कुंभार, गोरा  :  (१२६७ – १३१७). वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे संतकवी. तेर (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथे इ.स.१२६७ साली जन्म. समाधीही तेर येथेच. समाधी इ.स. १३१७ मध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी घेतली. वारकरी संप्रदायातील सर्वांत जेष्ठ संत, म्हणून त्यांना गोरोबा काका म्हटले जाते. ते मूळचे निर्गुणोपासक ज्ञानमार्गी होते. त्यांनी संत नामदेवांना निर्गुणोपासनेचा तसेच योगमार्गाचा उपदेश केला, परंतु नामदेवांनी आपला भक्तिमार्ग सोडला नाही. पुढे गोरोबा वारकरी संप्रदायात संत म्हणून गौरविले गेले. गोरा जुनाट पैं जुनें || हातीं थापटणे अनुभवांचे ||’ असे त्यांच्याविषयी म्हटले गेले. त्याचे २१ अभंग उपलब्ध आहेत. त्यांपैकी १५ अभंगात नामदेवांशी संवाद आहे. अनेक अभंगात निर्गुणोपासना सांगणार्‍या योगमार्गाचे वर्णन आहे. तर काही अभंगात सगुण विठ्ठलाचा गौरव आहे. नामदेवांचे मडके कच्चे ठरविणारे अधिकारी योगगुरू अशी प्रतिमा जनमानसात प्रचलित असली तरी गोरोबा स्वत:च नामया जीवलगा | आलिंगण देगा मायबापा || असे म्हणताना दिसतात. यावरून त्या दोघांमधील सख्यत्व व आदरभावच दिसून येतो. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे | तव झालो प्रसंगी गुणातीत || असे लिहिणार्‍या गोरोबांची कविता ही सूचक, अर्थबहूल व भावसमृध्द आहे.

संदर्भ : श्रीसकलसंतगाथा