भौगोलिक आणि भूशास्त्रीय दृष्ट्या तीव्र उताराचा, सरळ, उभा खडक म्हणजे कडा होय. तो जवळजवळ उभ्या, टांगलेल्या किंवा लोंबत्या रूपात असू शकतो. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा या बाह्यशक्तीकारकांच्या झीज कार्यामुळे आणि भूहालचालींमुळे कडे निर्माण होतात. समुद्र किनार्यालगत खडक झिजून कडे निर्माण होतात. समुद्र किनार्यालगत प्रभावशाली लाटा आणि वेगवान वार्यामुळे खडकांची झीज होऊन ते कापले जाऊन समुद्री कडा तयार होतो. नदीमुळे झीज होऊन उभी व अरुंद दरी वा घळई तयार होते. अशा भिंतीसारख्या उभ्या कड्यांच्या बाजू असलेल्या खोल निदर्या म्हणजे कॅन्यन होय. खडकाळ प्रदेशातून आणि तीव्र उतारावरून वाहणार्या नदीमुळे काठाच्या (पार्श्ववर्ती) खणनापेक्षा तळाचे (अधोगामी) खणन अधिक होऊन अरुंद व उभी दरी वा घळई निर्माण होते. अशा भिंतीसारख्या उभ्या कड्यांच्या बाजू असलेल्या खोल निदर्या म्हणजे कॅन्यन होय. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडो नदीच्या पात्रातील ग्रँड कॅन्यन. हिमालय पर्वतश्रेण्या पार करून भारतीय भूमीवर प्रवेश करणार्या अनेक नद्यांनी हिमालयातील खडक खोदून अशा खोल निदर्या निर्माण केल्या आहेत. साहजिकच तेथे उंच कडे निर्माण झाले आहेत. उदा., सिंधु नदी, सतलज नदी, ब्रह्मपुत्रा नदी इत्यादी. अनेक ठिकाणी झीज व विदारण कार्यांमुळे निर्माण झालेल्या कड्यांवरून धबधब्यांच्या रूपाने नद्या खाली कोसळतात. हिमनदीमुळे दरीच्या भिंतीलगतचे खडक घासले जाऊन झिजतात व कडा निर्माण होतो. असा कडा हिमनदी वितळल्यावर दिसतो. उंच पर्वताच्या उतारावर हिम गोळा होते. येथील खडकांचे तुकडे वाहत्या हिमाने खेचून वा खुडून दूर नेले जातात व कडे असणारी रंगमंडलासारखी (अँफिथिएटरसारखी) रचना निर्माण होऊ शकते. खडकांमधील प्रस्तरभंगांमुळे (तड्यांमुळे) खडकाचे अधोगामी किंवा उर्ध्वगामी स्थलांतर व विस्थापन होऊन छेदाच्या रूपातील कडा तयार होतो. सरोवराच्या सीमेलगत झीज होऊन कडा निर्माण होऊ शकतो. कड्याच्या उताराचे प्रमाण अधिक जास्त असल्याने त्यावर झिजेची प्रक्रिया अधिक प्रमाणात होते आणि इतर उतारांपेक्षा हा उतार अधिक जलदपणे मागे हटत जातो. उताराच्या तळाशी सर्वाधिक झीज होते. अशा रीतीने नदीपात्रातील कडा, समुद्री कडा, सरोवरी कडा, विभंग कडा इत्यादी प्रकारचे कडे तयार होत असतात.
समीक्षक : वसंत चौधरी