आर्क्टिक वृत्त. पृथ्वीगोलावरील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील ६६° ३०’ उ. अक्षांशावरील काल्पनिक अक्षवृत्ताला आर्क्टिक वृत्त किंवा उत्तर ध्रुववृत्त म्हणून संबोधले जाते. पृथ्वीच्या नकाशावर सामान्यपणे विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, उत्तर ध्रुववृत्त आणि दक्षिण ध्रुववृत्त (अंटार्क्टिक वृत्त) ही प्रमुख पाच काल्पनिक अक्षवृत्ते दाखविली जातात. त्यांपैकी उत्तर ध्रुववृत्त हे एक आहे. उत्तर ध्रुववृत्तावरील सर्व बिंदू सुमारे ६६° ३०’ उत्तर अक्षांशावर म्हणजेच भौगोलिक उत्तर ध्रुवापासून २,६१३ किमी. अंतरावर आहेत. उत्तर ध्रुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशाला सामान्यपणे आर्क्टिक प्रदेश किंवा शीत कटिबंध म्हणून ओळखले जाते. उत्तर ध्रुववृत्त हे काल्पनिक अक्षवृत्त अमेरिकेच्या संस्थानांपैकी अलास्का राज्य, कॅनडाचा उत्तरेकडील प्रदेश, स्कँडिनेव्हिया आणि रशियातून जाते.
पृथ्वीवरील भूपृष्ठाच्या ज्या क्षेत्रावर दरवर्षी सूर्य क्षितिजाच्या वर एक वा अधिक दिवस असतो, त्या क्षेत्राची कडा उत्तर ध्रुववृत्ताने दर्शविली जाते. पृथ्वीचा आस २३° ३०’ ने कललेला आहे. पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा, पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण यांमुळे पृथ्वीवर दिनमान व रात्रीमानात असमानता निर्माण होते. उन्हाळी अयनदिनाच्या सर्वांत मोठ्या दिवशी (२१ जून) उत्तर ध्रुववृत्तावर सूर्य मावळत नाही. तेथे चोवीस तास म्हणजे मध्यरात्रीही सूर्य क्षितीजाच्या वर दिसतो. याच्या उलट हिवाळी अयनदिनाच्या सर्वांत लहान दिवशी (२२ डिसेंबर) उत्तर ध्रुववृत्तावर कधीच सूर्योदय होत नाही. म्हणजेच तेथे सूर्य क्षितिजाच्या खाली असतो. आकाश निरभ्र असल्यास प्रत्यक्ष उत्तर ध्रुवावर २१ जूनच्या आधी व नंतर ९०-९० दिवस (सहा महिने) सूर्य दिसतो; तर २२ डिसेंबरच्या आधी व नंतर ९०-९० दिवस (सहा महिने) सूर्य क्षितिजाखाली असतो. सलग दिवसाचा व रात्रीचा कालावधी उत्तरेकडे वाढत जातो. उत्तर ध्रुववृत्तावर तो एक दिवसाने, तर उत्तर ध्रुवावर सहा महिन्यांनी वाढतो. म्हणेजच उत्तर ध्रुवावर सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते.
उन्हाळी अयनदिनाच्या दिवशी चोवीस तास दिवस असण्याची आणि हिवाळी अयनदिनाच्या दिवशी चोवीस तास रात्र असण्याची सर्वांत दक्षिणेकडील मर्यादा म्हणजे उत्तर ध्रुववृत्त होय. उत्तर ध्रुववृत्तापासून दक्षिण ध्रुववृत्तापर्यंतच्या पृथ्वीच्या भागात सूर्य दररोज उगवतो व दररोज मावळतो; परंतु उत्तर ध्रुवावर सूर्य वर्षातून एकदाच उगवतो व एकदाच मावळतो.
दक्षिण ध्रुववृत्तावरील परिस्थिती उत्तर ध्रुववृत्तावरील परिस्थितीच्या अगदी उलट असते. म्हणजे तेथे कोणत्याही एका दिलेल्या दिवशी असलेला दिवसाचा उजेड व रात्रीचा काळोख यांची परिस्थिती नेमकी उलटी असते.
समीक्षक : वसंत चौधरी