसित केलेल्या रोशॉर्क पद्धतीचा वापर केला जातो. विविध प्रकारची १० कार्डे देऊन विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. विविध प्रकार असले, तरी नैसर्गिक चाचणीचे निश्चित असे कोणतेही स्वरूप मान्य झाले नाही. वयोमानानुसार चाचणी केव्हा घ्यावी, याबाबतही एकवाव्यता नाही. अलीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पहिली ते दहावीपर्यंत प्रगत चाचणी घेण्यात येते आहे. पूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नैदानिक चाचणी फक्त मराठी व गणित या विषयांसाठी घेण्यात येत होती. त्यात बदल करून महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून नैदानिक चाचणीऐवजी प्रगत चाचणीचे आयोजन एकाच वेळी घेण्याचे धोरण अवलंबिलेले आहे.

प्रगत चाचणीसाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे १२५ कोटी रूपये खर्च करून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित; इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रथमभाषा, गणित, इंग्रजी, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रथमभाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांसाठी चाचणीचे आयोजन केले आहे. या चाचणीनंतर केंद्रीय पातळीवरील ॲपवर अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल स्थानिक पातळीवर पाहता येतो. त्यामुळे विद्यार्थी कोणत्या विषयात का मागे आहे, यांचे निदान शिक्षकाला करता येते.

बोलीभाषाविषयक राज्यातील ६० बोलीभाषांबाबतीतील अडचणी विचारात घेऊन द्विभाषिक कोश तयार केला जातो. याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपक्रम राबवत आहे. असे असले, तरी परीक्षेअगोदर पेपर फुटणे, शिक्षकांची अकार्यक्षमता इत्यादी घटनांमुळे या उपक्रमाबाबत मतमतांतरे व्यक्त होताना पाहावयास मिळते.

समीक्षक – उमाजी नायकवडे

प्रतिक्रिया व्यक्त करा