खेचर विसोबा : (तेरावे शतक). वारकरी संप्रदायातील आद्यसंत. नामदेवांचे गुरू म्हणून परिचित. मूळचे नाथ संप्रदायातील महान योगी. खेचर हे आडनाव नव्हे. देह आकाशगमन करण्याइतका हलका, तरल करण्याची सिध्दी प्राप्त असलेला योगी म्हणजे खेचर. योगमार्गात खेचरी मुद्रेला विशेष महत्त्व असते. त्या टप्प्यावर पोहोचलेला, या अर्थाने खेचर हे उपनाम मिळाले असावे. विसोबांची ज्ञाती व व्यवसाय याबाबत मतभिन्नता आहे. संतचरित्रकार महिपतींच्या भक्तविजय ग्रंथात ते चाटी म्हणजे कापडव्यापार करणारे ब्राह्मण मानले आहेत. आंबेजोगाई येथील दत्तसंप्रदायी कवी दासो दिगंबर यांच्या संतविजय  ग्रंथात

विसोबा खेचर जाण | राहे मुंगीमाजी आपण | ख्रिस्तीचा उदीम करून | काळक्रमण करितसे |

असा उल्लेख आहे. ख्रिस्ती म्हणजे सावकारी करणारा व्यापारी. परंतु याबाबत विश्वसनीय माहिती हाती लागत नाही. रा. चि. ढेरे यांनी विसोबा खेचर विरचित षट्स्थल  पुस्तकात विसोबा हे पांचाळांमधील सोनार समाजाचे होते असे दाखवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी शिल्पशास्त्र  या ग्रंथाचा आधार घेतला आहे. संत नामदेवांच्या अभंगातून उपलब्ध संदर्भाच्या आधारे असे म्हणता येते की बारा ज्योतिर्लिंगांच्या यादीतील आठवे प्रसिध्द स्थान औंढ्या नागनाथ हे विसोबांचे मूळ गाव असावे. औंढ्या नागनाथ हे पंढरपूरापासून ३६६ किलोमीटर दूर हिंगोली जिल्ह्यात आहे. संत नामदेवांनी तिथे जाऊन विसोबांची भेट घेतली तेव्हा ते मंदिरातील शिवलिंगावर पाय ठेवून निवांत झोपले होते. त्यांना विचारल्यावर ते उत्तरले ‘जिथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव’. यावर विचार करताना नामदेवांना साक्षात्कार झाला, ‘देवाविण ठाव रिता कोठे’. या घटनेने डोळे उघडलेल्या नामदेवांना विसोबांनी सर्वव्यापी निर्गुण निराकार परमेश्वराची जाणीव करून दिली. त्यामुळेच नामदेवांनी आपल्या अनेक अभंगातून विसोबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आढळतो. पुढे ‘द्वादशीचे गावी जाहला उपदेश’ असे नामदेवांनी म्हटले आहे. द्वादशीचे गाव म्हणजे बार्शी होय. या बार्शी (जि. सोलापूर) येथे विसोबांची समाधी आहे. ही समाधी शके १२३१ (सन १३०९) मध्ये घेण्यात आली.

विसोबा खेचर लिखित शडूस्छळी (षट्‌स्थळ) ग्रंथाच्या हस्तलिखिताचा शोध ज्येष्ठ संशोधन रा.चि.ढेरे यांना सासवड येथील सोपानदेव समाधी मंदिरातील कागदपत्रांच्या गठोळ्यात १९६९ मध्ये लागला. या ग्रंथात विसोबा खेचरांची गुरूपरंपरा आदिनाथ – मत्येंद्रनाथ – गोरक्षनाथ – मुक्ताई – चांगा वटेश्र्वर – कृष्णनाथ (रामकृष्णनाथ) – खेचर विसा अशी आलेली आहे. या परंपरेतील मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई नव्हे. या ६७७ ओवीसंख्या व तीन अध्याय (विभाग) असलेल्या ग्रंथात वीरशैव तत्त्वज्ञानाचे दर्शन घडते. त्यामुळे वीरशैव लिंगायतांमध्ये या ग्रंथाला महत्त्व आहे.

श्री नामदेव महाराज गाथामध्ये विसोबांचे दोन अभंग आढळतात. विसोबा- नामदेवांचे नाते गुरुशिष्यापेक्षा सख्यत्वाचे / मित्रत्वाचे अधिक असल्याचे जाणवते. जरी नामदेवांनी विसोबांचा काही अभंगात आदरपूर्वक गुरू म्हणून उल्लेख केला असला, तरी त्यांनी विसोबांचा योगमार्ग स्वीकारलेला नाही. उलट विसोबाच पुढे वारकरी संप्रदायाचा एक भाग झालेले आढळतात.

संदर्भ : श्रीसकलसंतगाथा.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.