हे तार्किक प्रत्यक्षार्थवाद या विचारप्रणालीचा आधारस्तंभ मानले जाते. तार्किक प्रत्यक्षार्थवाद विश्लेषणाला मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण स्थान देतो. सदर विचारप्रणालीने सत्ताशास्त्राचा अस्वीकार केला असून प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाला सर्वोच्च महत्त्व दिले आहे. परंपरागत तत्त्वज्ञानातील सर्व सिद्धान्तांचे प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाच्या साह्याने कठोर परीक्षण करण्याचे मौलिक कार्य करून मानवी जीवनाकडे व एकूणच जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन या विचारसारणीने केला.

विसाव्या शतकात स्वैरकल्पनाधिष्ठित सत्ताशास्त्राविषयी (Speculative Metaphysics) प्रतिकूल प्रवृत्ती व दृष्टीकोन तयार होऊन अनुभवाधिष्ठित, बुद्धिवादी, तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने विचार करणाऱ्या प्रत्यक्षवादी प्रवृत्तीला विशेष चालना मिळाली. अशा एका विशिष्ट सामाजिक आणि मानसिक मनोभूमीत तार्किक प्रत्यक्षार्थवादाची बिजे सहजपणे रुजली व जोमाने फोफावली.

साधारणतः १९२१ ते १९४० दरम्यानचा कालखंड हा तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा किंवा तार्किक अनुभववादाचा कालखंड मानला जातो. ‘व्हिएन्ना मंडळा’तील काही विचारवंतांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानात्मक कल्पनांना ए. ई. ब्लूमबर्ग व हर्बर्ट फायगल यांनी तार्किक प्रत्यक्षार्थवाद (Logical Positivism) ही संज्ञा दिली. ही वैचारिक चळवळ अमेरिकन फलवाद (Pragmatism) आणि ब्रिटिश विश्लेषण यांच्यासारखी असून वैज्ञानिक अनुभववाद (Scientific Empiricism), तार्किक अनुभववाद (Logical Empiricism) इत्यादी दृष्टीकोन तिच्याशी समानार्थक समजले जातात. तार्किक प्रत्यक्षार्थवादात केंब्रिज आणि ऑक्सफर्ड येथे विकसित झालेल्या ‘विश्लेषक’ आणि ‘सर्वसामान्य भाषेच्या’ (Orginary Language) तत्त्वज्ञानाचाही समावेश करण्यात येतो.

तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा उगम अनुभववादातून झाला. अनुभव किंवा प्रत्यक्ष हेच जगाविषयीचे ज्ञान संपादन करण्याचे एकमेव साधन आहे, हा अनुभववादाचा मुख्य सिद्धान्त आहे. आधुनिक पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात अनुभववादी विचार प्रथम स्पष्टपणे मांडण्याचे श्रेय जॉन लॉक (१६३२–१७०४) या ब्रिटिश तत्त्वज्ञाकडे जाते. सर्व ज्ञानाचा उगम व पाया अनुभव हा आहे असे प्रतिपादन त्याने केले. जॉर्ज बर्क्ली (१६८५–१७५३) याने लॉकच्या अनुभववादातील विसंगती  दूर करून त्याची अधिक तर्कशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न केला. लॉक, बर्क्ली आणि ह्यूम यांनी मांडलेल्या अनुभववादाची पार्श्वभूमी तार्किक प्रत्यक्षार्थवादाला लाभली.

लॉक व बर्क्ली यांच्याप्रमाणेच सर्व वास्तवज्ञानाचा (Factual Knowledge) उगम अनुभवातून होतो असे ह्यूम मानतो. सर्व ज्ञान संवेदनात्मक (Perceptual) आहे, जे संवेदनानुभवात उपलब्ध नाही, त्याचे अस्तित्व मानता येत नाही हे तत्त्व स्वीकारून ह्यूम लॉकची अनिरीक्षणीय जडद्रव्याची संकल्पना आणि बर्क्लीची आत्मद्रव्याची संकल्पना त्याज्य ठरवितो. थोडक्यात, ह्यूम परतत्त्ववादी सत्ताशास्त्राची शक्यता पूर्णपणे नाकारतो.

मॉरिझ श्लिक याची १९२२ मध्ये व्हिएन्ना विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि त्याच्याभोवती गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान अशा भिन्न क्षेत्रांतील विचारवंतांचे एक मंडळ निर्माण झाले. ते व्हिएन्ना मंडळ (Vienna Circle) म्हणून ओळखले जाते. त्यात श्लिकव्यतिरिक्त फ्रीड्रिख (फ्रेडरिक) वाइजमान, रूडॉल्फ कारनॅप, ओट्‌टो न्यूरॉथ, हर्बर्ट फायगल इत्यादी तत्त्वज्ञ; तर हान्स हान, कार्ल मेंगर, कुर्ट गोडेल हे गणितशास्त्रज्ञ होते. रूडॉल्फ कारनॅप हे १९२६ पासून मंडळात सामील झाले आणि तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या विकासात आणि प्रसारात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला. लूटव्हिख व्हिट्‌गेन्श्टाइन आणि कार्ल पॉपर हे तत्त्ववेत्ते जरी मंडळाचे सभासद नसले, तरी चर्चेत अनेकदा भाग घेत. व्हिट्‌गेन्श्टाइनच्या ट्रॅक्टेटस लॉजिको-फिलॉसॉफिकस (१९२२, म.शी. तर्कतत्त्वज्ञानविषयक प्रबंध) ह्या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव व्हिएन्ना मंडळाच्या विचारसरणीवर पडला होता. हे सर्व विचारवंत स्वतःला तार्किक प्रत्यक्षार्थवादी म्हणवून घेत.

थोडक्यात, तार्किक प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीमध्ये तार्किक, अनुभवजन्य तसेच विश्लेषणात्मक संकल्पनांना मध्यवर्ती स्थान आहे.

तार्किक प्रत्यक्षार्थवादी चळवळीच्या प्रमाणशास्त्राचा डोलारा पूर्णपणे प्रत्यंतरक्षमता किंवा प्रचितीक्षमतेच्या निकषावर उभा आहे. याच निकषाच्या आधारे तार्किक प्रत्यक्षार्थवादी सत्ताशास्त्रीय विधानांची चिकित्सा करतात. किंबहुना सत्ताशास्त्रीय विधाने अस्सल नसून ती केवळ अर्थशून्य बडबड आहे हे तार्किक प्रत्यक्षार्थवादी विचारवंत दाखवून देतात. याच अनुषंगाने ते असा आक्षेप घेतात की, शक्य कोटीतील अनुभवाच्या कक्षेबाहेरील परतत्त्वाविषयीची निवेदने वाच्यार्थपूर्ण असू शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या परतत्त्वाचे वर्णन करण्याच्या प्रयत्नातून केवळ अर्थशून्यतेची निर्मिती होते. सत्ताशास्त्रीय निवेदने अर्थशून्य आहेत हे दाखविण्यासाठी तार्किक प्रत्यक्षार्थवादी विचारवंत वाच्यार्थपूर्णतेचा निकष मांडतात. तो निकष म्हणजे प्रचितीक्षमतेचे तत्त्व होय.

वाक्य विधान व्यक्तविते की नाही हे ठरविण्याचा निकष म्हणजे प्रचितीक्षमतेचे तत्त्व आहे. या निकषानुसार एखादे वाक्य वाच्यार्थशून्य आहे असे म्हणणे म्हणजे ते सत्य किंवा असत्य विधान व्यक्तवित नाही असे म्हणणे होय. आज्ञा, विनंती, प्रश्नार्थक, उद्‌गारवाचक वाक्ये या निकषानुसार बोधार्थशून्य असली, तरी ती कोणत्याच प्रकारे अर्थपूर्ण नाहीत असे होत नाही. वरील प्रकारची वाक्ये वस्तुस्थितीचे वर्णन करीत नसल्यामुळे, म्हणजेच ती वर्णनात्मक नसल्यामुळे, ती सत्य किंवा असत्य विधान व्यक्तवित नाहीत एवढाच ‘वाच्यार्थशून्य’ या पदाचा अर्थ आहे.

अर्थपूर्णतेचा निकष म्हणून प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाचा विचार करण्यासाठी आर. डब्ल्यू. ॲशबेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाने विशिष्ट वाक्यांचा अर्थ ठरतो की केवळ वाक्य अर्थपूर्ण आहे हे ठरते? हे तत्त्व वाक्यांना, निवेदनांना की विधानांना लावले आहे? एखादे विधान प्रचितीक्षम आहे ह्याचा अर्थ काय होतो? कोणत्या प्रकारची विधाने इंद्रियानुभवाचे प्रत्यक्ष निवेदन करतात? हे तत्त्व अनुभवपूर्व आहे की अनुभवाद्वारा प्रचीतिक्षम आहे? ज्या प्रश्नाला हे तत्त्व उत्तर देते तो प्रश्न तार्किकदृष्ट्या वैध आहे का? या आणि यांसारख्या इतरही काही प्रश्नांच्या संदर्भात प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाचे विश्लेषण करणे आवश्यक ठरेल.

ॲशबेने उपस्थित केलेल्या पहिल्या प्रश्नाबाबत असे उत्तर शक्य आहे की, प्रचितीक्षमतेचे तत्त्व विशिष्ट वाक्याचा किंवा विधानाचा अर्थ ठरवित नाही किंवा निश्चित करीत नाही; तर केवळ ते वाक्य अर्थपूर्ण आहे की नाही हे ठरविते. विशिष्ट वाक्यांचा अर्थ निर्धारित करण्याचे काम त्या त्या ज्ञानक्षेत्रांतील व्यक्ती करीत असतात; ते तत्त्ववेत्त्यांचे काम नव्हे. ए. जे. एअरच्या मतानुसार संज्ञासमूहांच्या अर्थाचा विचार तत्त्वज्ञान करते असे म्हणण्याचे आपण टाळावे; कारण तत्त्वज्ञान हे भाषेच्या तार्किक स्वरूपाचा अभ्यास करीत असते. एअरने अर्थपूर्णतेचा निकष म्हणून प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाची खालीलप्रमाणे मांडणी केली आहे.

एखाद्या वाक्याचा जे विधान व्यक्त करण्याचा उद्देश असतो, त्या विधानाची प्रचिती कशी घ्यावी हे जर व्यक्तीला माहीत असेल, म्हणजेच विशिष्ट परिस्थितीत कोणत्या निरीक्षणांच्या आधारे ते विधान सत्य म्हणून स्वीकारता येईल अथवा असत्य म्हणून नाकारता येईल हे जर माहीत असेल, तरच फक्त त्या वाक्याला त्या व्यक्तीच्या दृष्टीने वास्तव अर्थ आहे, असे आपण म्हणतो. याउलट, त्या मानीव विधानाच्या सत्यासत्यतेचे गृहीत व्यक्तीच्या कोणत्याही पुढील अनुभवाशी सुसंगत नसेल व ते विधान जर पुनरुक्तिरूप नसेल, तर त्या व्यक्तीपुरते तरी ते व्याज-विधानच ठरते. अशा प्रकारचे वाक्य जरी बोधार्थपूर्ण नसले, तरी त्याला भावनिक अर्थ असू शकेल. एअर प्रचितीक्षमतेचे तत्त्व, निवेदनांना लागू करून त्याची मांडणी पुढीलप्रमाणे करतो : ‘‘कोणतेही निवेदन अनुभवाद्वारा प्रचितीक्षम असेल किंवा विश्लेषक असेल, तर आणि तरच ते वाच्यार्थपूर्ण ठरते”.

वरील मांडणीवरून असे लक्षात येते की, एअर वाक्यांऐवजी निवेदनांचा म्हणजेच वर्णनपर वाक्यांचाच विचार करतो. निवेदने ही वाक्यांचा उपवर्ग होत; मात्र सर्व निवेदने विधाने व्यक्तवीत असली, तरी ती सर्वच वाच्यार्थपूर्ण नसतात. एअरच्या मते अनुभवाद्वारा प्रचितीक्षमता या एकमेव कसोटीने निवेदन वाच्यार्थपूर्ण ठरत नाही. निवेदन वाच्यार्थपूर्ण ठरण्यासाठी एकतर ते विश्लेषक असले पाहिजे किंवा अनुभवाद्वारा प्रचितीक्षम तरी असले पाहिजे; मात्र दोन्ही नव्हे.

श्लिकच्या मतानुसार अनुभवपूर्व संश्लेषक अशी कोणतीही सत्ये नसतात. एअरच्या मतेसुद्धा जगाविषयीची किंवा वस्तुस्थितीविषयीची विधाने संश्लेषक असतात. जगाविषयीचे आपले ज्ञान अनुभवाधिष्ठित असते, अनुभवपूर्व असू शकत नाही. तर गणितीय किंवा तार्किक विधाने पुनरुक्तीपर म्हणून विश्लेषक असतात. त्यांना कोणताही वास्तव आशय नसतो. त्यामुळे त्यांचे अनुभवाच्या आधारे समर्थनही अशक्य असते. म्हणजेच एअर विश्लेषकता सिद्धान्त स्वीकारतो. या सिद्धान्तानुसार सर्व अनुभवपूर्व विधाने विश्लेषक आणि तार्किकदृष्ट्या अनिवार्य असतात. याउलट, सर्व अनुभवगम्य किंवा वास्तव विधाने संश्लेषक असतात. संश्लेषक विधाने तार्किकदृष्ट्या संभाव्य असतात, अनिवार्य नव्हेत. सत्ताशास्त्रीय विधाने यापैकी कोणत्याही वर्गात मोडत नाहीत. उदा., ‘सद्‌वस्तू चित्स्वरूप आहे’ हे विधान विश्लेषकही नाही आणि अनुभवाद्वारा प्रचितीक्षमही नाही. ते वाच्यार्थहीन म्हणूनच व्याज-विधान होय. श्लिकच्या मते सत्ताशास्त्रीय विधाने भाषेच्या तार्किक नियमांना धरून नसल्याने ती अर्थशून्य ठरतात. अशाप्रकारे तार्किक प्रत्यक्षार्थवादी सत्ताशास्त्रीय विधाने अर्थहीन म्हणून व्याज-विधाने होत, असे मानतात.

प्रचितीक्षमतेच्या बाबतीत एअर व्यावहारिक प्रचितीक्षमता आणि तात्त्विक प्रचितीक्षमता असा फरक करतो. ‘मंगळावर मानववस्ती आहे’ या वाक्याने वक्तविल्या जाणार्‍या विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहण्यास आवश्यक ती शास्त्रीय व तांत्रिक प्रगती झालेली नाही. म्हणून त्याची सत्यासत्यता ठरविणे शक्य नाही. येथे तांत्रिक प्रगतीच्या अभावामुळे जरी या वाक्याची सत्यासत्यता पडताळून पाहता येत नसली, तरी ते वाक्य पडताळून पाहण्यासाठी कोणते निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे ह्याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजेच ही अशक्यता केवळ व्यावहारिक, तांत्रिक स्वरूपाची आहे. या वाक्याची सत्यासत्यता पडताळण्यासाठी आवश्यक ते निरीक्षण करणे तत्त्वतः शक्य आहे; परंतु ‘सद्वस्तू चित्स्वररूप आहे’ किंवा ‘सद्वस्तू जडस्वरूप आहे’ अशा प्रकारच्या सत्ताशास्त्रीय वाक्यांची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचे निरीक्षण करणे आवश्यक आहे याची कल्पनाही करता येत नाही. अशाप्रकारच्या वाक्यांची सत्यासत्यता पडताळून पाहणे हे व्यावहारिक व तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे असे नाही, तर ते तत्त्वतःसुद्धा अशक्य आहे. म्हणजेच एखादे वाक्य पुनरुक्तिरूप विधान व्यक्तवीत नसेल, तर ते अर्थपूर्ण ठरण्यासाठी निदान तत्त्वतः तरी प्रचितीक्षम असले पाहिजे. त्याची प्रचिती घेण्यात व्यावहारिक अडचण असली, तरी हरकत नाही. अशाप्रकारे एअर ‘तात्त्विक प्रचितीक्षमता’ आणि व्यावहारिक प्रचितीक्षमता यांमध्ये भेद करतो.

कारनॅप व एअर यांनी ‘प्रचितीक्षम’ या पदाच्या ‘सबल’ आणि ‘दुर्बल’ अर्थामध्ये भेद केला आहे. विधानाचे सत्य जर अनुभवाद्वारा निर्णायकपणे सिद्ध करणे शक्य असेल, तरच फक्त ते सबल अर्थाने प्रचितीक्षम आहे असे म्हणता येते; परंतु अनुभवाने ते केवळ संभाव्य आहे एवढेच ठरविणे शक्य असेल, तर ते दुर्बल अर्थाने प्रचितीक्षम आहे असे म्हणावे लागेल. काही तार्किक प्रत्यक्षार्थवादी सबल अर्थाने हे तत्त्व वापरतात; परंतु एअर मात्र दुर्बल अर्थाने हे तत्त्व वापरतो आणि अंतिमतः कोणतेही अनुभवाधिष्ठित विधान फक्त दुर्बल या एकमेव अर्थानेच प्रचितीक्षम असू शकते असे मानतो; कारण सबल अर्थाचा आग्रह धरला, तर सत्ताशास्त्रीय विधानाबरोबरच कोणतेही अनुभवाधिष्ठित विधान कधीही कोणत्याही निरीक्षणाद्वारे निर्णायकपणे सिद्ध करता येत नाही आणि त्यामुळे ते अर्थहीन ठरेल.

सत्ताशास्त्रीय निवेदनांची अर्थशून्यता केवळ प्रचितीतत्त्वाच्या आधारे सिद्ध होत नाही; त्यासाठी सत्ताशास्त्रीय निवेदने अनुभवपूर्व विश्लेषक विधाने नाहीत हेही मान्य करावे लागते. एअरच्या मते अनुभवपूर्व विश्लेषक विधाने पुनरुक्तिरूप असल्यामुळेच त्यांना तार्किक निश्चितता असते; परंतु सत्ताशास्त्रीय निवेदने पुनरुक्तिरूप आहेत हे सत्ताशास्त्रज्ञसुद्धा मानावयास तयार नाहीत. यावरून एअर असा युक्तिवाद करतात की, सत्ताशास्त्रीय वाक्ये पुनरुक्तिरूप विधाने व्यक्तवीत नाहीत किंवा ती संवेदनानुभवद्वारा प्रचितीक्षम अशी संश्लेषक विधानेही व्यक्तवीत नाही; परंतु पुनरुक्तिरूप विश्लेषक विधाने आणि संवेदनानुभवाद्वारा प्रचितीक्षम संश्लेषक विधाने एवढीच अर्थपूर्ण विधाने आहेत. म्हणून सत्ताशास्त्रीय वाक्ये अर्थपूर्ण निवेदने व्यक्तवीत नाहीत.

एअरच्या मते व्याकरणाच्या नियमांनी आणि भाषेच्या शैलींनी सत्ताशास्त्रज्ञ चकविला जातो व त्याचा परिणाम म्हणजे तो सत्ताशास्त्रीय सिद्धान्त मांडू लागतो. व्याकरणाने चकविले जाऊन भौतिकदृष्ट्या अस्तित्वात नसलेल्या विविध पदार्थांचे अस्तित्व सत्ताशास्त्रज्ञ मानतो. असे सिद्धान्त नैतिकदृष्ट्या किंवा सौंदर्यदृष्ट्या कितीही उपयुक्त असले, तरी ते वाच्यार्थशून्य आहेत अशी ठाम भूमिका प्रचितीक्षमतेच्या निकषाच्या आधारे तार्किक प्रत्यक्षार्थवादी विचारवंत घेतात. सर्व विधानांचे एयर दोन वर्गांमध्ये विभाजन करतो. १) अनुभवपूर्व, पुनरुक्तिपर, विश्लेषक व अनिवार्यपणे सत्य असणारी विधाने आणि २) अनुभवाधिष्ठित, संश्लेषक, यादृच्छिक विधाने. सद्वस्तुमीमांसेतील निवेदने यांपैकी कोणत्याही गटात मोडत नाहीत, म्हणून ती व्याज-विधाने होत असा युक्तिवाद एअर करतो. अशाप्रकारची व्याज-विधाने करावयास सत्ताशास्त्रज्ञ कसे उद्युक्त होतात? या प्रश्नाचे उत्तर देताना गूढानुभूती, तार्किक गल्लत व मानसिक प्रेरणा ही सद्वस्तुमीमांसेची उगमस्थाने आहेत, असे प्रतिपादन एअरने केले आहे.

सद्वस्तुमीमांसेतील प्रत्येक विधान वाच्यार्थशून्य असते, असे म्हणून एअर सद्वस्तुमीमांसेला विरोध करतो; परंतु त्याचवेळी या निवेदनांना भावनिक संदर्भ असण्याची शक्यता तो नाकारत नाहीत. ‘सद्वस्तुमीमांसेतील निवेदनांना बोधार्थ नसतो, हा एअरचा या संदर्भात प्रमुख मुद्दा आहे.

एखाद्या निवेदनाला बोधार्थ आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी एअर प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाचा वापर करतो. प्रचितीक्षमता हा अर्थपूर्णतेचा निकष मानल्यास सद्वस्तुमीमांसेतील निवेदने ह्या कसोटीवर उतरत नसल्याने निरर्थक ठरतात. उदा., ‘केवलतत्त्वाची उत्क्रांती व प्रगती असंभवनीय असली, तरी ते सर्व उत्क्रांतीत व प्रगतीत अंतर्भूत असते’ हे ब्रॅडलीचे सद्वस्तुमीमांसेतील निवेदन अर्थशून्य आहे; कारण या निवेदनाची सत्यासत्यता ठरवू शकेल, अशा एकाही निरीक्षणाची कल्पना करणे शक्य नाही. म्हणजेच सदर निवेदन ‘विधान’ नसून ते ‘व्याज-विधान’ आहे, असे एअरचे मत आहे.

थोडक्यात, असे स्पष्ट होते की, ईश्वराचे अस्तित्व, आत्मा, पुनर्जन्म इ. सर्व संकल्पना अप्रचितीक्षम म्हणून तार्किक प्रत्यक्षार्थवादी विचारवंतानी झुगारून दिल्या आहेत.

अंतिमतः प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाच्या आधारे तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या सत्ताशास्त्रीय भूमिकेवर प्रकाशझोत टाकताना एअरने असे म्हटले आहे की, सत्ताशास्त्राचा फार मोठा भाग साध्या चुकांनी भरलेला आहे. सत्ताशास्त्रीय लिखाणाचे खूप परिच्छेद गूढ अनुभूतीतून लिहिले गेले आहेत. त्यांना नैतिक आणि सौंदर्यमूल्य असल्याचे मान्य करणे अधिक संयुक्तिक ठरेल. परंतु व्याकरणाने फसविल्या गेलेल्या तत्त्वज्ञाने निर्माण केलेली सत्ताशास्त्रीय प्रणाली आणि गूढवादी तत्त्वज्ञाने आपली गूढ अनुभूती व्यक्त करण्याच्या प्रयत्नातून निर्माण केलेली सत्ताशास्त्रीय प्रणाली यांतील फरक फार महत्त्वाचा नाही. अशा सत्ताशास्त्रज्ञाचे उद्गार वाच्यार्थशून्य असतात हे ध्यानात घेऊन तत्त्वज्ञानात्मक संशोधनात भाषेची कार्यपद्धती न समजल्यामुळे निर्माण होणार्‍या सत्ताशास्त्राबरोबर या गूढवादी सत्ताशास्त्राकडेही दुर्लक्ष करण्यास हरकत नाही. म्हणजेच प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाच्या आधारे तार्किक प्रत्यक्षार्थवादी विचारवंतांनी सत्ताशास्त्रीय संकल्पना भाषेच्या तार्किक नियमांना धरून नसल्याने अर्थशून्य म्हणजेच व्याजविधाने असतात असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

संदर्भ :

 • Ayer, A. J. Language, Truth and Logic, London, 1946.
 • Ayer, A. J.; Morgan, Edward P. Ed. This I Believe, 1953.
 • Hospers, John, An Introduction to Philosophical Analysis, New Delhi, 1971.
 • Hunter, Mead, Types And Prbolems of Philosophy, New York, 1959.
 • Urmson, J. O.; Weitz, Morris, Ed. Logical Positivism and Analysis, Oxford, 1956.
 • Weitz, Morris, Ed. Twentieth-Century Philosophy : The Analytic Tradition, New York, 1966.
 • एयर, ए. जे.; अंतरकर, शि. स. अनु. व संपा. भाषा सत्य आणि तर्क, पुणे, १९७४.
 • ‘एयर विशेषांक’ परामर्श, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, मे १९९०.
 • https://www.youtube.com/watch?v=f7WNy0Aq76I
 • https://www.youtube.com/watch?v=yZWB4wR9XBM
 • https://www.youtube.com/watch?v=lDm7epEuE6g

समीक्षक : वेदप्रकाश डोणगावकर