केरकर, केसरबाई : (१३ जुलै १८९२ – १६ सप्टेंबर १९७७). हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका. त्यांचा जन्म गोव्यातील केरी (तालुका फोंडा) या गावी गोमंतकातील संगीतपरंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. लहानपणी गावात होणाऱ्या गवळणकाला (श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारलेली मुलींनी केलेली नाटिका) उत्सवात त्या श्रीकृष्णाची भूमिका करत. त्यांची भूमिका पाहण्यासाठी व गायन ऐकण्यासाठी परगावांहूनही लोक येत असत. वयाच्या आठव्या वर्षी कोल्हापूर येथील वास्तव्यात त्यांनी किराणा घराण्याचे उ. अब्दुल करीमखाँ यांच्याकडे गायन शिकायला आरंभ केला. ही तालीम दहा महिने चालली. पुढे गोव्यातील लामगाव व बांदोडे येथे ग्वाल्हेर घराण्याचे पं. रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे सुमारे तीन वर्षे त्रुटित स्वरूपाचे शिक्षण घेतले. १९०८ साली आई व मामाबरोबर त्या मुंबईस आल्या. तेथे प्रसिद्ध बीनकार व सतारीये उ. बरकतुल्लाखाँ यांच्याकडे १९१५ पर्यंत त्या गायन शिकल्या. १९१२ साली उ. अल्लादियाखाँ यांच्याकडूनही अल्पकाळ संगीतशिक्षण मिळाले. सुमारे चार महिने पं. भास्करबुवा बखले यांचीही तालीम त्यांना मिळाली. दरम्यान हिरालाल यांच्याकडून कथ्थक नृत्य व मँझलेखाँ यांच्याकडून अदाकारीच्या ठुमरीची तालीम त्यांनी घेतली. १९१७ पर्यंत वरील सर्व गुरूंकडून काहीशी खंडित स्वरूपाची तालीम त्यांना मिळाली. गायन शिकण्याची तीव्र इच्छा असूनही दीर्घकाळ कोणत्याच गुरूकडे सलग शिक्षण न झाल्याने त्या व्यथित होत्या.

१९१८ साली झालेल्या एका घटनेने केसरबाईंच्या संगीतशिक्षणाच्या इच्छेस जिद्दीचे स्वरूप आले. एका संगीत मैफलीतील अपमान जिव्हारी लागल्याने त्यांनी उत्तम तालीम प्राप्त करून गायनात प्रभुत्व मिळवण्याचा चंग बांधला. जयपूर-अत्रौली घराण्याच्या अल्लादियाखाँसाहेबांकडे तालीम घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अखेरीस सेठ विठ्ठलदास द्वारकादास यांच्या मध्यस्थीने खाँसाहेबांनी काही अटी घालून शिकवायचे कबूल केले. १ जानेवारी १९२१ रोजी गंडाबंधन समारंभ होऊन केसरबाई खाँसाहेबांच्या रीतसर शागीर्द झाल्या. त्यांना खाँसाहेबांकडून अत्यंत सक्त व शिस्तशीर तालीम मिळाली. त्यांच्याकडून अनेक आम व खास राग तसेच बंदिशींची तालीम मिळाल्यावर केसरबाई मैफलींत प्रस्तुती करू लागल्या.

ढाल्या व रुंद आवाजातील तीनही सप्तकांत ‘आ’ कारातील आवाजाचा खुला लगाव, दीर्घ दममास, दीप्तिमान स्वर, ख्यालाची भारदस्त बढत, आलापातील पेचदारपणा, बलपेचयुक्त तानेचा दाणेदारपणा, आमद करून डौलदारपणे सम गाठणे, गायनातील ओघवतेपणा ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होती. मुख्यत: विलंबित ख्यालावर त्यांचा भर असे, द्रुत लयीतील बंदिशी त्या क्वचित गात. अनवट व मिश्ररागांवर त्यांची अधिक मदार असे. मैफलींत ठुमरी, होरी, भजन त्या क्वचितच पेश करीत. देशभरातील सर्व रसिक स्वरमंचांवर, संगीत समारोहांत एक सिद्धकंठ गायिका म्हणून त्यांनी अधिराज्य गाजवले. त्या काळातील सर्वाधिक बिदागी घेणाऱ्या कलाकारांत त्यांची गणना होत असे. अनेक संस्थानिकांनी त्यांना दरबारांत पेशकशीसाठी निमंत्रित करून गौरविले. १९३८ साली कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) येथील अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांचा सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून गौरव झाला. संपूर्ण भारतभर त्यांच्या गायनाचे चाहते होते, ज्यांत कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांचाही समावेश होतो. त्यांच्या सूचनेनुसार १९४८ साली कोलकता येथील ‘संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समिती’तर्फे केसरबाईंना ‘सूरश्री’ हा किताब बहाल करण्यात आला. कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असतानाच १९६५ साली त्यांनी जाहीर कार्यक्रमांतून सन्मानपूर्वक निवृत्ती घेतली.

केसरबाई अत्यंत मानी होत्या. हा स्वभाव अनेकांना सकृद्दर्शनी आत्मप्रौढीचा वाटे. मात्र कोणत्याही बाबतीत सवंगपणा, हीणकसपणा त्यांना मान्य नव्हता. व्यावसायिक ध्वनिमुद्रणे, रेडिओवरून गायन त्यांना पसंत नव्हते. मात्र हिज मास्टर्स व्हॉइसचे ध्वनिमुद्रण अधिकारी, गायक जी. एन्. जोशी यांनी मोठ्या मिनतवारीने केसरबाईंना राजी केले आणि मग हिज मास्टर्स व्हॉइस आणि कोलंबिया या ध्वनिमुद्रणसंस्थांसाठी त्यांनी ध्वनिमुद्रणे केली. त्यांतील काही पुढीलप्रमाणे : गौरी, काफी कानडा, खंबावती, देश, काफी होरी, भैरवी होरी (१९३६), ललित, जौनपुरी (१९४४), मारुबिहाग, मालकंस, नंद, परज (१९४५), नटकामोद, दुर्गा (१९४६), ललिता गौरी, गौड मल्हार (१९४७), देसी, सुखिया बिलावल (रेकॉर्डवर कुकुभ बिलावल असा उल्लेख) (१९४९), तोडी, शंकरा, जयजयवंती, मांड होरी, मांड ठुमरी, भैरवी ठुमरी (जात कहां हो) (१९५३), बिभास, सुघराई, ठुमरी (सैंया भला जोगी), भैरवी ठुमरी (जात कैसे समझाऊं) (१९५५) या ध्वनिमुद्रिका तीन मिनिटांत ख्याल गायकी किती उच्च दर्जाने व आशयसंपन्न रीतीने मांडली जाऊ शकते याचे उदाहरण आहेत. या ध्वनिमुद्रिका अत्यंत गाजल्या. त्यांच्या ध्वनिमुद्रित गायनातील अनेक रागरूपे कोड्यात टाकणारी असल्याने रागशुद्धतेच्या संदर्भात त्यांवर अनेक शंकाही उपस्थित केल्या गेल्या, टीकाही झाली. मात्र बाईंच्या गायकीची सर्व वैशिष्ट्ये यांत जतन झाली असल्याने या ध्वनिमुद्रिकांचे महत्त्व आजही अबाधित आहे. केसरबाईंच्या पश्चात त्यांच्या मैफलींतील गायनाची ध्वनिमुद्रणेही संगीत नाटक अकादमी (दिल्ली), संगीत केंद्र (अहमदाबाद) या संस्थांनी प्रकाशित केली आहेत. २०१३ साली त्यांच्या ७८ आ. प्र. से. ध्वनिमुद्रिकेचे पुनर्वितरणही अमेरिकेत करण्यात आले.

१९७७ साली व्हॉयेजर-१ या अंतराळयानात मानवी संस्कृतीचे द्योतक म्हणून जगभरातील संगीताचे नमुने सुवर्णांकित ताम्रध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात जतन करण्यात आले. रॉबर्ट ब्राउन या संगीतशास्त्रज्ञाने भारतीय संगीताचे प्रतिनिधित्व करणारे संगीत म्हणून केसरबाईंनी गायलेल्या भैरवीतील ‘जात कहां हो अकेली गोरी’ या ठुमरीच्या ध्वनिमुद्रणाचा समावेश या अंतराळयानातील मुद्रिकेसाठी केला. याद्वारे केसरबाईंचे गायन अंतरिक्षात पोहोचले.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील आपल्या दुमजली बंगल्यात त्यांचे वास्तव्य होते. उतारवयात त्यांनी धोंडूताई कुलकर्णी यांना तालीम दिली. धोंडूताई या केसरबाईंच्या एकमात्र शिष्या होत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे उद्घाटन केसरबाईंच्या हस्ते तानपुरा छेडून करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी – प्रमुख आचार्या (१९५३), पद्मभूषण (१९६९, भारत सरकार), राज्यगायिका (१९६९, महाराष्ट्र राज्य) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. मुंबई येथे केसरबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

हिंदुस्थानी कलासंगीतातील आदर्शाचा एक मानदंड ठरलेल्या केसरबाईंचा प्रभाव अनेक समकालीन आणि उत्तरकालीन कलाकारांवर पडला. ज्या काळात संगीतक्षेत्रात मुख्यत: पुरुषकलाकारांची मक्तेदारी होती, त्या काळात केसरबाईंनी एक आगळे मानाचे स्थान मिळवले आणि त्याचा फायदा पुढील काळातील स्त्री-कलाकारांस झाला. या कारणास्तव सिद्धेश्वरीदेवी,  हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर, एम. एस. सुब्बलक्ष्मी इत्यादी अनेक गायिका त्यांना अतिशय मान देत असत. केसरबाईंच्या गायनाचा असर गजाननबुवा जोशी, भीमसेन जोशी इ. कलाकारांवर होताच; तसेच अलीकडच्या काळातील मंजिरी असनारे- केळकर या गायिकेवरही त्यांचा गायनाचा प्रभाव आढळतो.

केसरबाईंचे सूरश्री  हे चरित्र त्यांचे बंधू बाबूराव केरकर यांनी लिहून प्रकाशित केले. केशवराव भोळे, बा. र. देवधर यांच्यापासून अशोक दा. रानडे यांच्यापर्यंत अनेकांनी केसरबाईंबद्दल गौरवपूर्ण लेखन केले आहे. त्यांचे जन्मगाव केरी येथे ‘सूरश्री केसरबाई केरकर मुलींची उच्च माध्यमिक शाळा’ आहे. गोव्यात दर वर्षी ‘केसरबाई केरकर स्मृती संगीत महोत्सव’ आयोजित केला जातो. मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे (एन.सी.पी.ए.) गायनात कारकिर्द करण्याची मनीषा असलेल्या नवोदित कलाकारांस सूरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्ती देण्यात येते.

संदर्भ :

  • केरकर, बाबुराव, सूरश्री, मनोरंजन प्रकाशन, मुंबई, १९८३.
  • देवधर, बा. र., थोर संगीतकार, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९७७

समीक्षक – मनीषा पोळ

प्रतिक्रिया व्यक्त करा