विनायक रामचंद्र आठवले

आठवले, विनायक रामचंद्र : ( २० डिसेंबर १९१८ – ११ ऑगस्ट २०११ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बंदिशकार, संगीतज्ज्ञ, गायक व गानगुरू. त्यांचे पूर्ण नाव विनायक रामचंद्र आठवले. त्यांचा जन्म भोर (जि. पुणे) येथे झाला. त्यांचे बालपण अहमदाबादमध्ये गेले. त्यांचे वडील रामचंद्र हे अहमदाबादमधील लालभाई दलपतभाई कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते आणि ते कीर्तनही करीत असत. त्यांनी विनायकबुवांना वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण देण्यास सुरुवात केली; आणि त्यांच्या कीर्तनाला ते संवादिनीवर साथ करण्याकरिता विनायकबुवांना नेऊ लागले. त्यामुळे गायक होण्याची उमेद विनायकबुवांच्या मनात रुजली. १९३९ मध्ये गुजरात कॉलेजमधून त्यांनी बी.एस्सी.ची पदवी घेतली. त्यानंतर अहमदाबादमधेच नोकरीची सुरुवात केली; पण त्या नोकरीत त्यांचे मन रमेना. त्यांनी गायक होण्याच्या ध्यास घेतला होता. १९३९ मध्ये पुण्याला विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे संगीताची तालीम घेण्यास सुरुवात केली. नंतर १९४२च्या छोडो भारत आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. त्यादरम्यान त्यांच्या संगीतशिक्षणात खंड पडला.

पुढे बडोदा येथे संगीत विद्यालयात अध्यापन करीत असताना आठवले यांना उस्ताद फैय्याजखाँ यांचा सहवास लाभला. त्यातून ठुमरीचे मर्म त्यांनी जाणून घेतले. पं. भास्करबुवा बखले यांच्या शिष्या यल्लुबाई यांच्याकडे त्यांनी ठुमरीचे शिक्षण घेतले. नंतर अहमदाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रशासक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला (१९४४). पुढे कोलकात्याच्या संगीत विद्यालयात प्राचार्य म्हणून ते कार्यरत झाले (१९४५). यानंतर अहमदाबाद, जयपूर, दिल्ली आणि मुंबई या आकाशवाणी केंद्रांवर विविध पदांवर त्यांनी काम केले (१९४६–७०). १९५३ मध्ये त्यांनी ‘संगीत प्रवीण’ ही परीक्षा दिली. पं. विनायकबुवा पटवर्धन, पं. वझेबुवा, उस्ताद विलायत हुसैनखाँ या तीन गुरूंच्या मार्गदर्शनानंतर त्यांची जडणघडण एक उत्तम गवई म्हणून होत गेली.

१९७० साली एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्रपाठक या पदावर आठवले यांची नेमणूक झाली. त्यांनी विद्यापीठात अनेक सांगीतिक उपक्रम राबवले. संगीत सौभद्र  या नाटकातील संगीत व त्याचे स्वरूप या विषयावर त्यांनी सप्रयोग व्याख्यान दिले. त्याद्वारे सौभद्रातील गुजराती संगीत, कर्नाटक संगीत, लावणी संगीत, कीर्तन संगीत इत्यादी संगीत प्रकाराचे नमुने सादर केले. संगीततज्ज्ञ के. जी. गिंडे आणि संगीत समीक्षक अशोक रानडे  यांच्या साहाय्याने एस.एन.डी.टी चा पहिला संगीत अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. तो ज्ञानमूलक आणि प्रात्यक्षिकमूलक असावा अशी त्यांची विचारसरणी होती. विद्यापीठात एम.ए.चा अभ्यासक्रम हा ज्ञानमूलक, तर पीएच.डी.चा अभ्यासक्रम प्रबंधाच्या स्वरूपात असावा; त्याचप्रमाणे गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या अभ्यासक्रमात ‘संगीत अलंकार’पर्यंत ज्ञानशास्त्रावर तर ‘संगीत प्रवीण’चा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर भर देणारा असावा, असे पायंडे त्यांनी पाडले. गायकांनी मैफल कशी रंगवावी याचा त्यांनी परिपाठच दिला. बैठक, राग, रागाची निवड व सुरुवात कशी करावी, रागवाचक संगती कशी असावी याविषयी त्यांचे विचार निश्चित होते.

एस.एन.डी.टी. विद्यपीठातून निवृत्त झाल्यानंतर (१९७९) आठवले यांची नियुक्ती कला अकादमी, गोवा येथे संगीत विभागाचे संचालक म्हणून झाली (१९८०). तेथील पाच वर्षांच्या काळात त्यांनी अनेक शिबिरे आणि नवनवीन उपक्रम राबवले. याचकाळात संगीतातील घराणी, ठुमरी, राग-संकल्पना, बंदिश, संगीताचे रसग्रहण इत्यादीविषयक जाहीर व्याख्याने दिली. वाशी (नवी मुंबई) येथील गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्वतंत्र इमारत उभी करण्यात त्यांचा सहभाग मोठा होता. तेथे ते आचार्यही होते (१९८४-८८). १९८८ मध्ये त्यांनी तेथे संगीत वर्ग सुरू केले. त्याचवर्षी त्यांनी वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी रागचर्चा शिबिराचे आयोजन केले. त्यात के. जी. गिंडे, आनंदराव लिमये, कमलताई तांबे आदी संगीतकारांनी सहभाग घेतला. पुढे गायनाबरोबरच तबला, संवादिनी, व्हायोलिन इ. वादनाचे आणि कथ्थक, भरतनाट्यम् आदी नृत्याचे व सुगम संगीताचे वर्ग त्यांनी सुरू केले. गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू केली. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत कला विहार  या मासिकाचे संपादकपदही त्यांनी भूषविले. गांधर्व विद्यालयातील त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान मंडळाने त्यांना ‘महामहोपाध्याय’  ही उपाधी देऊन केला.

आठवले यांनी निरनिराळ्या संकल्पनांवर कार्यक्रम सादर केले. सामवेद से सत्संग, वसंतपंचम, गौरीमंजिरी, बंदिशीतील सौंदर्य, गीत मल्हार, सप्तकल्याण, राग नवरंग, कंसायान, तोडी के प्रकार, कानडा के प्रकार, ऋतुसंहार हे कार्यक्रम आणि २००४ साली मुंबई आकाशवाणीवरील रंगछटा घराण्यांच्या  ही मालिका हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे होत. ‘नादपिया’ या टोपणनावाने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. या १२८ बंदिशींचे नोटेशन आणि ललितकला, ललित बिलास, भिन्नभैरव, चंद्रभैरव, कौसीबाहार, पटकाफी  आणि मधुकल्याण आदी रचलेले राग यांचा समावेश त्यांच्या नादवैभव  या ग्रंथात आहे. त्यांनी लिहिलेल्या तरंगनाद  या मराठी  पुस्तकाचा हिंदी (नादचिंतन ) व इंग्रजी (तरंगनाद ) या भाषांत अनुवाद झाला आहे. याशिवाय त्यांनी रागवैभव  या ग्रंथाची निर्मितीही केली. त्यांनी मराठी विश्वकोश  या प्रकल्पातील खंडांमध्येही संगीतविषयक लेखन केलेले आहे.

आठवले यांचा विवाह विभावरी यांच्याशी झाला (१९४४). त्यांना लीना, स्मिता व शिरीष ही तीन मुले आहेत.

त्यांच्या शिष्यवर्गात  निशा पारसनीस, जे. व्ही. भातखंडे, संध्या काथवटे, स्वरदा साठे, विदुला भागवत, वैजयंती जोशी, रसिका फडके, सुधीर पोटे यांचा समावेश होतो.

त्यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

समीक्षक – सुधीर पोटे

#गांधर्व महाविद्यालय मंडळ

प्रतिक्रिया व्यक्त करा