गोखले, शोभना लक्ष्मण : (२६ फेब्रुवारी १९२८–२२ जून २०१३). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव कुमुद वामन बापट. त्यांचा जन्म सांगली येथे वामन व पार्वती या दाम्पत्यापोटी झाला. वडील वामनराव अमरावतीत वकिली व्यवसाय करीत होते. त्यामुळे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथे झाले. त्या किंग एडवर्ड कॉलेज (विद्यमान विदर्भ महाविद्यालय) मधून संस्कृत व मराठी विषयांत बी. ए. झाल्या (१९५०). संस्कृतचे शिक्षण घेत असताना त्यांना प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढेही त्यांच्या संशोधनाला मिराशी यांनी प्रोत्साहन दिले. पदवीनंतर त्यांनी अमरावतीच्या नूतन कन्या शाळेत अध्यापन केले (१९५०-१९५२). त्यांचा विवाह केसरीतील उपसंपादक, पत्रकार लक्ष्मण नारायण गोखले यांच्याशी झाल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या (१९५२).

विवाहानंतर पुणे विद्यापीठात प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात एम. ए. (१९५५) करीत असताना त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील ग्रंथालयात अर्धवेळ नोकरी केली. त्यांना पीएच्.डी.साठी किंग एडवर्ड मेमोरिअल शिष्यवृत्ती (नागपूर) मिळाली आणि ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ हसमुख धीरजलाल सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच्. डी. केली (१९६०). ‘हिस्टॉरिकल जिऑग्रफी अँड इथ्नॉग्रफी ऑफ मध्य प्रदेशʼ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पुढील संशोधनासाठी त्यांना त्यांचे काका, बौद्ध धर्माचे जागतिक कीर्तीचे संशोधक पु. वि. बापट यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी त्यांनी कान्हेरी येथील प्राचीन अभिलेख, तेथील बौद्ध लेणी यांच्या अनुषंगाने बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. पुढे त्यांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व विभागात पुराभिलेखशास्त्र आणि नाणकशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून उल्लेखनीय काम केले (१९६०–१९८८), तसेच पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेचे सन्मान्य अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९९६–२०१३).

गोखले यांनी विदर्भातील वाशिम (प्राचीन वत्सगुल्म) जवळील हिस्सेबोराळा येथे वाकाटक राजवंशातील देवसेनाच्या ब्राह्मी लिपीतील लेखाचा शोध लावून त्यामध्ये शक ३८० हा उल्लेख असल्याचे निदर्शनास आणले (१९६४). त्यामुळे वाकाटककालीन इतिहासाच्या अभ्यासात या लेखाने मोलाची भर घातली. तसेच जुन्नर येथील नाणेघाटातील लेण्यामधील सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिच्या ब्राह्मी लिपीतील लेखावर संशोधन करून लेखातील २८९ हा आकडा आणि त्याचे वाजपेय यज्ञातील महत्त्व अधोरेखित केले (१९६४). मुंबईच्या बोरीवली या उपनगरापासून दहा किमी. अंतरावर असलेल्या कान्हेरीच्या १०४ बौद्ध गुंफांच्या समूहातील स्मशान गुंफेतील सव्वीस शिलालेखांचा त्यांनी प्रथमच शोध लावला. या शिलालेखांत गुणशाली बौद्ध भिक्षूंची नावे असल्यामुळे कान्हेरी हे बौद्ध शैक्षणिक केंद्र होते, हे सिद्ध केले (१९७३). पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तुळईवरच्या शिलालेखाचे नव्याने वाचन करून कर्नाटकाचा होयसळ राजा सोमेश्वर याने शके ११५१ मध्ये (इ. स. सुमारे १२२९) मकरसंक्रांतीला कर्नाटकातील आसंदीनाड येथील हिरियगरज हे गाव श्री विठ्ठलाच्या रंगभोग-अंगभोगासाठी दान दिल्याचा तपशील या शिलालेखातून प्रकाशात आणला. गुजरातमधील कच्छजवळील अंधौ येथे शके ११ हा (इ. स. ८९) कालनिर्देश असलेल्या सर्वांत प्राचीन आणि महत्त्वाच्या शिलालेखाचा उर्वरित भाग शोधत असताना त्यांना क्षत्रपकालीन तळे, नाणी आणि खापराचे तुकडे शोधण्यात यश मिळाले. शिलालेखांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी प्राचीन नाण्यांचेही संशोधन केले. पुण्याजवळील रांजणगाव येथे क्षत्रप राजांची १५०० नाणी शोधून त्यांचे वाचन केले (१९७४), तसेच महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्यातील राजांची प्रतिमायुक्त नाणी त्यांनी शोधली (१९८५).

गोखले यांचे सव्वाशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांतील काही महत्त्वाचे ग्रंथ असे : इंडियन न्युमरल्स (१९६४), पुराभिलेखविद्या (१९७५), कान्हेरी इन्स्क्रिप्शन्स (१९९१), Lord of Dakshinapatha (२००९), भारताचे संस्कृती वैभव (२००९) इत्यादी. तसेच मराठी विश्वकोशातही त्यांनी लिपिशास्त्रविषयक अनेक नोंदींचे लेखन केले. ललाटलेख (२०१४) या नावाने त्यांचे आत्मवृत्तही प्रसिद्ध आहे.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी काही महत्त्वाचे असे : सातवाहनकालीन नाण्याच्या अभ्यासाबद्दल सर बिडुल्फ पारितोषिक, वाराणसी (१९८५); अध्यक्ष, अखिल भारतीय नाणकशास्त्र परिषद, धारवाड (१९८५); अध्यक्ष, जागतिक नाणकशास्त्र परिषद, भारतीय विभाग, ब्रूसेल्स, बेल्जियम (१९९१); अध्यक्ष, अखिल भारतीय पुराभिलेख परिषद, तिरुचिरापल्ली (१९९३); बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टतर्फे आदिशक्ती पुरस्कार, पुणे (२००३), परमेश्वरीलाल गुप्ता पारितोषिक (२००८), गार्गी पुरस्कार (२००८), महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पारितोषिक (२०१२) व संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्था, पुणे या न्यासातर्फे मानद सभासदत्व (२०१३).

वृद्धापकाळाने पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • गोखले, शोभना ललाटलेख, पुणे, २०१४.

समीक्षक – अंबरीश खरे

प्रतिक्रिया व्यक्त करा