ओखोट्स्क समुद्रातील (उत्तर पॅसिफिक महासागराचा भाग) रशियाचे एक मोठे बेट व देशाचा अतिपूर्वेकडील द्वीपप्रांत (ओब्लास्ट). ४५° ५३′ उ. ते ५४° २५′ उ. अक्षांश यांदरम्यान दक्षिणोत्तर विस्तारलेल्या या बेटाची लांबी ९४८ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी १६० किमी.पर्यंत असून त्याचे क्षेत्रफळ ७६,४०० चौ. किमी. आहे. लोकसंख्या ४,९७,९७३ (२०१० अंदाज). पश्चिमेस तातार सामुद्रधुनी व जपानचा समुद्र, तर दक्षिणेस ला पेरुस सामुद्रधुनी यांनी हे बेट अनुक्रमे रशियाची (सायबीरिया) मुख्य भूमी आणि जपानचे होक्काइडो बेट यांपासून वेगळे केले आहे. जपानचा किनारा या बेटापासून सुमारे १,५२३ किमी.वर आहे. याच्या दक्षिण भागातील यूझ्नो–सॅकालीन्स्क (लोक. १.८८ लाख – २०१२) हे या प्रांताचे प्रशासकीय ठिकाण आहे.

भूशास्त्रीय दृष्ट्या बेटाची भूरचना जपानच्या ज्वालामुखीजन्य बेटांपेक्षाही आशियाच्या मुख्य भूमीशी मिळतीजुळती आहे. बेटाचा उत्तर भाग कमी उंचीच्या मैदानाचा असून बाकीचा बव्हंशी प्रदेश डोंगराळ व जंगलव्याप्त आहे. बेटावर उत्तर-दक्षिण पसरलेल्या प्रमुख दोन डोंगररांगा असून त्यांदरम्यान मध्यवर्ती खोऱ्याचा सपाट प्रदेश आहे. पश्चिमेकडील डोंगररांग सुमारे १,२०० मी. उंचीची, तर पूर्वेकडील सुमारे १,६०० मी. उंचीची असून तीमधील मौंट लोपाटीन (१,६०९ मी.) हे बेटावरील सर्वांत उंच शिखर आहे. उत्तरेकडील टिम व दक्षिणेकडील पोरोनाई या प्रमुख नद्यांनी मध्यवर्ती खोऱ्याचे जलवाहन केले आहे. या प्रदेशातूनच बहुतांश रस्ते व लोहमार्ग काढण्यात आले आहेत. बेटावरील हवामान अतिशय थंड असून जानेवारीमध्ये तापमान – २२° से. ते – १०° से. असते, तर अनेक वेळा ते – ४६° से.पर्यंत खाली जाते. जुलैमध्ये सरासरी तापमान १७° ते १८° से. असते. थंड ओखोट्स्क सागरी प्रवाह याच्या पूर्व किनाऱ्याजवळून वर्षभर वाहतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६४ सेंमी. असून उन्हाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात बहुतेक प्रदेश बर्फाच्छादित असतो व बर्फ सुमारे सहा महिन्यांपर्यंत टिकून राहते.

खनीजतेल व नैसर्गिक वायू उत्पादन, सॅकालीन बेट

सॅकालीन बेटाच्या उत्तर भागातून खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. ‘सॅकालीन एनर्जी इन्व्हेसमेंट कंपनी लि.’ (स्थापना १९९४) ही खनिजतेल व नैसर्गिक वायू उत्पादनात अग्रेसर आहे. हा जगप्रसिद्ध प्रकल्प देशाच्या अपतट प्रकल्पांपैकी पहिला मानला जातो. यांशिवाय काही प्रमाणात सोने, पारा व प्लॅटिनम यांच्या खनिजांचे उत्पादन बेटाच्या अन्य भागांतून मिळते. येथील खनिज संपत्ती ही बेटाच्या आर्थिक विकासाचा मोठा आधार आहे. गुरेपालन, लाकूडतोड, कागदनिर्मिती इत्यादी उद्योगांचाही बेटावर विकास झाला आहे. टिम नदीखोऱ्यात पालेभाज्या, गहू व बार्ली यांचे पीक घेतले जाते. डोंगर उतारावरील उंच प्रदेशातील जंगलांत स्प्रूस, फर, लार्च, बर्च इत्यादी; तर कमी उंचीच्या भागात मॅपल, ॲश, वॉलनट, ओक, एल्म इत्यादी वनस्पती आढळतात. उत्तर सॅकालीनचा भाग टंड्रा प्रदेशात मोडतो. मासेमारी हा बेटावरील लोकांचा मुख्य व्यवसाय असून येथील समुद्रात सॅमन, कॉड, हेरिंग, खेकडे इत्यादी जलचर मोठ्या प्रमाणात आढळतात. येथील लाल रंगाचा राक्षसी खेकडा जगप्रसिद्ध आहे.

सॅकालीन बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर प्रथम जपानी मच्छीमारांनी वस्ती केली. १८५३ मध्ये बेटाच्या उत्तर भागात रशियनांनी प्रवेश केला. १८५५ च्या करारानुसार रशिया व जपान या दोन्ही देशांचे नियंत्रण सॅकालीन व कूरील बेटांवर होते; परंतु १८७५ मध्ये रशियाने कूरील बेटांच्या बदल्यात संपूर्ण सॅकालीन बेटावर मालकी हक्क प्रस्थापित केला. पुढे रशियन कैद्यांची शिक्षा भोगण्याची वसाहत म्हणून या बेटाचा दुर्लौकिक झाला. १९०५ मध्ये रशिया-जपान यांतील पोर्टस्मथ तहान्वये बेटाचा दक्षिण भाग (काराफूटो) जपानला मिळाला व रशियन राज्यक्रांतीनंतर जपानने संपूर्ण सॅकालीन बेट व्यापले; परंतु १९२४ मध्ये त्यांनी त्यावरील हक्क सोडून दिला. पुढच्याच वर्षी रशियन फौजांनी याच्या उत्तर भागाचा ताबा घेतला व दुसऱ्या महायुद्घानंतर (१९४५) रशियाने संपूर्ण सॅकालीन बेट ताब्यात घेऊन त्यावरील जपानी लोकांना स्वदेशी पाठविले. २८ मे १९९५ रोजी या बेटास भूकंपाचा मोठा धक्का बसला. त्या वेळी नेफ्टेगॉर्स्क या शहराचे मोठे नुकसान होऊन सुमारे २,००० माणसे मृत्युमुखी पडली.

सॅकालीन बेटावर रशियन लोकांची संख्या जास्त आहे. याशिवाय ऐनू, कोरियन, ओरोक्स इत्यादी लोकांचेही येथे वास्तव्य आहे. उत्तर भागात ओखा, नोग्लिकी, तर दक्षिण भागात ॲनिव्हा, कोर्साकोव्ह, नेव्हेत्स्क, यूझ्नो-सॅकालीन्स्क, ऑर्लोव्हो, पोरोनायस्क इत्यादी प्रमुख शहरे असून ती एकमेकांशी मध्यवर्ती लोहमार्गाने व रस्त्यांनी जोडलेली आहेत. बुख्ता तिखाया हे शांत, बर्फाच्छादित (विशेषत: हिवाळ्यात) ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. यूझ्नो–सॅकालीन्स्क येथे विमानतळ असून येथील प्रादेशिक संग्रहालये, ऑर्थोडॉक्स कॅथीड्रल, अनेक युद्ध स्मारके पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी