तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. ‘अभाव’ याचा अर्थ ‘नसणे’, ‘अस्तित्वात नसणे’ (न+भाव=अभाव) असा होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात अभावाची कल्पना ‘निगेशन’, ‘नॉन्-बीइंग’, किंवा ‘नॉन्-एक्झिस्टन्स’ ह्या संज्ञांनी व्यक्त केली जाते. ‘भाव’ आणि ‘अभाव’ ह्या संज्ञांना भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांत कधीकधी ‘सत्’ आणि ‘असत्’ असाही अर्थ दिलेला आढळतो. जे सत् आहे त्याला सत्ता किंवा अस्तित्व नित्य असायलाच हवे आणि जे असत् आहे त्याला सत्ता किंवा अस्तित्व कधीही असणेच शक्य नाही, असाही दृष्टिकोन तत्त्वज्ञानात काही विचारवंतांनी स्वीकारलेला आढळतो. उदा., भगवद्गीता.
ग्रीक तत्त्वज्ञानात ल्युसिपस आणि डिमॉक्रिटस ह्या अणुवादी विचारवंतांनी तसेच एलियाटिक-पंथियांनी केवळ सत्ता किंवा भाव (Being) हे एक तत्त्व व याच्या विरोधी असलेले असत्ता किंवा अभाव (Non-Being) हे दुसरे तत्त्व अशी दोन तत्त्वे प्रतिपादिली. त्यांच्या मते अभाव किंवा असत्ता हे तत्त्व मानले नाही, तर विश्वातील परिवर्तन आणि गती यांचे स्पष्टीकरणच देता येणार नाही. हेराक्लायटसही यासारखीच भूमिका स्वीकारतो. जॉर्जियसने तर असत् किंवा अभावास फारच महत्त्व देऊन त्याचा पुरस्कार केला. प्लेटो व अॅरिस्टॉटल यांनीही अभावाचा विशिष्टअर्थी स्वीकार केला. तैत्तिरीयोपनिषदात विश्वाच्या आरंभी फक्त असत् होते असा विचार आलेला आहे. हेगेलने भाव व अभाव यांचा उपयोग त्याच्या द्वंद्वात्मकतेत केलेला आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात वैशेषिकांनी अभावास एका स्वतंत्र पदार्थाचे स्थान दिलेले आहे. मूळ वैशेषिक सूत्रांत फक्त सहाच पदार्थ मानलेले आहेत; परंतु मागाहून वैशेषिकांनी ‘अभाव’ हा सातवा पदार्थ मानला. वैशेषिकप्रणीत मूळ सहा पदार्थ हे भावरूप आहेत, तर अभाव हा सातवा पदार्थ अभावात्मक किंवा नकारात्मक आहे. तसेच मूळ सहा पदार्थ हे केवलस्वरूप, तर अभाव हा प्रतियोगीसापेक्ष आहे. कारण केवल अभाव किंवा नकार हा अशक्यच होय. कुठल्याही अभावास किंवा नकारास भावरूप प्रतियोगी गृहीत धरावेच लागते. कोणाचा अभाव? घटाचा अभाव; पटाचा अभाव; असा कोणीतरी प्रतियोगी सांगावाच लागतो. वैशेषिक हे वास्तववादी असल्याकारणाने ते ज्ञान आणि ज्ञानविषय यांत फरक करतात. अभावाचे ज्ञान आणि अभाव-विषय यांत फरक करून अभावपदाने निर्देशित केल्या जाणाऱ्या वस्तूचे अस्तित्व ते स्वीकार्य मानतात.
अभावाचे विवेचन वैशेषिक त्याचे पोटभाग पाडून करतात. प्रथमतः संसर्गाभाव (संबंधाभाव) आणि अन्योन्याभाव ह्या दोन विभागांत ते अभावाची विभागणी करतात. अन्योन्याभाव म्हणजे एक वस्तू ही दुसरी वस्तू नसणे-प्रत्येक वस्तूचा निराळेपणा. घट हा पट नव्हे. जगातील प्रत्येक वस्तू जी आहे ती तीच आहे; अन्य नाही. प्रत्येक वस्तूबाबतचे हे सत्य म्हणजेच अन्योन्याभाव. अन्योन्याभावाचा वस्तूचे अस्तित्वात असणे अगर नसणे याच्याशी काहीही संबंध नाही. तो वस्तूच्या स्वभावामुळेच सिद्ध होतो. संसर्गाभावाचे असे नाही. संसर्ग म्हणजे संबंध; संबंध नसणे (म्हणजे कोठेतरी अस्तित्व नसणे) म्हणजे संसर्गाभाव. प्राग्भाव, प्रध्वंसाभाव व अत्यंताभाव असे संसर्गाभावाचे पुन्हा तीन भेद केलेले आहेत. प्राग्भाव म्हणजे कोणतीही वस्तू उत्पन्न होण्याच्या क्षणापूर्वीचा तिचा अभाव. या अभावास अर्थातच अमुक वेळी सुरुवात झालेली असते असे नाही. तो अनादी असला, तरी त्यास अंत आहे. घटाचा प्राग्भाव घट अस्तित्वात आल्याक्षणीच नष्ट होतो. दुसरा प्रकार प्रध्वंसाभाव हा होय. कोणतीही वस्तू नष्ट झाली म्हणजे तिचा प्रध्वंसाभाव सुरू होतो; घट फुटला म्हणजे घटाचा प्रध्वंसाभाव निर्माण होतो. त्याला आदी आहे; परंतु अंत नाही. ह्या दोहोंहून अन्य तो अत्यंताभाव. वस्तू अमुक काली नसणे अशी कालमर्यादा ज्या अभावास नसते तो अत्यंताभाव. हा अभाव प्रत्येक वस्तूबाबत संभवतो. जी वस्तू अस्तित्वात आहे, ती कोठेतरी अस्तित्वात नसणे याला नेहमीच अर्थ राहणार. समोर भूमीवर घट असला तरी त्याचा अन्य ठिकाणी अभाव असतो. कारण तो घट तेथे नसणे ह्या कल्पनेस आपण नेहमीच अर्थ देऊ शकतो. म्हणूनच हा अनादी व अनंत आहे. वैशेषिकांच्या ह्या अभाव-कल्पनेवर इतर भारतीय दार्शनिकांनी बरीच टीका केलेली आहे.
अन्योन्याभाव व अत्यंताभाव यांचा तर्कशास्त्रात फार उपयोग होतो. आधुनिक तर्कशास्त्रानुसार त्याचा अर्थ असा निघेल : प्रत्येक अभावात्मक किंवा नकारात्मक विधानास काही अर्थ हा असतोच. अस्तिवाची विधानांप्रमाणे नास्तिवाची विधानेसुद्धा वास्तवतेची घटक होत. कोणतेही नकारात्मक विधान वास्तवतेचे घटक म्हणून सदोदित असतेच. ते विधान सत्य की असत्य याचा निर्णय माणूस मागाहून घेईल; परंतु असा काही निर्णय करण्यासाठी नास्तिवाची विधाने आधी असावयास हवीत. अत्यंताभाव मानणे म्हणजे वरील विचारपद्धतीस मान्यता देणे एवढेच होय.
आधुनिक तर्कशास्त्रात अभावाबाबत (Negation) बराच विचार झालेला असला, तरी त्यातील अनेक प्रश्न विवाद्य आहेत. अभावाचे किंवा नकाराचे नियम हे विचारनियमांतील अव्याघात नियम आणि विमध्य नियम यांना अनुसरतात. अस्तिवाची विधानातून व्यक्त होणाऱ्या घटनांप्रमाणेच अभावात्मक किंवा नास्तिवाची विधानातून व्यक्त होणाऱ्या घटनांनाही अस्तित्व आहे, असे मानणारा तर्कवेत्त्यांचा एक वर्ग आहे; तसेच हे मत मान्य नसणाऱ्या विचारवंतांचाही एक वर्ग आहे. आकारिक तर्कशास्त्रात नकारात्मक पदे व विधाने यांवर विपुल लेखन व मतमतांतरे आढळतात.
अभावाचा विचार आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात वेगळ्या संदर्भात नावीन्यपूर्ण रीतीने केलेला दिसतो. दोन महायुद्धांनंतर जाणविलेली भकासता, भंपकता म्हणजे अस्तित्ववादी साहित्यातील नसतेपणा किंवा अभाव. मानवी जीवन भकास, भंपक, निरर्थक असते. ते शून्य पोकळ (Void) असते, हा विचार अस्तित्ववादी पुनःपुन्हा मांडतात. मुळात जे सार आहे असे वाटते, ते निस्सार असते. म्हणजे मुळात नसतेच. जीवन हेतुशून्य, अर्थहीन, असंगत आहे, असे दोस्तोव्हस्की, नित्शे, हायडेगर, सार्त्र, सीमॉं द काम्यू, काफ्का, यास्पर्स या सर्वांनी म्हटले. संपूर्ण जीवनालाच त्यांनी अभावग्रस्त मानले, शून्यात्मक मानले. ईश्वराचे, सत्यासारख्या मूल्यांचे, नीतिनियमांचे, धर्मबंधनांचे, सामाजिक संकेतांचे नसतेपण त्यांच्या तत्त्वज्ञानात केंद्रस्थानी आहे. त्याच नसतेपणाचे किंवा अभावाचे व्यक्तिविशिष्ट रूप सार्त्र व हायडेगर यांनी अधोरेखित केले.
संदर्भ :
- Heidegger, Martin, Being and Time, New York, 1927.
- Sartre, Jean Paul; Trans. Barnes, Hazel E. Being and Nothingness, New York, 1984.
समीक्षक : शर्मिला वीरकर