डी व्हॅलेरा, एमन : (१४ ऑक्टोबर १८८२ – २९ ऑगस्ट १९७५). आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक नेता, आयरिश प्रजासत्ताकाचा पंतप्रधान व अध्यक्ष. मॅनहॅटन (न्यूयॉर्क) येथे जन्म. त्याचे वडील स्पॅनिश व माता आयरिश होती. लहानपणीच वडील वारल्यानंतर तो आईबरोबर आयर्लंडमध्ये आला. तिथेच त्याने सर्व शिक्षण घेतले आणि ब्लॅकरॉक व रॉयल विद्यापीठ (डब्लिन) यांतून पदवी मिळविली. १९१० मध्ये सिनीड प्लॅनगन हिच्याशी त्याचा विवाह झाला. पहिली काही वर्षे त्याने अध्यापनाचे काम केले (१९१०–१५). पुढे तो राजकारणाकडे वळला. १९१५ मध्ये आयरिश स्वातंत्र्यचळवळीत एक स्वयंसेवक म्हणून त्याने पाऊल टाकले आणि सीन फीन या पक्षाचा तो सभासद झाला. १९१६ च्या ईस्टर उठावात त्याने शौर्य दाखविले. त्यामुळे लवकरच त्याच्याकडे पक्षाचे व होमरूल चळवळीचे नेतृत्व आले. अखेर त्यास अटक होऊन ब्रिटिशांनी देहान्ताची शिक्षा दिली; पण १९१७ मध्ये सर्वक्षमा जाहीर होऊन त्याची मुक्तता झाली. पुढे तो सीन फीन पक्षातर्फे ब्रिटिश संसदेवर निवडून आला; पण त्याने संसदेत जाण्यास नकार दिला. या वेळी आयरिश राष्ट्रवाद्यांत दोन तट पडले होते : प्रजासत्ताकवादी व सनदशीर राजकारण करणारे. डी व्हॅलेराने या भिन्न मतांच्या लोकांत एकजूट घडवून आणली. सीन फीनचा तो अध्यक्ष झाला व राष्ट्रीय चळवळीचा नेता बनला.

१९१८ च्या ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत सीन फीनने बहुतेक सर्व जागा काबीज केल्या. या पाठिंब्याच्या बळावर त्याने स्वतंत्र प्रजासत्ताकाची घोषणा केली आणि त्याचा तो अध्यक्ष झाला. ब्रिटिश सरकारने त्याला पुन्हा कैद केले; पण त्याने तुरुंगातून पलायन करून अमेरिका गाठली. अमेरिकेची स्वतंत्र प्रजासत्ताकाला मान्यता मिळविण्यासाठी त्याने प्रयत्न केले, पण यश आले नाही. तथापि आयरिश स्वतंत्र्याच्या चळवळीकरिता त्याने अमेरिकेत भरपूर निधी जमा केला. आयर्लंडमध्ये स्वातंत्र्याचा लढा चालूच होता. पहिल्या महायुद्धानंतर लॉईड जॉर्ज यांनी आयरिश देशभक्तांशी वाटाघाटी सुरू केल्या. १९२१ मध्ये इंग्लंड व आयर्लंडमध्ये एक करार झाला. त्यानुसार आयर्लंड हे फ्री स्टेट म्हणून जाहीर झाले व आयर्लंडची फाळणी करून अल्स्टर प्रांत वेगळा करण्यात आला. शिवाय राजनिष्ठेची शपथ, गव्हर्नर जनरलची नेमणूक व विशिष्ट खंडणी अशा इतर अटी लादण्यात आल्या. यामुळे नव्या राज्याचे स्वातंत्र्य मर्यादित झाले. डी व्हॅलेराने या करारास विरोध केला; तथापि आयरिश पार्लमेंटने या कराराला मान्यता दिली होती. साहजिकच पूर्ण स्वातंत्र्यवादी आणि कराराने स्वातंत्र्य मान्य केलेले, अशा दोन पक्षांत यादवीस सुरुवात झाली. डी व्हॅलेराला पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले. १९२४ मध्ये तुरुंगातून बाहेर येतानाच त्याने फीयाना फेल या नावाच्या पूर्ण प्रजासत्ताकवादी पक्षाची स्थापना केली आणि १९२७ मध्ये असहकाराचे धोरण सोडून संसदेत प्रवेश मिळविला. १९३२ मध्ये त्याच्या पक्षाने बहुमत मिळविले व तो पुढे जवळजवळ सलग १६ वर्षे पंतप्रधान राहिला. परराष्ट्रमंत्री म्हणूनही तोच काम करी. सत्ता हातात येताच त्याने पूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याकरिता विविध योजना व कार्यक्रम हाती घेतले. नवीन संविधान तयार करून हळूहळू ब्रिटिशांनी लादलेल्या अटींमधून त्याने देशाची मुक्तता करण्यास सुरुवात केली व प्रथम राजनिष्ठेची शपथ रद्द करविली आणि ब्रिटनला द्यावयाचा जमिनीची खंड थांबविला. ब्रिटनचा विरोध एव्हाना शिथिल झाला होता. तेव्हा १९४९ मध्ये अखेर त्याने आयरिश प्रजासत्ताक जाहीर करून आपले स्वतंत्र सार्वभौम आयर्लंडचे स्वप्न साकार केले, मात्र आयर्लंडची फाळणी त्याला टाळता आली नाही.

१९३३, १९३७ व १९३८ या तिन्ही निवडणुकांत तो बहुमताने निवडून आला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटन व देशांतर्गत शक्तींनी त्याचा पिच्छा पुरविला असतानाही त्याने यशस्वी रीत्या तटस्थता अवलंबिली. महायुद्धानंतरच्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला, तरी पुढे त्याने १९५१–५४ व १९५७–५९ साली पुन्हा सत्ता काबीज केली. १९५९ मध्ये तो पहिला अध्यक्ष झाला. पुन्हा १९६६ मध्ये तो निवडून आला. १९७३ मध्ये तो सक्रिय राजकारणातून निवृत्त झाला.

आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक यशस्वी नेता म्हणून त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले. तो काही वर्षे राष्ट्रसंघाच्या असेंब्लीचा अध्यक्ष होता (१९३८). आयर्लंडच्या राष्ट्रीय विद्यापीठाचा कुलपती व डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज याचा संस्थापक म्हणूनही त्याने उल्लेखनीय कार्य केले. डी व्हॅलेराच्या राजकीय धोरणांबद्दल मतभेद आहेत; परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि देशप्रेमाबद्दल सर्वत्र आदरभाव असून विसाव्या शतकातील एक थोर देशभक्त म्हणूनच जग त्याच्याकडे पाहते.

संदर्भ :

  • Longford, Earl of, ; O’ Neill, T. P. Eamon de Valera, New York, 1970.
  • Moody, T. W.; Martin, F. X. Ed. The Course of Irish History, New York, 1967.