टेंबे, गोविंदराव सदाशिव : (५ जून १८८१–९ ऑक्टोबर १९५५). प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायकनट व साहित्यिक. त्यांचा जन्म सांगवडे, जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अंबा. गोविंदरावांनी कोल्हापूर येथेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले व काही वर्षे सनदी वकिली केली. गायनाच्या कार्यक्रमात जाऊन त्यांना संवादिनी (हार्मोनियम) या वाद्याची आवड निर्माण झाली. प्रत्यक्ष या वाद्यवादनाचे रीतसर शिक्षण त्यांनी घेतले नव्हते; मात्र स्वप्रयत्नाने त्यांनी या वादनात प्रावीण्य मिळवले. गोविंदराव भास्करबुवा बखले यांच्या साथीला असायचे आणि बहुतेक वेळा संवादिनीचा एकपात्री प्रयोगही करायचे. ते बर्कतुल्ला सितारिये यांचे गंडाबंद शागीर्द होते.
१९११–१३ या काळात त्यांनी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त प्रमुख गायकनट म्हणून काम केले. पुढे १९१३–१५ या दरम्यान ‘गंधर्व नाटक मंडळी’त सुरुवातीचे भागीदार व नट म्हणून त्यांनी काम केले. १९१७ मध्ये त्यांनी स्वत:च्या ‘शिवराज नाटक मंडळी’ या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. यासाठी त्यांनी नवी नाटके लिहिली, पदे रचली आणि संगीतही दिले. ‘धैर्यधर’ (मानापमान), ‘कच’ (विद्याहरण), ‘चारूदत्त’ (मृच्छकटिक) या त्यांच्या काही प्रमुख गाजलेल्या भूमिका. त्यांनी मानपमान या नाटकास संगीतही दिले. नाटकास संगीत देण्याच्या निमित्ताने त्यांनी रागदारी संगीत, ठुमरी बाज इत्यादी पहिल्यांदाच संगीत रंगभूमीवर आणले. १९३० च्या सुमारास त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आणि प्रभात, इंपीरियल, ईस्ट इंडिया, मिनर्व्हा, नटराज इ. संस्थांच्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या, तसेच संवादलेखन, गीतरचना व संगीतदिग्दर्शन या क्षेत्रांतही प्रशंसनीय कामगिरी केली. अयोध्येचा राजा, अग्निकंकण, माया मच्छिंद्र इ. त्यांचे गाजलेले चित्रपट होत. अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटात ते नायकाच्या प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचे संगीतदिग्दर्शनही त्यांनी केले होते. यांखेरीज त्यांनी पट-वर्धन (१९२४), तुलसीदास (१९२८), वत्सलाहरण (१९२९), वरवंचना (शेरिडनच्या ड्यूएन्नाचे रूपांतर, १९२५), गंभीर घटना (ऑस्कर वाईल्डच्या इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्टचे रूपांतर, १९३२), तारकाराणी, देवी कामाक्षी, मत्स्यभेद इ. नाटके लिहिली. तसेच महाश्वेता, जयदेव, प्रतिमा इ. संगीतिका (ऑपेरा) लिहून त्या सादरही केल्या. १९३९ मध्ये त्यांनी म्हैसूर संस्थानच्या युवराजांबरोबर यूरोपचा दौरा केला. तेथे त्यांना पोपच्या समोर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली.
संवादिनी या साथीच्या वाद्याला टेंबे यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पेटीवर बोटे टाकण्याची त्यांची पद्धत अंत:करणाचा ठाव घेणारी होती. जयपूर घराण्याची तेढी, बिकट गायकी व अभिजात नाट्यसंगीत या दोहोंचे वादन ते सारख्याच कुशलतेने पेटीवर करीत. संगीतातील काही बाळबोध प्रकारांवर (उदा., साकी, दिंडी यांसारखी वृत्ते, कीर्तनकारांची पदे इ.) आधारलेल्या किर्लोस्करी नाट्यसंगीताला अभिजात हिंदुस्थानी संगीताचा तसेच वेधक कर्नाटकी चालींचा नवीन साज चढविण्यात व संगीताला नाटकात अग्रेसर स्थान प्राप्त करून देण्यात टेंबे यांचा वाटा फार मोठा आहे. या दृष्टीने मानापमान व विद्याहरण या नाटकांतील चाली उल्लेखनीय आहेत. त्यांनी मराठी संगीताचा मानबिंदू अशा लक्षणगीतांची रचना केली. या लक्षणगीतांची ध्वनिमुद्रिकाही नंतर प्रकाशित करण्यात आली.
माझा संगीत–व्यासंग (१९३९), माझा जीवन विहार (आत्मचरित्र, १९४८), खाँसाहेब अल्लादियाखाँ यांचे चरित्र (१९५४), जीवनव्यासंग (१९५६) ही त्यांची महत्त्वाची ग्रंथनिर्मिती. टेंबे यांच्या ग्रंथांतून नाट्य व संगीताची दुनिया अतिशय हृद्यतेने रूपास आली आहे. वरील ग्रंथांमध्ये प्रामुख्याने चरित्रपर वर्णने आहेत. त्यांचा कल्पना–संगीत (१९५२) हा ग्रंथ स्वतंत्र स्वरलिपी व रागवर्गीकरण ह्या संकल्पनेवर आधारित आहे. संगीतावर आत्मप्रत्ययपूर्वक रसाळ व आस्वाद्य लेखन करणाऱ्या लेखकांत त्यांचे स्थान अग्रगण्य मानले जाते. नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, संगीतक्षेत्रातील पहिले सौंदर्यमीमांसक, संगीतिकांचे पहिले प्रवर्तक वगैरे अनेक क्षेत्रांत ते पहिले म्हणून गाजले. भारत नाट्य संमेलन (१९३३), मराठी रंगभूमी शतसांवत्सरिक उत्सव, नागपूर (१९४३), मराठी साहित्य परिषद, बडोदे आदींची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविली. कोल्हापूरातील गायन समाज देवल क्लब या संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते या संस्थेचे काही काळ संचालकही होते. तेथे कला सादर करणाऱ्या होतकरू कलाकारांना त्यांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन असे. या संस्थेमध्ये त्यांच्या स्मरणार्थ ‘ गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ उभारण्यात आलेले आहे.
गोविंदरावांचा विवाह लक्ष्मी यांच्याशी झाला. त्यांना रघुनाथ, गणेश व माधव हे तीन पुत्र. माधव टेंबे हेदेखील संवादिनी वाजवीत असत.
गोविंदरावांचे दिल्ली येथे निधन झाले.
समीक्षक : सुधीर पोटे